`त्या’ गोळीबार प्रकरणातील एकाला पोलिस कोठडी

प्रल्हाद कांबळे
Thursday, 26 March 2020

आरोपीपैकी मोहम्मद हाफीजोद्दीन मोहम्मद खमरोद्दीन ( वय ७०) यांना रात्रीच पोलिसांनी अटक केली होती. त्यांना गुरुवारी (ता. २६) सकाळी ११ वाजता न्यायाधीश एम. पी. शिंदे यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ता. २८ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे.

नांदेड : संपत्तीच्या वादातून दोन सख्ख्या चुलतभावात झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. २५) रात्री साडेदहा वाजता खूनासह आदी कलमान्वये सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीपैकी मोहम्मद हाफीजोद्दीन मोहम्मद खमरोद्दीन ( वय ७०) यांना रात्रीच पोलिसांनी अटक केली होती. त्यांना गुरुवारी (ता. २६) सकाळी ११ वाजता न्यायाधीश एम. पी. शिंदे यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ता. २८ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

शहरात संचारबंदी असल्याने सर्वत्र शांतता होती. परंतु देगलूर नाका भागात खुदबईनगर परिसरात झालेल्या गोळीबाराने नांदेड दणाणले आणि एकच गोंधळ उडाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खुदबेनगर भागात अली फारुखी (जर्देवाला) व गौस इनामदार या दोन चुलतभावांमध्ये संपत्तीचा जुना वाद आहे. हा वाद मागील सहा ते सात वर्षापासून धुमसत होता. गौस इमानदार यांच्या नातेवाईकांची औषधी दुकान आहे. बुधवारी (ता. २५) दुपारी चारच्या सुमारास पुन्हा हे एकमेकांसमोर आले. 

हेही वाचा - Video : कर्तव्यावरील महिला कर्मचाऱ्यालाच महिला पोलिसांचा दंडुका

जखमीवर उपचार सुरू 

सुरवातीला हाणामारी झाली. त्यानंतर तलवार, हॉकी स्टीकने मारून जखमी केले. एवढेच नाही तर पिस्तुलद्वारे गोळीबार करण्यात आला. यावेळी अली जर्देवाला याचा भाऊ मोहम्मद जुनेद (वय ३०) याला तलवारीचा जबर मार लागून गोळीचा तो शिकार झाला आणि जागीच ठार झाला तर दुसरा भाऊ मोहमंद हाजी अब्दुल रहीम याच्या पाठीत एक गोळी व खांद्यावर तलवारीचा वार बसल्याने तो गंभीर जखमी झाला. यात गौस इनामदार हासुद्धा गंभीर जखमी झाला. 

येथे क्लिक करासरपंचाची प्रवाशांना विनंती कशासाठी? ते वाचा

खून, खूनाचा प्रयत्न, भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा 

घटनास्थळी पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, अभिजीत फस्के, पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे, पंडीत कच्छवे, द्वारकादास चिखलीकर यांनी भेट देऊन आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पथक स्थापन केले. रात्री उशिरा मोहम्मद हाजी अब्दुल रहीम याच्या फिर्यादीवरुन युनुस इनामदार, गौस इनमदार, अनिस इनामदार, मोहम्मद हाफीजोद्दीन मोहम्मद खमरोद्दीन इनामदार, मुजाहीद सरोवर इनामदार आणि आदील सर्व राहणार खुदबेनगर चौरस्ता, देगलुर नाका, नांदेड यांच्याविरुद्ध खून, खूनाचा प्रयत्न, भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police custody for one of the 'those' shootings nanded crime news