म्हशीवरून मृगाची दमदार एंट्री 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

जालना शहरासह जिल्ह्यात बुधवारी (ता. १०) दुपारी साडेचार वाजेपासून ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावण्यास सुरवात केली. यंदा रविवारपासून (ता. सात) सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश झाला. म्हैस वाहनावरून मृग नक्षत्राने दमदार एंट्री काही भागात घेतली आहे.

जालना - जिल्ह्यात बुधवारी (ता. १०) दुपारी साडेचार वाजेपासून ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावण्यास सुरवात केली. यंदा रविवारपासून (ता. सात) सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश झाला. म्हैस वाहनावरून मृग नक्षत्राने दमदार एंट्री काही भागात घेतली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील लागवड, पेरणीला वेग येणार आहे. 

अंबड तालुक्यातील रोहिलागड परिसरात बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. परिसरासह शेतशिवारात ठिकठिकाणी पावसाचे पाणीही साचले होते. दरम्यान, या पावसामुळे कपाशी, अद्रक लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. तर काही शेतकरी गुरुवारपासून लागवड करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 

हेही वाचा : पीककर्जावर शेतकऱ्यांची मदार

मृग नक्षत्रातील दमदार सरी बुधवारी सायंकाळी पाच वाजेपासून कोसळल्याने अंबड तालुक्यातील अंकुशनगर परिसरात शेतकऱ्यांमध्ये आशा पल्लवित झाल्या आहेत. परिसरात सायंकाळी पाच वाजेपासून हलके वारे व पावसाला सुरवात झाली. हा पाऊस अंकुशनगर परिसरातील सर्वच भागात पडला. शिवाय गहिनीनाथनगर, भगवाननगर, महाकाळा, चुर्मापुरी, साष्टपिंपळगाव, आपेगाव, बळेगाव या ठिकाणी चांगला पाऊस झाल्याने शेतकरीवर्गात आनंद व्यक्त होत आहे. या भागात अजून पाऊस चांगला होईल, याची अपेक्षा शेतकरीवर्गाला लागली आहे. दरम्यान, पावसाच्या हजेरीबरोबर परिसरातील वीज गुल झाली. अंकुशनगर परिसरात अनेक ठिकाणी विजेचे खांबही पडल्याने वीजपुरवठा विस्कळित झाला आहे. 

हेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील 

वडीगोद्री परिसरात बुधवारी पाऊस पडल्याने शेतकरीवर्गात समाधान व्यक्त होत आहे. या भागात जवळपास शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण होत आहेत. शेतात कपाशी लागवड करण्यासाठी पावसाची गरज होती. भागात पावसाला सुरवात झाल्याने शेतकऱ्यांना आनंद झाला आहे. 

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगावसह परिसरात बुधवारी (ता. दहा) दिवसभराच्या कडक उन्हानंतर सायंकाळी सहा वाजेपासून आकाशात ढगांनी गर्दी केली, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते अधूनमधून जोरदार पावसाला सुरवात झाली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. पावसाने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. पेरणीपूर्व मशागतींना सुरवात झाली आहे. 

अंबड तालुक्यातील शहागड परिसरात बुधवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दिवसभर परिसरात उकाड्याने ग्रामस्थ ग्रामस्थ त्रस्त होते. सायंकाळी पाचनंतर आकाशात ढग जमा होऊ लागले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जोराच्या वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी पडल्या. शहागडसह परिसरातील पाथरवाला बुद्रुक, पाथरवाला खुर्द, वाळकेश्र्वर, कुरण, गोरी, गांधारी, आपेगाव, बळेगाव येथे पाऊस पडला. काही भागात वीजपुरवठाही विस्कळित झाला होता. खरिपाच्या तयारीत पावसाच्या हलक्या सरी आल्याने शेतकऱ्यांत आशादायक वातावरण निर्माण झाले. 

जालना तालुक्यातील रामनगर परिसरात बुधवारी पावसाची रिमझिम झाली. परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. दिवसभर कडक ऊन पडल्यामुळे उकाड्यामुळे ग्रामस्थ घामाघूम झाले होते. दरम्यान, सायंकाळी सहानंतर पडलेल्या रिमझिम हलक्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain in Jalna district