पंकजा मुंडें संधीच सोनं करणार का ?

दत्ता देशमुख 
Sunday, 27 September 2020

सरकार विरुद्धच्या आवाजात जोर निर्माण करण्यासाठी पंकजा मुंडे सोबत असण्याचा भाजपला निश्चितच फायदा होईल यात शंका नाही. आता त्यांनीही या पदाच्या माध्यमातून पुन्हा जोशाने मैदानात उतरून संधीचे सोने करण्याची गरज आहे. त्यांच्या निवडीने राज्यभरातील समर्थकात ऊर्जा मिळाली आहे. 

बीड : मधल्या काळात भाजप आणि पंकजा मुंडे या दोघांनीही चांगलेच ताणून धरले; पण रंग पाहण्यासाठी असतो पिण्यासाठी नाही म्हणतात त्या उक्तीप्रमाणे अखेर पक्षाने त्यांचा सन्मान करीत त्यांना राष्ट्रीय सचिवपदावर स्थान दिले. त्यांची निवड भाजपच्या बळकटीसाठीही मोलाची ठरणार आहे. पंकजा मुंडे यांचे समर्थक अनेक जिल्ह्यांत आहेत. त्याचा परिणाम यापूर्वीही दिसला असून, भविष्यातही दिसेल. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची राजकीय वाटचालही राज्यातून पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस, उपाध्यक्ष अशा पदांवर झाली. पंकजा मुंडेही एक धडाडीच्या व आक्रमक नेत्या, उत्कृष्ट वक्त्या, व संघटन कौशल्य असलेल्या आहेत. भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांची ‘एल्गार’यात्रा आणि दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर ‘पुन्हा संघर्ष यात्रा’ काढून त्यांनी महाराष्ट्र पिंजलेला आहे. भाजप सत्ता आणण्यात त्यांचा वाटा विसरण्यासारखा नाही. मंत्री म्हणूनही त्यांचे काम उत्तम राहिलेले आहे. दरम्यान, २०१४ च्या विधानसभा निवडणुका तोंडावर त्यांच्या संघर्ष यात्रेला प्रतिसाद मिळाला; मात्र याच काळात पक्षातील काही नेत्यांमध्ये व त्यांच्यात दरी पाडणारी एक टिम सक्रिय झाली. सत्ता आली. त्या मंत्रीही झाल्या आणि महत्त्वाची खातीही मिळाली; पण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे यांच्यात जाणीवपूर्वक दुरावा तयार करून वाढविण्याचे प्रयत्न झाले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पंकजा मुंडे या लोकनेत्या असल्याने त्यांच्याबद्दल नेतृत्वाच्या मनात भीती निर्माण केली जाऊ लागली. त्यातूनच त्यांचे खाते कमी करणे, खात्याला त्यांच्या मर्जीविरुद्धचा प्रधान सचिव देणे असे प्रकार घडले. तसे टाळी एका बाजूने नाही तर दोन्ही बाजूने वाजली. दरम्यान, त्यांचा परळीतून पराभव झाला. पुढेही ही दरी कमी होण्याऐवजी वाढतच गेली. मधल्या काळात भाजप व पंकजा मुंडे यांच्यातील घटनांमधून हा वाढता दुरावा राज्याने पाहिला; पण आजघडीचे वास्तव पाहिले तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना दिल्लीचा आशीर्वाद आहे; पण पंकजा मुंडे लोकांत स्थान असलेल्या आणि फक्त नावावर लोक जमा करण्याची ताकद असणाऱ्या नेत्या.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यांनी अंग काढल्यानंतर भाजपची कशी फजिती होते हे मधल्या काळातील काही आंदोलनांतून दिसले; पण आता त्यांना राष्ट्रीय पातळीवर स्थान दिल्याने त्याचा आगामी काळातील नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांत फायदा होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. बीडसह, अहमदनगर, नाशिक, बुलडाणा, औरंगाबाद, परभणी, नांदेड, पुणे अशा राज्यातील अनेक जिल्ह्यांत त्यांना व्यक्तिगत मानणारा मोठा वर्ग आहे. सरकार विरुद्धच्या आवाजात जोर निर्माण करण्यासाठी त्यांच्या सोबत असण्याचा भाजपला निश्चितच फायदा होईल यात शंका नाही. आता त्यांनीही या पदाच्या माध्यमातून पुन्हा जोशाने मैदानात उतरून संधीचे सोने करण्याची गरज आहे. 

 

आपल्या निवडीमुळे कार्यकर्त्यांना होत असलेल्या आंनदात आनंद आहे. पक्षाने दाखविलेल्या विश्‍वासाबद्दल आभार. पदाच्या माध्यमातून पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सर्वोतोपरी योगदान देऊ, असा निश्‍चय करते. 
- पंकजा मुंडे, राष्ट्रीय सचिव, भाजप. 

(संपादन- प्रताप अवचार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pankaja Munde election to the National Executive will strengthen the BJP