तुळजाभवानी मंदिरात पूर्णाहुती सोहळा, मातेची महिषासूरमरदिनी अलंकार महापुजा

जगदीश कुलकर्णी
Saturday, 24 October 2020

तुळजाभवानी मंदिरात पूर्णाहुती सोहळा शनिवारी (ता.२४) पार पडला. तुळजाभवानी मातेच्या मंदिरात शनिवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास तुळजाभवानी मातेच्या होमकुंडावर पूर्णाहुती सोहळ्यास प्रारंभ झाला.

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी मंदिरात पूर्णाहुती सोहळा शनिवारी (ता.२४) पार पडला. तुळजाभवानी मातेच्या मंदिरात शनिवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास तुळजाभवानी मातेच्या होमकुंडावर पूर्णाहुती सोहळ्यास प्रारंभ झाला. मंदिरात नवरात्राच्या निमित्ताने करण्यात आलेल्या भवानी सहस्त्रनाम, दुर्गा सहस्त्रनाम, मूळमंत्र, नवग्रह पाठ याचे हवन करण्यात आले. भाताची आणि तुपाची आहुती होमकुंडावर जिल्हाधिकारी आणि तुळजा भवानी मंदिर समितीचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर आणि त्यांच्या पत्नी प्रियांका दिवेगावकर यांच्या हस्ते देण्यात आली.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उदगीरचा दसरा महोत्सव रद्द

यावेळी श्री. दिवेगावकर यांनी सपत्निक सर्व धार्मिक विधी पूर्ण केले. तुळजाभवानी मातेच्या मंदिरात होमकुंडावर सुनित पाठक, रूषिकेश दादेगांवकर धनेश्वर, नागेश नंदीबुवा, राजेश नंदीबुवा, कोल्हापूरच्या छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टचे राजोपाध्ये राजू उर्फ महेश प्रयाग, अशोक ओवरीकर यासह अनेकांनी वेदपठण केले. होमकुंडावर भोपळे, कव्हाळे आणि तुपाची पूर्णाहुती देण्यात आली. हैदराबादच्या राजा रावबहाद्दूर धम॔वंत धर्मकर्ण यांच्या घराण्याच्या वतीने अनंत कोंडो आणि त्यांच्या पत्नी अश्विनी कोंडो यांनी तर कोल्हापूरच्या छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रतिक प्रयाग आणि अंजली प्रयाग यांनी त्यांच्या वेगवेगळ्या होमकुंडावर पूर्णाहुती दिली.

प्रारंभी तुळजाभवानी मातेच्या होमकुंडावर पूर्णाहुती झाली. त्यानंतर कोल्हापूरच्या छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पूर्णाहुती झाली तर हैदराबादच्या रावबहाद्दूर संस्थानच्या वतीने पूर्णाहुती सोहळा झाला. या तिन्ही ही पूर्णाहुती सोहळ्यास मंदिर समितीचे कौस्तुभ दिवेगांवकर आणि प्रियांका दिवेगांवकर हे परंपरेने हजर होते. तुळजाभवानी मंदिरात पूर्णाहुती सोहळा झाल्यानंतर मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर आणि त्यांच्या पत्नी प्रियांका दिवेगांवकर यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.

शेतकऱ्यांना मिळणार सोडतीने हरभरा बियाणे, कृषी विभागाकडून याद्या तयार करणे सुरु

तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज दुर्गाष्टमी असल्याने तुळजाभवानी मातेची महिषासुरमरदिनी अलंकार महापुजा बांधण्यात आली. तुळजाभवानी मातेने महिषासुराचा वध केला असे सांगण्यात येते. महिषासुरमरदिनी अलंकार महापुजा सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत मांडण्यात आली होती. तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दुर्गाष्टमीच्या दिवशी रात्री प्रक्षाळ पुजेच्या नंतर देण्यात येणारे नैवेद्य महंतांना देण्यात येतात. दरम्यान येथील रामवरदायिनी मंदिरात आणि गरीबनाथ मठात पूर्णाहुती शुक्रवारी (ता.२३) पार पडली. येथील मठामध्ये पूर्णाहुती एक दिवस आधीच होते. तुळजाभवानी मंदिरात उपाध्ये मंडळाचे उपाध्यक्ष मकरंद प्रयाग, सरव्यवस्थापक सौदागर तांदळे, धार्मिक व्यवस्थापक सिद्देश्वर इंतुले आदी उपस्थित होते.

भाविकांची अनुपस्थिती
तुळजाभवानी मंदिरात नवरात्राच्या निमित्ताने झालेल्या पूर्णाहुती सोहळ्यास भाविकांना कोरोनामुळे मंदिरात प्रवेश नसल्याने भाविकांची उपस्थिती नव्हती. तुळजाभवानी मंदिरात सकाळी दररोज दही दुधाचे असणारे स्थानिकांचे अभिषेक मंदिरात प्रवेश बंद असल्याने यंदा होऊ शकले नाहीत. तसेच रात्री छबिन्याच्या वेळी पोत ओवाळणे आणि दररोज रात्री प्रक्षाळ पुजेस असणारी उपस्थिती यावर यंदा निर्बंध आले. मंदिरात प्रवेशच नसल्याने अनेकांच्या दरवर्षी असणाऱ्या परंपरेला कोरोनामुळे बाधा आली आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Purnahuti Sohala In Tuljabhavani Mata Temple Tuljapur