जालना जिल्ह्यात कुठे रिमझिम, मुसळधारही

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

जालना शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांत मंगळवारी सोसाट्याच्या वाऱ्यानंतर कुठे रिमझिम, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. वादळामुळे शहरात अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. तर काही ठिकाणी झाडे मोडली.

जालना - जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत असताना मंगळवारी (ता. सात) ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्‍वरूपाचा पाऊस झाला. 

जालना शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांत दुपारी चार वाजेच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यानंतर कुठे रिमझिम, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. वादळामुळे शहरात अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. तर काही ठिकाणी झाडे मोडली. अंबड शहरासह वडीगोद्री, शहागड, पाथरवाला परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. तर भोकरदन, परतूर, मंठा व घनसावंगीत ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्‍वरूपाचा पाऊस झाला आहे. 

हसनाबाद येथे मंगळवारी दिवसभर ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. मंठा तालुक्यात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी पाच वाजता पावसाचा शिडकावा झाला. वडीगोद्री भागात रिमझिम पाऊस झाला. या भागात आता जोरदार पावसाची गरज आहे. तीर्थपुरी येथे मंगळवारी साडेपाच वाजेच्या सुमारास हलकासा पाऊस झाला. ढगाळ वातावरण असल्याने जोरदार पावसाची अपेक्षा शक्यता आहे. कुंभार पिंपळगावसह परिसरात मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान जोरदार वारे सुरु झाले. त्यानंतर सहा वाजता पावसाची रिमझिम झाली. 

हेही वाचा : पीककर्जावर शेतकऱ्यांची मदार

अंबड तालुक्‍यातील शहागड परिसरात मंगळवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे परिसरातील पिकांना जीवदान मिळाले असून, पिकांच्‍या आंतरमशागतीच्‍या कामांना वेग येणार आहे. मंगळवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यासह परिसरातील साष्टपिंपळगाव, बळेगाव, चुर्मापुरी, शहागड, पाथरवाला बुद्रुक, कुरण, वाळकेश्र्वर, गोरी, गंधारीसह परिसरात पावसाचे जोराचे फटकारे सुरू झाले. शेतमजूर, शेतकरी या पावसात वाट काढत घराकडे परतले. काही ठिकाणी घराचे बांधकाम सुरू असल्याने त्यावर ताडपत्री, मेणकापड टाकण्यासाठी धावपळ उडाली.  घनसावंगी शहर व तालुक्‍यात मंगळवारी (ता. सात) दुपारी जोरदार पाऊस झाला. मागील आठवड्यापासून तालुक्‍यात पावसाची सतत हजेरी लागत आहे. परिणामी शेतात वाफसा होत नसल्याने शेतकऱ्यांची शेतीची कामे खोळंबली आहेत. 

हेही वाचा : जुईत पाऊस थुईथुई... 

वालसावंगी परिसरात मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास समाधानकारक पावसाने हजेरी लावली. अर्धा तास पाऊस पडला. पडलेल्या पावसामुळे पिकांना चांगला फायदा होणार आहे. पिके टवटवीत होत असल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे; मात्र पेरणीनंतरसुद्धा मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.  अंबड शहरासह परिसरात मंगळवारी पावसाची हजेरी लागली. सततच्या पावसामुळे शेतशिवार जलमय झाले आहे. अनेक गावांत उभ्या पिकांत पाणी शिरले आहे. शेतजमिनीचा वाफसा होत नसल्याने मशागतीच्या कामांनाही अडचणी येत आहेत. परतूर शहर व परिसरात मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आषाढसरी कोसळल्या. मागील चार दिवसांपासून परतूर परिसरात पावसाने उघडीप दिली होती. मंगळवारी ढगाळ वातावरणामुळे दिवसभर उकाडा जाणवत होता. त्यानंतर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाच्या सरी बरसल्या. यामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain in Jalna district