राजकीय हस्तक्षेपामुळे पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी उपसले आंदोलनाचे हत्यार

अविनाश काळे
Friday, 16 October 2020


उमरगा : ग्रामपंचायतीच्या नियमबाह्य कामासाठी केला जातोय दबावतंत्राचा वापर ; प्रशासक म्हणून काम करण्यास कर्मचारी अनुत्सुक 

उमरगा (उस्मानाबाद) : प्रशासकीय कामकाजात राजकीय हस्तक्षेपामुळे होणाऱ्या मानसिक त्रासाला वैतागून शुक्रवारी (ता.१६) पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश आष्टे वैयक्तिक द्वेषभावनेने स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थापोटी कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देत आहेत. ग्रामपंचायतीच्या प्रशासकाकडून  वरीष्ठांच्या आदेशान्वये सुरळीत काम सुरू असताना हस्तक्षेप करुन संबंधित प्रशासकांना बदलण्यासाठी दबावतंत्र वापरत आहेत. यावरून संबंधितांचे यात वैयक्तिक स्वार्थ असल्याचे कर्मचारी संघटनेचे मत झाले आहे. यापूर्वीही या पदाधिकाऱ्याकडून अश्लील शिवीगाळ करुन कार्यालयात व कार्यालया बाहेरही मारहाण करु शकतो अशी धमकी दिली गेली आहे. याबाबत कर्मचारी संघटनेचे शिष्टमंडळाने पक्षश्रेष्ठींकडे जाऊन ही बाब निर्देशनास आणून दिली होती. तेंव्हा संबंधित पदाधिकाऱ्यांना याबाबत समज देवुन कोणत्याही पक्षाच्या सदस्याकडून असे कृत्य होणर नाही अशी ग्वाही पक्षश्रेष्ठींनी दिली होती.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यानंतर माजी सभापती मदन पाटील यांनीही कर्मचाऱ्यांना समजावून सांगून आंदोलनापासून परावृत्त केले होते. त्यानंतरही वैयक्तिक एकेक कर्मचाऱ्यांना लक्ष्य करुन पुर्वीपेक्षाही जास्त मानसिक छळ, अर्वाच्च व अशासकीय भाषेचा वापर करत कर्मचाऱ्यांची चौकशी लावुन कार्यवाही करण्याची धमकी दिली जातेय. चुकीची कामे करण्यास भाग पाडण्यात येत असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरन होत आहे. तालुक्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशान्वये नेमणुक झालेल्या ग्रामपंचायत प्रशासक आदेशात वैयक्तीक रोष बाळगुन आर्थिक स्वार्थापोटी दबावतंत्राचा वापर करुन अनावश्यक बदल करण्यात येत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतचे व कार्यालयाचे प्रशासकीय कामकाज करण्याबाबत अडथळा निर्माण होऊन संबधीत कर्मचाऱ्यांच्या मानसिकता व कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम झाला आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यापुर्वीही कार्यालयीन कर्मचाऱ्यांची वैयक्तीक माहिती, दौरा, दैनंदिनी यांची सभापतीनी माहिती मागवुन घेऊन या माहितीच्या आधारे संबधीत कर्मचाऱ्यांवर दबाब टाकून वरिष्ठांकडून कार्यवाही करण्यात येईल अशी धमक्या वारंवार दिलेल्या आहेत. ग्रामपंचायत प्रशासकपदी नेमण्यात आलेल्या सर्व विभागाचे विस्तार अधिकारी व कृषी अधिकारी वारंवार होत असलेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे व दबावतंत्रामुळे प्रशासकपदी काम करण्यास अनुत्सुक असून प्रशासकाचा राजीनामा देणार आहोत. विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांना २० तारखेला सादर करावयाच्या अहवाल वाचनाच्या कामकाजामध्ये व चालु कार्यालयीन कामकाजात विपरीत परिणाम झाला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सर्व कर्मचारी यांना होणाऱ्या त्रासापोटी १६ आक्टोबरपासून समाधानपुर्वक तोडगा निघणार नाही. तोपर्यंत काम बंद आंदोलन करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एम. एस. बिडवे, सचिव बी. एम. पवार, कार्याध्यक्ष श्रीमती एस. डी. लोकरे, उपाध्यक्ष ए. डी. चिंचोले, एस. एम. शेटगार, के. एस. पवार, एन. आर. घुमे, एन. एस. राठोड, पी. एफ. चव्हाण, आर. के. शेरकर, अशोक गायकवाड आदी कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panchayat Samiti employees staged agitation due to political interference