esakal | निलंग्यात `त्या` धार्मिक स्थळाच्या परिसरात रेडझोन
sakal

बोलून बातमी शोधा

Latur News

हरियानातून दोन वाहने करून या व्यक्ती आल्या आहेत. निलंग्यात त्यांना सोडल्यानंतर दोनही वाहनधारक वाहनासह पळून गेले. त्यामुळे एका धार्मिक स्थळी या व्यक्तींनी आश्रय घेतला. या व्यक्ती महाराष्ट्रातील धुळे, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांतून प्रवास करून निलंग्यात आल्या. 

निलंग्यात `त्या` धार्मिक स्थळाच्या परिसरात रेडझोन

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर : हरियाना येथून आलेल्या बारापैकी आठ व्यक्तींचे स्वॅबचे नमुने हे पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. निलंगा येथे ज्या धार्मिक स्थळात या व्यक्ती राहिल्या, त्या परिसरात एक किलोमीटर अंतरात रेडझोन जाहीर करण्यात येत आहे. या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचा शोध घेवून त्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी शनिवारी (ता. चार) येथे पत्रकार परिषदेत दिली.

हरियानातील फिरोजपूर जिल्ह्यात धार्मिक कामानिमित्त (जमात) झिरका येथे या सर्व व्यक्ती वास्तव्यास होत्या. त्यांचे मूळ गाव नंदियाल (जि. कर्नूल, तेलंगाना) आहे. त्यांचा परतीचा प्रवास सुरु होता. फिरोजपूर झिरका येथील सब डिव्हीजनल रजिस्ट्रार यांच्याकडून पास घेऊन त्यांनी परतीचा प्रवास सुरु केल्याने निलंग्यापर्यंत येवू शकले.

काही दिवसापूर्वी त्यांनी दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमालाही उपस्थिती लावली होती, अशी माहिती या व्यक्तींनी प्रशासनाला दिली आहे. या व्यक्ती महाराष्ट्रातील धुळे, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांतून प्रवास करून निलंग्यात आल्या.

वाहनचालक गेले पळून

हरियानातून दोन वाहने करून या व्यक्ती आल्या आहेत. निलंग्यात त्यांना सोडल्यानंतर दोनही वाहनधारक वाहनासह पळून गेले. त्यामुळे एका धार्मिक स्थळी या व्यक्तींनी आश्रय घेतला. याची प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर त्यांना शुक्रवारी (ता. तीन) ताब्यात घेऊन विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आणण्यात आले. त्यांच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल शनिवारी आला. या पैकी आठ जण कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यांच्यावर आता येथे योग्य ते उपचार केले जाणार आहे, अशी माहिती श्रीकांत यांनी दिली.

क्लिक करा - वाचा औरंगाबादचे कोरोना अपडेट्स

लॉकडाऊऩ असताना असा पास देणे चुकीचे आहे. हरियानातील संबंधीत जिल्हाधिकाऱयांशी संपर्क साधून याची माहितीही देण्यात आली आहे. या व्यक्तींचे नमुने पॉझिटीव्ह आले असले तरी लातूरकरांनी घाबरून जावू नये. पण दक्षता घेण्याची मोठी गरज आहे. निलंगा येथे ज्या ठिकाणी हे थांबले होते, त्या धार्मिक स्थळाच्या परिसरात एक किलोमीटर अंतरापर्यंत रेडझोन जाहिर करण्यात येत आहे. तेथे सर्व निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

तसेच या व्यक्तींच्या संपर्कात कोण कोण आले त्यांचा शोध घेऊन त्यांचीही तपासणी करण्यात येत आहे. नागरिकांनी घरातच रहावे, असे आम्ही सातत्याने सांगत आहोत. याकडे आता गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. काही वस्तू पाहिजे असतील, तर त्या घरपोच देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे लातूरकरांना घरातच रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.