लातूरच्या स्वतंत्र विद्यापीठासाठी शासनाकडे शिफारस

हरी तुगावकर
Tuesday, 15 September 2020

शिक्षण संचालकांनी पाठवला उच्चतंत्र विभागाला अहवाल

लातूर : लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याबाबत शासनाकडे शिफारस करण्यात आली आहे. उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकांचा तसेच नांदेड विद्यापीठाच्या अहवाल या विभागाचे शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी या विभागाचे अप्पर मुख्य सचिवांना पाठवला आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

 येथील आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या वतीने येथे विद्यापीठ स्थापन करावे अशी सातत्याने मागणी होत आहे. या मागणीच्या अनुषंगाने लातूर येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याबाबत संचालनालयाचे पत्रांनव्ये सहसंचालक, उच्च शिक्षण, नांदेड व कुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांचे कडून अहवाल मागविण्यात आला होता. सदरचा अंतिम अहवाल सहसंचालकांनी शिक्षण संचालकांना दिला होता. त्यानुसार लातूर जिल्ह्यांतर्गत अनुदानित ३६ महाविद्यालय, कायम विनाअनुदानित ८० महाविद्यालये आहेत व त्यामध्ये एकूण विद्यार्थी संख्या ५५ हजार ४१० आहे. लातूर येथे विद्यापीठ स्थापन झाले तर शिक्षक, कर्चमारी तसेच विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. विद्यापीठाच्या कुलसचिवांच्या अहवालावरून लातूर येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याबाबत विद्यापीठ कायदा २०१६ अंतर्गत कलम ३ (२) नुसार शासनस्तरावर आवश्यक ती कार्यवाही होणे गरजेचे आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

लातूर येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यास सहसंचालकांनी केलेली शिफारस व कुलसचिवांनी सादर केलेल्या वस्तुस्थितीचा अहवाल डॉ. माने यांनी अप्पर सचिवांना पाठवला आहे. त्यामुळे आता येथे विद्यापीठ स्थापनेच्या आशा पल्ल्वीत झाल्या आहेत. शासनाकडे शिफारस केल्याबद्दल डॉ. माने यांचे आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या वतीने मुख्यसंयोजक अॅड. प्रदिपसिंह गंगणे, धनराज जोशी, प्रा. एकनाथ पाटील, बालाजी पिंपळे, अॅड. गोपाळ बुरबुरे, ताहेरभाई सौदागर, प्रा. संगमेश्वर पानगावे, अॅड. अजय कलशेट्टी यांनी आभार मानले आहेत.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Recommendation to Government for Independent University of Latur