पाचवी, आठवीचे वर्ग सुरू करण्याची शिक्षण विभागाचे नियोजन सुरू; शिक्षकांची होणार कोरोना चाचणी

अविनाश काळे
Thursday, 21 January 2021

गटशिक्षण विभागाने तालुक्यातील १२३ जिल्हा परिषद व खासगी शाळा सुरु करण्याचे नियोजन सुरू केले आहे.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : कोरोनामुळे तब्बल नऊ महिने बंद असलेल्या पाचवी ते आठवीच्या शाळा गुरुवारपासून (ता.२७) सुरू करण्याचा शासनाचा निर्णय झाल्याने येथील गटशिक्षण विभागाने तालुक्यातील १२३ जिल्हा परिषद व खासगी शाळा सुरु करण्याचे नियोजन सुरू केले आहे. दरम्यान सुरक्षिततेसाठी शाळा प्रशासन, विद्यार्थी यांना कोरोनाच्या नियमावलीचे पालन करण्याच्या सूचना असल्याने शाळा निर्जुंकीकरणाबरोबर सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. ४९२ शिक्षकांची शाळा सुरू होण्यापूर्वी आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक असून त्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

ग्रामसेवकाच्या आत्महत्येचे ‘झेडपी’त तीव्र पडसाद, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी 

गुरुवारी (ता. २१) ७० शिक्षकांचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला आहे.
उमरगा शहर व तालुक्यात इयत्ता नववी ते बारावीपर्यंत वर्ग असलेले ६७ शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय २३ नोव्हेंबरपासून सुरु झाल्या. टप्प्याटप्प्याने वर्गात विद्यार्थी संख्या वाढली होती. आता पाचवी ते आठवीपपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय झाल्याने शिक्षण विभागाने नियोजन सुरु केले आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ९२, खासगी अनुदानित सोळा तर विनाअनुदानित पंधरा अशा १२३ शाळेतील सोळा हजार ५३० विद्यार्थी संख्या आहे.

ग्रामपंचायतला पडली 'बारा' मते... मग पठ्ठ्याने बॅनर लावून मानले मतदारांचे 'जाहीर आभार'

शिक्षकांची कोरोना चाचणी सुरू
इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या वर्गासाठी ४९२ शिक्षक आहे. त्यांची २६ जानेवारीपर्यंत आरटीपीसीआर चाचणी करण्याच्या सूचना आहेत. सध्या शहर व तालुक्यात अधून-मधून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. शिक्षकांना कोरोना चाचणी करण्याचे बंधनकारक असल्याने आरोग्य विभागाने गुरुवारपासून चाचणी घेण्याचे काम सुरू केले आहे.

गटविकास अधिकाऱ्याच्या जाचास कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या अधिकाऱ्याचा मृत्यू

अशी असेल नियमावली
शाळेचे निर्जुंतीकरण करणे, प्रवेशद्वारावर हात धूण्याची सोय, ऑक्सिमीटरने तपासणी आणि मास्क, सॅनिटायझर व पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र बाटली, शाळा परिसरात व वर्गातही सामाजिक अंतर, स्कुल बसमध्ये मर्यादित संख्या तसेच पालकांची समंतीपत्र आवश्यक आदी नियमावलीचे पालन करून शाळा सुरू होणार आहेत. 

मराठवाड्याच्या आणखी बातम्या वाचा

इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. शिक्षकांची कोरोना चाचणी बंधनकारक असून शाळा प्रशासनाने सामुहिक सुरक्षिततेसाठी सतर्क राहिले पाहिजे. 
- शिवकुमार बिराजदार, गटशिक्षणाधिकारी

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad News Schools Reopen Next Week Umarga