वैद्यकीय प्रवेश पूर्वपरीक्षा ‘नीट’ पुढे ढकला....

अभय कुळकजाईकर
गुरुवार, 26 मार्च 2020

कोरोनाच्या विषाणुमुळे जगभरात समस्या निर्माण झाली असून विद्यार्थी आणि पालक देखील संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे नीट परिक्षा किमान एक महिना पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांच्या वतीने करण्यात आली आहे. 

नांदेड : कोरोनाचा संपूर्ण जगावर परिणाम होत आहे. विद्यार्थी व पालक संभ्रमावस्थेत सुट्यांच्या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नीट परिक्षेची तयारी करता आली नसल्याने नीट परीक्षा किमान एक महिना पुढे ढकलण्याची विद्यार्थी व पालकांकडून मागणी होत आहे. 

नीटच्या परिक्षेसाठी विद्यार्थी दोन वर्षापासून मेहनत घेत आहेत. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. ग्रामिण भागात असल्यामुळे अभ्यासाचे तीन तेरा वाजले आहेत. ऐन सराव परीक्षेच्या तोंडावर आलेल्या कोरोनामुळे शहरी तसेच प्रामुख्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवरच वेळेअभावी व पुरेशा तयारी अभावी अभ्यासाचे संकट ओढवले आहे.

हे ही वाचा - भाजीपाल्यांचे दुकाने अंतरावर सुरु करावेत- जिल्हाधिकारी डॉ. विपीन

विद्यार्थी झाले प्रभावित 
कोरोना पार्श्वभूमीवर सरकारने ता. १४ मार्च रोजी शाळा महाविद्यालयांना सुट्या जाहीर केल्या होत्या. त्या सुट्याचे सर्व स्तरावरुन स्वागत झाले असले तरी मे महिन्यात येऊ घातलेल्या नीट परीक्षेसाठी देशभरातून पंधरा लाख तर महाराष्ट्रातून साडेतीन लाख विद्यार्थी बसणार आहेत. देशातील सर्वात मोठी परीक्षा असल्याने मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी प्रभावित झाले असून संबंधित मंत्रालयाने तथा विभागाने यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याची चर्चा नीट परीक्षार्थी विद्यार्थी, पालक व शिक्षक करत आहेत.

विद्यार्थ्यांना न्याय मिळावा
या परीक्षेसाठी अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्षांचा अभ्यासक्रम असून विद्यार्थी दोन वर्ष या वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेसाठी तयारी करत असतात. सदर परीक्षेसाठी एनसीइआरटी अभासक्रम असून त्यासाठी विद्यार्थी खासगी शिकवणीची मदत घेत तयारी करतात. पण कोरोनामुळे ओढवलेले संकट त्यात शाळा महाविद्यालयासह खासगी क्लासेसला दिलेल्या सुट्ट्यांमुळे पुरेशी तयारी न झाल्याने विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 

हे ही वाचा - दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

अभ्यासाचे संकट ओढवले
ता. १४ मार्चपासून ता. १४ एप्रिल या काळात काही शहरी भागातील विद्यार्थ्यांनी इंटरनेट वा मोबाईलच्या साहाय्याने थोडीफार तयारी केली आहे. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन सुविधेअभावी तयारी करता आली नाही. त्यामुळे त्यांच्यावर अभ्यासाचे संकट ओढवले आहे. यामुळे ग्रामिण विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, यासाठी सरकारने नीट परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे. 

...तर मोठा दिलासा मिळेल
आम्ही ऑनलाइन सराव परीक्षा व व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून सुट्यांच्या काळात तयारी करून घेतली असली तरी ग्रामीण भागातील ७५ ते ८० टक्के विद्यार्थी या पासून वंचित राहिले आहेत. तसेच परीक्षा पुढे ढकलल्यास विद्यार्थ्यांना तयारीसाठी वेळ मिळाला नसल्याने मोठा दिलासा मिळेल, अशी खात्री आहे. 
- दशरथ पाटील, संचालक, आयआयबी, नांदेड - लातूर. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Postpone 'admission' medical admission test ...