पावसाने लावली हळदीची वाट ! जळकोट तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त !

हळद.jpg
हळद.jpg

जळकोट : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा मोठी मेहनत घेऊन हळद लागवडीचा नवा प्रयोग यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. परंतु अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकरी बांधवांच्या आनंदावर पाणी फिरले आहे. एका अर्थाने पावसाने हळद पिकाची वाट लावली असून शेतकरी चिताग्रस्त झाला आहे. तालुक्यात जवळपास ११० हेक्टरवर हळद लागवड झालेली असल्याचे कृषी अधिकार्यांनी सांगीतले. 

मागील काही दिवसापासून सर्वत्र पावसाने कहर घातला आहे. खरीपातील मूग, उडीद, सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. उभ्या काढणी योग्य सोयाबीनला अनेक ठिकाणी कोंब फुटले आहेत. निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी चिंतेत आहे. घोणसी भागात प्रशासनाने पिकाचे पंचनामे करण्याचे काम सुरु केले आहेत. उपविभागीय अधिकारी प्रविण मेगशेट्टी, तहसिलदार संदीप कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार आदिनी भेट देऊन पहाणी केली. तालुक्यात पीक पाहणी करुन सरसकट पीकविमा मंजूर करण्याची मागणी करण्यात येत आहे. राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी शासनस्तरावर मदतीसाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.

हळदीचे उत्पादन घटण्याची भीती
तालुक्यात गेल्या काही वर्षापासून ऊसाला पर्याय म्हणून अनेक  शेतकऱ्यांनी हळदीचे पीक घेण्याचा नवा प्रयोग यशस्वी केला. परंतु यावर्षी हा प्रयोग अडचणीत आला आहे. गेल्या आठ दिवसापासून पावसाने कहर केला आहे. पाण्याचा निचरा न होणारी व भारी सखल जमिनीवर पाणी साचून या पिकाची नासाडी होत आहे. शेतकर्यांनी आपल्या शेतीत नव्या प्रयोगाचे धाडस करावे की नाही? असा प्रश्न डोंगरी तालुक्यातील  शेतकऱ्यांना पडला आहे. मोठा खर्च करुन कष्टाने या पिकाची जोपासना केली ऎन बहरात असलेल्या या पिकाचे सततच्या पावसाने नुकसान होणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अनेक ठिकाणी पिकात पाणी थांबले आहे. 

हळद जेथे मोठ्या प्रमाणावर पिकवली जाते. त्या सांगली जिल्ह्यात वांजरवाडा (ता. जळकोट) येथील प्रयोगशील युवा शेतकरी रामेश्वर टेकाळे यांच्याकडून उत्कृष्ठ बेणे तेथील शेतकर्यांनी खरेदी केले. असे आश्चर्यकारक यश मिळवले. पावनेतीन एकर क्षेत्रावर ९५ क्विंटल इतके विक्रमी उत्पन्न घेणारे श्री टेकाळे हे अनेक  शेतकऱ्यांना हळदीच्या लागवड व मशागत याबाबतचे मार्गदर्शन करतात. त्यांनी यावर्षीच्या पावसाने झालेल्या नुकसानीबाबत ह्रदयद्रावक कहाणी मांडत हळद उत्पादक कसे अडचणीत सापडले? याबाबत आपबिती सांगितली. 

तालुक्यात काही शेतकऱ्यांनी हळद लागवड करुन एक नवा प्रयोग यशस्वी केला आहे. यंदा एकुण ११० हेक्टरवर हळद लागवड झालेली आहे. या पावसामुळे या हळद पिकाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या पिकाला विमा कवच नसल्याने अडचण आहे.

-आकाश पवार (तालुका कृषी अधिकारी जळकोट)

गेल्या आठवड्यापासून पडणाऱ्या पावसाने मोठे नुकसान होत असून आमच्या हळदीत पाणी साचले आहे. जास्त पावसामुळे हळदीवर येणारे रोग वाढतात. कंधकुज यामुळे कंद तयार झालेले पूर्णपणे सडून खराब होतात. मुळकुज यामुळे तयार झालेल्या मुळा खराब होतो. परिणामी उत्पादनात मोठी घट होते. अडचणीत शासनाने आर्थिक मदत करण्याची गरज आहे.
रामेश्वर टेकाळे (हळद उत्पादक शेतकरी)

(संपादक-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com