सयाजी शिंदे म्हणाले, मी वड बोलतोय... माझा जन्म १८५७ चा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

  • वृक्षसंमेलनाचे थाटात उद॒घाटन
  • सह्याद्री - देवराई वृक्षप्रेमींच्या गर्दीने फुलली

बीड : ‘मी वड बोलतोय,’ माझा जन्म १८५७ चा असून माझे वडिल व आजोबा त्याही अगोदरचे आहेत. वडाचे झाड सर्वाधिक ऑक्सीजन देणारे आणि कुठेही उगवणारे, कापून टाकले तरी पुन्हा उभारी घेणारे आहे, त्यामुळे भविष्याचे धोके ओळखा आणि वृक्षारोपणासह संगोपन करा. मी ही चळवळ गेल्या अनेक दिवसांपासून उभी केली आहे. जे माझ्या सोबत येतील त्यांच्या सोबत मी ही चळवळ पुढे नेणार आहे, तुम्हीही सोबत या, असे आवाहन सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले.

असे अडकले राज ठाकरे औरंगाबादच्या ट्राफिकमध्ये

परिसरातील सह्याद्री - देवराई या वनप्रकल्प असलेल्या डोंगरावर आयोजित दोन दिवसीय वृक्षसंमेलनाचे उद॒घाटन गुरुवारी (ता. १३) वडाच्या झाडाची मुलींच्या हस्ते पुजा करुन झाले. अध्यक्षस्थानी वडाचे झाड असल्याने त्याचे मनोगत सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. यावेळी सिनेअभिनेते आणि पटकथा लेखक अरविंद जगताप, आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, अप्पर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे, वन अधिकारी अमोल सातपुते, माजी आमदार उषा दराडे, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर उपस्थित होते.

व्हायरल क्लिपमधला अमोल कोण...

श्री. शिंदे म्हणाले, माझा म्हणजेच वडाचा जन्म १८५७ चा असून माझ्या आजोबाचा जन्म त्यापूर्वीचा आहे. वडाचे झाड हे सर्वात जुने झाड असून वनस्पतीमध्ये सर्वात जास्त ऑक्सीजन देणारे वडाचे झाड आहे. जेव्हा जीव गुदमरतो तेव्हा ऑक्सीजनची किंमत कळते. वडाचे झाड हे सर्वात श्रीमंत झाड असल्याचे सांगून सयाजी शिंदे यांनी पर्यावरणाचे धोके ओळखा, आपलं गाव, शहर , राज्य आणि देश हिरवेगार करण्यासाठी झाडे लावा आणि ते जगवा असे आवाहन केले. आपण या चळवळीत कायम राहील आणि जास्तीत जास्त जंगल कसे उभे राहतील यासाठी मी प्रयत्न करु असेही श्री. शिंदे म्हणाले.

वृक्षसुंदरी स्पर्धेतील पहिली फेरीही संपन्न

या निमित्त बुधवारी शहरातून वृक्षदिंडी निघाली. दरम्यान, गुरुवारी संमेलनस्थळाचा डोंगर वृक्षप्रेमींच्या गर्दीने फुलून गेला होता. महिलांच्याही या निमित्त वृक्षदिंड्या आल्या. संमेलनात निसर्गाचे वैविध्य या विषयावर तज्ज्ञांची व्याख्याने झाली. तसेच, संमेलना निमित्त आयोजित इंडियन - भारत निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. संमेलना निमित्त पर्यावरण आणि वृक्षसंवर्धन व लागवड यावर आधारीत वृक्षसुंदरी स्पर्धेतील पहिली फेरीही संपन्न झाली.

आदित्य ठाकरे यांचे औरंगाबादेत वक्तव्य

या ठिकाणी उभारलेल्या सेल्फी पॉईंटवर सेल्फी घेण्यासाठी आणि वृक्षाबाबत शास्त्रशुद्ध माहिती असणाऱ्या स्टॉलवरही वृक्षप्रेमींनी गर्दी केली. दरम्यान, एकेकाळी उजाड असलेल्या या डोंगरावर दिड लाखांवर वृक्षांची लागवड करत येथे सह्याद्री - देवराई वनप्रकल्प उभारला आहे. या झाडांचा तिसरा वाढदिवसही नुकताच झाला. त्यातूनच या वृक्षसंमेलनाची कल्पना पुढे आली. बीडकरांसह राज्यभरातील वृक्षप्रेमींसाठी वृक्षसंमेलन मोठी मेजवानी ठरली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sahyadri Vanrai Project Of Sayaji Shinde Beed News