परभणी : माजी आमदाराच्या बंगल्यावर दरोडा; चोरट्यांनी चार लाख रोकड केली लंपास

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

रविवारी पहाटे तीनच्या सुमारास चोरट्यांनी बोर्डीकर यांच्या बंगल्यासमोरील प्रवेशद्वाराजवळच्या खिडकीच्या ग्रीलचे स्र्कू काढून बंगल्यातील बेडरूममध्ये प्रवेश केला.

सेलू (जि. परभणी) : अलीकडच्या काळात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दररोज कुठेना कुठे तरी किमान एक चोरी, दरोडा, लूटीची घटना घडलेली असतेच. पोलिस प्रशासनाचा धाक कमी झाला आहे, अशी ओरड जनसामान्यांकडून होत कालही होत होती, आजही होत आहे. सामान्य नागरिकाच्या घरी चोरी होणे यात विशेष असं काही नाही. मात्र, जर आमदाराच्या घरी चोरी झाली तर... अशीच एक घटना परभणी जिल्ह्यातील सेलू या ठिकाणी घडली आहे.   

येथील माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या सेलू येथील निवासस्थानी चोरट्यांनी रविवारी (ता.22) पहाटे तीनच्या सुमारास दरोडा टाकला. खिडकीचे ग्रील काढून बेडरूममधील कपाटात असणारे 3 लाख 92 हजार पाचशे रूपये रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणी सेलू पोलिस स्टेशनमध्ये चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे खासगी सेवक ज्ञानेश्वर उत्तमराव शिंदे हे बोर्डीकर यांच्या सेलू येथील निवासस्थानी मुक्कामी होते. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास चोरट्यांनी बोर्डीकर यांच्या बंगल्यासमोरील प्रवेशद्वाराजवळच्या खिडकीच्या ग्रीलचे स्र्कू काढून बंगल्यातील बेडरूममध्ये प्रवेश केला. या घटनेची ज्ञानेश्वर शिंदे यांना चाहूल लागली. त्याच वेळी एका चोरट्याने शिंदे यांच्या गळ्याला चाकू लावला. आणि त्यांच्या खिशात असलेले 15 हजार पाचशे रुपये काढून घेतले.

त्यानंतर बेडरूममधील कपाटातून 3 लाख 77 हजार रोख रक्कम चोरून तेथून पोबारा केला. चार चोरटे चोरी करण्यासाठी आले होते, अशी फिर्याद सेलू पोलीस ठाण्यात बोर्डीकर यांचे खासगी सेवक ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिली. सदर घटनेची माहिती सेलू पोलिसांना मिळताच घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वानांनी पाथरी रस्त्यावरील रेल्वे गेटपर्यंत चोरट्यांचा माग दाखविला.

पोलिस उपविभागीय अधिकारी प्रकाश एकबोटे, एलसीबीचे पथक व पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी भेट देऊन घटनास्थळी पाहणी केली. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीपान शेळके हे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- #HowdyModi : स्वयंसेवक म्हणताहेत, 'हाऊडी, मोदी' हा घरचाच कार्यक्रम!

- 'कोण आला रे कोण आला, मोदी-शहांचा बाप आला'; साताऱ्यात शक्तिप्रदर्शन

- Vidhan Sabha 2019 : निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडू 'या' पक्षाच्या संपर्कात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robbery at former MLAs bungalow in Parbhani