परभणी : शेतकऱ्यांनी खरीप पिकांची काळजी घ्यावी- संतोष आळसे

गणेश पांडे
Wednesday, 7 October 2020

खरीप हंगामातील पिकांची काढणी करतांना शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी असे आवाहन परभणीचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी बुधवारी (ता.सात) केले आहे.

परभणी  ः आगामी सात - आठ दिवसात पावसाची शक्यता हवामान अंदाज केंद्राकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांची काढणी करतांना शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी असे आवाहन परभणीचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी बुधवारी (ता. सात) केले आहे.

परभणी जिल्ह्यात मागील महिण्यापासून पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे काही ठिकाणी खरीप हंगामातील सोयाबिन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे सध्या प्रशासनाच्यावतीने करणे सुरु आहेत. गेल्या दोन - तीन दिवसापासून जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खरीप हंगामातील सोयाबिन व ज्वारीचे पिक काढणीला परत एकदा वेग आला आहे. परंतू बुधवारी (ता.सात) परत एकदा हवामान अंदाज केंद्राच्यावतीने आगामी दोन दिवसात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हेही वाचाहिंगोलीत भाजपने जाळल्या शेती विधेयकाला स्थगिती देणाऱ्या प्रति

आवश्यक ती काढणी व मळणीची कामे पूर्ण करून घ्यावीत

भारतीय हवामान विभागाने ता. 10 ते 13 ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. सध्या खरीप हंगामातील सोयाबिन, ज्वारीची काढणी सुरु आहे. सदर पिकांचे नुकसान होऊ नये या करिता सर्व शेतकरी बांधवांनी आवश्यक ती काढणी व मळणीची कामे पूर्ण करून घ्यावीत व या कामी वेळ लागत असल्यास कापणी केलेल्या सोयाबीनची गंजी उंचीच्या ठिकाणी ताडपत्रीने झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. जेणे करूण सोयाबीन पाण्याच्या संपर्कात येणार नाही. व होणारे नुकसान टळेल असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

शनिवारी मुसळधार पावसाची शक्यता

परभणीसह लातूर, बीड जिल्ह्यात शनिवारी (ता.दहा) वादळीवार्‍यासह पावसाची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने वर्तवली आहे. दरम्यान, बुधवारपासून ते शुक्रवारपर्यंत  मराठवाड्यात कोरड्या हवामानाची शक्यताही वर्तवली आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार मराठवाडयात नांदेड जिल्हयात ता 07 ऑक्टोबर रोजी तर लातूर, बीड, परभणी जिल्ह्यात ता. 10 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता आहे.मराठवाड्यात बुधवारपासून ते शुक्रवारपर्यंत या कालावधीत कोरड्या हवामानाची शक्यता आहे.

येथे क्लिक करानांदेड : गोळीबार प्रकरणातील चार आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी

स्वत: च्या शेतमालाची काळजी घ्यावी

जिल्हयातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पिके काढणी तातडीने उरकावी. येत्या 10 ते 13 ऑक्टोबर दरम्यान पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कृषी विभागाने दिलेल्या सुचनांचे पालन करून स्वताच्या शेतमालाची काळजी घ्यावी ही विनंती.

- संतोष आळसे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, परभणी

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani: Farmers should take care of kharif crops- Santosh Aalse parbhani news