esakal | श्रेय कोणाला : जिल्ह्यातील १०८ कोटींचा निधी पश्चिम महाराष्ट्राला
sakal

बोलून बातमी शोधा

Beed News
  • १७० किलोमीटर लांबीचे ३४ रस्ता कामे रद्द 
  • मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून भेटला होता निधी 
  • रद्द झालेल्या कामांत सर्वाधिक केज, अंबाजोगाई तालुक्यातील 

श्रेय कोणाला : जिल्ह्यातील १०८ कोटींचा निधी पश्चिम महाराष्ट्राला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड : कुठलाही निधी वा शासन योजना आली की मी आणि माझ्यामुळेच असाच प्रघात जिल्ह्यात पडला आहे. अगदी पीकविमा शेतकऱ्यांनी भरलेला असतो आणि भेटला तरी आम्हीच म्हणणारे न भेटणाऱ्यांची जबाबदारी घेत नाहीत; पण आता जिल्ह्यातील १०८ कोटी रुपयांचा निधी पश्चिम महाराष्ट्राच्या घशात जाणार आहे. याचे श्रेय कोण घेणार? असा प्रश्न आहे. 

मागच्या महायुती सरकारच्या काळात मंजूर झालेले मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील तब्बल १७० किालोमीटर लांबीची ३४ रस्ताकामे रद्द करण्याचा नवीन शासनादेश नुकताच ग्रामविकास खात्याने काढला आहे. ही कामे आता कोल्हापूर, बारामती आदी भागांत होणार आहेत. रद्द झालेल्या कामांत सर्वाधिक केज व अंबाजोगाई तालुक्यातील आहेत. 

नव्या सरकारमध्ये जिल्ह्याला विकासाच्या दृष्टीने अद्याप भेटले तर काही नाही; पण पहिल्या टप्प्यात २५/१५ शीर्षाची कामे रद्द झाल्यानंतर आता धडकन मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कामेही रद्द झाली आहेत. आता याचे श्रेय कोणी घेणार का, असा प्रश्न रस्ताकामे रद्द झालेल्या गावांतील नागरिक उपस्थित करीत आहेत. या मुद्द्यावरून भाजप नेत्यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही टीका केली आहे. 

कार्यारंभ आदेश देण्याच्या टप्प्यावरच रद्दचा निर्णय 

दरम्यान, तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी त्यावेळी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जिल्ह्यातील रस्ताकामे मंजूर केली होती. यात बीड तालुक्यात १४ कोटी ३५ लाख, अंबाजोगाई तालुक्यासाठी ३३ कोटी ८४ लाख, केज तालुक्यासाठी ४८ कोटी ८४, गेवराई तालुक्यासाठी आठ कोटी ४३ लाख, तर माजलगाव तालुक्यासाठी दोन कोटी ७३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. 

मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला माहित नसणारच

ही रस्ताकामे झाली रद्द 

  • अंबाजोगाई तालुका - जिल्हा मार्ग ते माकेगाव ते पाटोदा, राज्यमार्ग ते पाटोदा ते अंजनपूर, जिल्हामार्ग ते भावठाणा-राक्षसवाडी-चिंचखंडी, राज्यमार्ग ते मगरवाडी-अंबाजोगाई, जिल्हा मार्ग ते बीडगर वस्ती, राज्यमार्ग ते मालदरावस्ती, भावठाणा ते परवारवस्ती, राज्यमार्ग ते राजेवाडी, जिल्हा मार्ग ते चव्हाणवाडी, राज्यमार्ग ते सनगाव, राज्यमार्ग ते उमराई रस्ता, जिल्हा मार्ग ते सोनवळा ते भावठाणा, राज्यमार्ग ते गुंडरे वस्ती.
  • केज तालुका - तांबवा ते गांजपूर, राज्यमार्ग ते विडा-आंधळेवाडी रस्ता, राज्यमार्ग ते गप्पेवाडी, जोला ते पिंपळगाव, आडस ते कळंबअंबा, चंदनसावरगाव, सांगवी ते बेलगाव-आरणगाव, राज्यमार्ग ते चंदनसावरगाव ते जवळबन बनसारोळा रस्ता, राज्यमार्ग ते लांबतुरे वस्ती, राज्यमार्ग ते पिसेगाव, जानेगाव, उंद्री ते गांजपूर ते आडस-पवार वस्ती, येडके वस्ती ते रानोबाचीवाडी ते जिल्हा मार्ग ते जिवाचीवाडी ते तुकुचीवाडी. 
  • गेवराई तालुका - राज्यमार्ग ते चोपड्याचीवाडी ते वहान रस्ता, मादळमोही ते मुळुकवाडी, जिल्हा मार्ग ते कटचिंचोली. 
  • माजलगाव तालुका - जिल्हा मार्ग ते खुळखुळी तांडा, जिल्हा मार्ग ते चोपानवाडी, राज्य मार्ग ते धर्मेवाडी. 
  • बीड तालुका - राज्य मार्ग ते बोरदेवी रोड, जिल्हा मार्ग ते किन्हीपाई, राज्य मार्ग ते सांडरवण ते पिंपळादेवी रस्ता, जिल्हा मार्ग ते सुर्डीथोट ते नवाबपूर केसापुरी रस्ता. 

पालकमंत्र्यांचे सुडाचे राजकारण : मुंदडा 

पालकमंत्री म्हणून काही देण्याऐवजी उलट मागच्या काळात नेत्या पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यासाठी मंजूर केलेली कामेही रद्द केली जात आहेत. सध्या सर्वजण कोरोनाशी लढत असताना अशा काळातही विद्यमान पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे कुरघोडीचे राजकारण केल्याचा आरोप आमदार नमिता मुंदडा यांनी केला.

उस्मानाबादच्या एवढ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी

रद्द झालेल्यांत सर्वाधिक २४ कामे माझ्या केज मतदारसंघातील आहेत. यासाठी ८१ कोटी रुपये खर्च होणार होता. या पालकमंत्र्यांनी जिल्ह्याला नवे काही आणले तर नाही उलट पंकजा मुंडे यांनी आणलेला निधीही हे परत पाठवीत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

आम्ही जरी विरोधी पक्षातील आमदार असलो तरी तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. जर पूर्वीचा निधीच तुम्ही पश्चिम महाराष्ट्राच्या घशात घालणार असाल तर तुमच्याकडून भविष्यात जिल्ह्याच्या विकासाची अपेक्षा काय करावी, असेही नमिता मुंदडा म्हणाल्या. याप्रकरणी आपण राज्यपाल आणि उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही नमिता मुंदडा म्हणाल्या.

जिल्ह्याला कर्तव्यशून्य पालकमंत्री : मस्के 

सत्ता आल्यापासून एखादी नवी योजना किंवा निधी तर सोडाच; परंतु पंकजा मुंडे यांच्या कार्यकाळात मंजूर झालेली कामे व निधी रद्द करण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. जिल्ह्याविषयी आताच्या पालकमंत्र्यांना अजिबात कळवळा वाटत नाही, कोट्यवधी रुपयांचा निधी देखील वाचवू शकले नाहीत, हे तर त्यांचे सपशेल अपयश आहे, अशा शब्दांत मस्के यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली