उमरगा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या व्युहरचनेसाठी विविध पक्षांच्या ‘जोर’ बैठका

अविनाश काळे
Saturday, 19 December 2020

उमरगा तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे पडघड सुरू झाले असुन इच्छुकांनी पारावरच्या गप्पा वाढवल्या आहेत.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे पडघड सुरू झाले असुन इच्छुकांनी पारावरच्या गप्पा वाढवल्या आहेत. थंडीच्या वातावरणात निवडणुकीच्या गरमागरम चर्चा सुरू झाल्या आहे. प्रत्येक गावांतील ग्रामपंचायतींवर वर्चस्वासाठी विविध पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडीचा प्रयोग स्थानिक पातळीवर फारसा यशस्वी होईल असे वाटत नाही. स्थानिक राजकारण, एकमेकांतील हिरस यामुळे पक्षाच्या स्वतंत्र आघाडी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान गत पंचवार्षिक निवडणुकीत सात ग्रामपंचायती बिनविरोध आल्या होत्या.

 

 

त्या गावात पुन्हा बिनविरोधची परंपरा सुरू ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्र देण्याचे व स्विकारण्याचे काम सुरू होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजप या प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या दृष्टीने ग्रामपातळीवर आघाडी करण्याचे नियोजन सुरू केले आहे. विविध पक्षाच्या अंतर्गत बैठका सुरु झाल्या असून राज्यातील ‘महाविकास’च्या प्रयोगाचे अनुकरण ग्रामपंचायतींतही करण्याची चर्चा होत आहे.

 

 

मात्र तीन पक्षाचे तेरा प्रमुख कार्यकर्त्यांत दिलजमाई होण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. भाजपाला वगळून आघाडी हा प्रयोग सर्वच ठिकाणी होईल असे वाटत नाही. शनिवारी (ता.१९) राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांचे वेगवेगळे मतप्रवाह समोर आले. सर्वच पक्षाचे प्रमुख कार्यकर्त्यांचे मत अजमावून घेत असून तूर्त ज्या त्या वॉर्डातील आरक्षित जागेसाठीच्या उमेदवारांची नावे, त्यांच्या कागदपत्राची जमवाजमव केली जातेय.

बिनविरोध ग्रामपंचायतींसाठी व्हावेत प्रयत्न
कोरोनाच्या सहा महिन्यांच्या काळात ग्रामस्थांमध्ये सुरक्षिततेची एकजूट दिसून आली. मात्र आता निवडणुकीच्या निमित्ताने तीच एकजूट कायम ठेवण्यासाठी पक्षीय, अंतर्गत गटातटांचे राजकारण बाजूला ठेवावे लागणार आहे. गत पंचवार्षिक निवडणुकीत बोरी, रामपूर, कराळी, जगदाळवाडी, दाबका, एकोंडी (जहागीर), हंद्राळ ही सात गावे बिनविरोध आली होती. आता याच गावात बिनविरोध ग्रामपंचायतीची परंपरा ठेवण्यासाठी प्राथमिक प्रयत्न सुरू आहेत. सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर काढण्यात येणार असल्याने सरपंचपदांसाठी इच्छूक असणाऱ्यांचा बिनविरोधसाठी विरोध होईल असे वाटत नाही. पण त्यात मीच सदस्य राहीण असा हट्टही अडचणीचा ठरु शकतो.

 

 

निवडणुकीच्या निमित्ताने होणारे वाद, गटाचे राजकारण टाळण्यासाठी गत पंचवार्षिक निवडणुकीत ग्रामस्थांच्या एकोप्यातून ग्रामपंचायत बिनविरोध काढण्यात आली. मात्र मातोळा, बोरी ते नाईचाकूर हा मार्ग व्यवस्थित करून देण्याचा लोकप्रतिनिधींनी शब्द पाळला नाही, तरीही पुढच्या कामाच्या अपेक्षेने ग्रामपंचायत बिनविरोध काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
- गणेश नटवे, माजी सरपंच, बोरी

 

 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political Parties Take Continuous Meeting For Grampanchayat Election