
ग्रामपंचायत निवडणुकीत पती पत्नी एकत्र निवडणूक लढवित असल्याने नागरसोगा गावाच्याच नव्हे तर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात आता या निवडणुकीची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून गावातील मतदार या पती पत्नीच्या पाठीशी उभे राहतात का? हाच खरा चर्चेचा विषय होताना दिसतोय.
औसा (लातूर) : तालुक्यात राजकीय दृष्ट्या जागरुक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि ज्या गावच्या तीन भूमीपुञांना महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून काम करत आले. अशा नागरसोगा गावातील ग्रामपंचायत निवडणूक येत्या १५ जानेवारी रोजी होत आहे. या निवडणुकीमध्ये भास्कर चंद्रभान सुर्यवंशी हे सेवानिवृत्त शिक्षक व त्यांच्या पत्नी सरोजा भास्कर सुर्यवंशी हे दोघे पती पत्नी दोन वेगवेगळ्या वार्डात आपले नशीब आजमावित आहेत. राजकीय सामाजिक शैक्षणिक व शासकीय नोकरीत अग्रेसर व जागरुक असलेल्या या गावाच्या राजकीय इतिहासात पती आणि पत्नी दोघे एकत्र ग्रामपंचायतीचा कारभार करणार का? हा सध्या गावात उत्सुकतेचा व चर्चेचा विषय आहे.
मराठवाड्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नागरसोगा हे तसे राजकीय दृष्ट्या जागृत आणि तालुक्याच्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर असलेले तसेच भारतीय सैन्य दलात देशाचे रक्षण करण्यासाठी २०० पेक्षा अधिक सैनिक तर सरकारी नोकरीत मोठ्या प्रमाणात नोकरी करणाऱ्यांची संख्या असलेले गाव आहे. त्यामुळे या गावातील ११ सदस्य असलेली ग्रामपंचायत नेहमीच तालुक्याच्या चर्चेत असते. यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत पती पत्नी एकत्र निवडणूक लढवित असल्याने नागरसोगा गावाच्याच नव्हे तर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात आता या निवडणुकीची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून गावातील मतदार या पती पत्नीच्या पाठीशी उभे राहतात का? हाच खरा चर्चेचा विषय होताना दिसतोय.
११ जागा असलेल्या या नागरसोगा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २५ जणांनी २६ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात ३५ वर्षे ८ महिने शिक्षक म्हणून सेवा बजाविलेले भास्कर सुर्यवंशी हे ३० एप्रिल २०२० रोजी सेवानिवृत्त झाले. शिक्षकी पेशातून निवृत्त झाल्यानंतर आपल्या पत्नीसह अन्य नऊ उमेदवारांसह पूर्ण पँनल घेऊन ते निवडणुकीत उतरले आहेत. तर त्यांच्या विरोधकांनीही आपले पँनल उभे केले आहे. ११ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये सहा महिला व पाच पुरुष सदस्य निवडून द्यायचे आहेत. यापूर्वी काढण्यात आलेल्या आरक्षणात सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सरपंच पद आरक्षित होते. पण ते आरक्षण रद्द होऊन आता निवडणुकीनंतर आरक्षण जाहीर होणार असल्यामुळे सर्वांचीच उत्सुकता सरपंचपदाकडे लागली असल्याने या निवडणुकीला विशेष महत्व आले आहे.
हे ही वाचा : बिबट्या पुन्हा दिसला! शेतकरी, ग्रामस्थ भयभयीत
या संदर्भात सेवानिवृत्त शिक्षक भास्कर सुर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, तालुक्याच्या जवळ असून ही गावात अनेक मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. रस्ते पाणी वीज नाल्या आणि समाजातील मागास व गोरगरीब जनतेला त्यांचे हक्क मिळवून देणे हेच आपले स्वप्न आहे. औसा तालुकाच नव्हे तर जिल्ह्यातील अनेक गावातून लोक अन्य सुधारित गावे पाहायला जातात. पण आपल्या ही गावात त्याच पध्दतीचा विकास करुन आपले गाव लोकांनी पाहावे, अशा पध्दतीचा विकास करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.