एचआयव्हीबाधितांची दिवाळी केली गोड, खाकीतल्या माणूसकीचे दर्शन

दत्ता देशमुख
Saturday, 14 November 2020

खाकी वर्दीच्या आतही माणूसच असतो आणि त्यालाही माणूकी असते. दु:ख - वेदनेची जाण अनेक घटनांतून खाकी वर्दीला झाल्याची उदाहरणे जिल्ह्यात घडतात. असेच खाकीतील पोलिस निरीक्षक भारत राऊत यांनी एचआयव्हीसह जगणाऱ्या बालकांची दिवाळी गोड केली. 

बीड : खाकी वर्दीच्या आतही माणूसच असतो आणि त्यालाही माणूकी असते. दु:ख - वेदनेची जाण अनेक घटनांतून खाकी वर्दीला झाल्याची उदाहरणे जिल्ह्यात घडतात. असेच खाकीतील पोलिस निरीक्षक भारत राऊत यांनी एचआयव्हीसह जगणाऱ्या बालकांची दिवाळी गोड केली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

परिसरातील इन्फंट इंडिया या एचआयव्हीसह जगणाऱ्या बालकांसाठी काम करणाऱ्या संस्थेत ६५ बालके आहेत. नुकतेच येथील एका बालकाचे निधन झाल्यामुळे यंदा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय संस्थेने घेतला होता. मात्र, खाकीतील माणूसकीने दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत यांनी या मुलांसाठी फराळासह सॅनिटायझर भेट दिले. त्यांच्या या उपक्रमाला पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी सपत्नीक हजेरी लावली. फराळ वाटपासोबत अधिकाऱ्यांच्या धीर देणाऱ्या आपुलकीच्या संवादाने चिमुकले भारावून गेले.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कळत-नकळत जन्मदात्यांकडून झालेल्या चुकीची शिक्षा भोगणाऱ्या व एचआयव्हीसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या मुला-मुलींना संध्या बारगजे व दत्ता बारगजे या दाम्पत्याने इन्फंट इंडिया या संस्थेत आश्रय दिला आहे. सध्या ६५ चिमुकले तेथे वास्तव्यास आहेत. एचआयव्हीबाधित असल्याने समाज व कुटुंबाकडून दुर्लक्षित झालेल्या या चिमुकल्यांचे या संस्थेत पालन- पोषण केले जाते. उपचार सुविधांसोबतच शिक्षणही देण्यात येते. या संस्थेच्या कार्याने प्रभावीत झालेल्या भारत राऊत या संवेदनशील पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्यासोबत दिवाळी व वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले आणि मागच्या नऊ वर्षांपासून ते अखंडीतपणे हा उपक्रम राबवितात.

विशेष म्हणजे त्यांच्या पोलिस दलात जालना, सोलापूर, गडचिरोली पुन्हा सोलापूर आदी ठिकाणी बदल्या झाल्या. परंतु, त्यांनी या उपक्रमात कधी खंड पडू दिला नाही. यंदाही दिवाळी फराळासह सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अपर अधीक्षक सुनील लांजेवार, गुन्हे शाखा निरीक्षक भारत राऊत, पोलिस निरीक्षक संतोष साबळे, उपनिरीक्षक संतोष जोंधळे, सहायक उपनिरीक्षक संजय जायभाये, बालाजी दराडे, अतुल हराळे, प्रसाद कदम, नारायण कोरडे, गहिनीनाथ गर्जे उपस्थित होते. आठ दिवसांपूर्वी एका चिमुकल्याचे निधन झाले. त्यामुळे यंदा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पोलीस निरीक्षक भारत राऊत यांच्यामुळे दिवाळी गोड झाली. एका डोळ्यात आसू व दुसऱ्यात हसू अशा वातावरणात फराळ व साहित्य वाटपाचा कार्यक्रम झाला.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

पोलीस अधिकाऱ्यांनी खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडविले, अशी भावना इन्फंटचे संचालक दत्ता बारगजे यांनी व्यक्त केली. तर, २०११ मध्ये इन्फंट इंडिया संस्थेबद्दल ऐकले होते. संस्थेला भेट दिल्यावर बारगजे दाम्पत्याचे कार्य जवळून पाहता आले. सरकारी नोकरी सोडून जे कुटुंब एचआयव्हीबाधितांसाठी आयुष्य वाहून घेते, त्यांना हातभार म्हणून हा उपक्रम सुरु केला. कुटुंबाचाही यासाठी आग्रह असतो. अशा सामाजिक प्रकल्पांच्या पाठीशी उभे राहणे हे कर्तव्य आहे, अशी भावना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत यांनी व्यक्त केली.

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police officer vision of humanity HIV positive patient make Diwali sweet