जेवळी परिसरातील स्मृतिवनाचे वाजले बारा! 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 December 2020

वनविभागाचे दुर्लक्ष ः शासनाच्या लाखो रुपयांचे नुकसान 

जेवळी (उस्मानाबाद) :  शासनाने लाखो रुपये खर्च करून लोहारा तालुक्यातील भूकंपापूर्वीच्या जुन्या सोळा गावांतील गावठाणात स्मृती वन योजना राबविली. पण, वन विभागाच्या दुर्लक्षामुळे योजनेचा बट्ट्याबोळ झाला आला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे एखाद्या शासकीय योजनेची वाट कशी लागते याचे उत्तम उदाहरण येथील स्मृती वने आहेत. वृक्ष लागवडी नंतर आता येथील ही वनक्षेत्र गायरान म्हणून वापरात आहेत. मोठ्या प्रमाणात जनावराच्या चराईने येथे लावलेले बहुतांशी रोपे नष्ट झाली आहेत. एकीकडे मोठा खर्च व गाजावाजा करीत वृक्ष लागवड केली जात असताना दुसरीकडे मात्र वृक्ष वाढीकडे साफ दुर्लक्ष केली जात आहे. 

शेतकऱ्यांच्या मानगुटीवर ‘आरटीओ’चे भूत, ओव्हरलोडिंगच्या नावाखाली लूट

भूकंपानंतर नव्या ठिकाणी पुनर्वसन झालेल्या उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील सर्व गावांचे जुने गावठाण हे शासनाच्या ताब्यात होते. ही जुनी वस्ती पंचवीस वर्षीपासून भकास बनली होती. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने या वस्तीची मोठ्या प्रमाणात अतिक्रमणासह दुरवस्था झाली होती. भूकंपात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या स्मृती कायम ठेवण्यासाठी शासनाकडून दोन वर्षांपूर्वी भूकंप पुनर्वसन विभागाने स्मृतिवन योजना राबवून या जुन्या वस्तीत स्मृती उद्यान उभारण्याचा निर्णय घेतला. या नुसार लोहारा तालुक्यात ‘अ’ वर्गातील जेवळीसह राजेगाव, चिंचोली (रेबे), सास्तूर, उद्तपूर, माकणी, होळी, कोंडजी, एकुंडी, चिंचोली काटे, तावशीगड, सालेगाव, कानेगाव, मुरशेदपूर, तोरंबा व सय्यद हिप्परगा असे १६ गावांचा समावेश आहे.

बिबट्या सापडेना, शोधमोहीम गुंडाळण्याची तयारी; पंधरा दिवसांच्या मोहिमेत हाती काहीच नाही

यासाठी तालुक्यात एकूण १२८. ७१ हेक्टर क्षेत्र उपलब्ध झाले असून, सर्वांत लहान क्षेत्र सय्यद हिप्परगा ३.१८ हेक्टर तर सर्व मोठे क्षेत्र जेवळी २६. ४७ एवढा आहे. वन विभागाकडून भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने लोहारा तालुक्यातील या सोळा गावांचे जुने गावठाण हे वृक्ष लागवडी योग्य बनविण्यात आले. ३० जुलै २०१९ ला ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत मोठा गाजावाजा करून वृक्ष लागवडीला सुरवात करण्यात आले होते. येथे मिश्र जातीचे विविध झाडे लावण्यात आली आहेत. शासनाच्या या स्मृती उद्यानामुळे भकास बनलेला भूकंपापूर्वीच्या गावठाण आता विविध वृक्षवल्लीने बहरून गावच्या सौंदर्यात मोठी भर पडणार अशी अपेक्षा होती. परंतु, आता वन विभागाच्या दुर्लक्षामुळे महत्त्वाकांक्षी स्मृतीवन योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

त्या-त्या ठिकाणच्या संबंधित कर्मचाऱ्यांना पाठवून या बाबत आढावा घेऊन योग्य कारवाई करण्यात येईल. बजेट उपलब्ध नसल्याने येथील हंगामी मजुरांना कामावरून कमी करण्यात आले आहे. प्रत्येक ठिकाणी तारेच्या कुंपणासाठी आराखडा तयार करून वरिष्ठाकडे पाठविण्यात आले असून, मंजुरीनंतर येथील कुंपणाचे काम हाती घेण्यात येईल. 
- आर. टी. शिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी, उमरगा 

(संपादन-गणेश पिटेकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poor condition of the memorial at Jawali