शरद पवार आदरणीयच; काल-आज आणि उद्याही : संभाजीराजे छत्रपती

दत्ता देशमुख 
Wednesday, 21 October 2020


शरद पवार यांचा राजकारणाचा ६० वर्षांचा अनुभव आहे. त्यांचे आणि आमच्या घराण्याचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दोघांच्याही कामाची आयडॉलॉजी सारखी असल्याचे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

बीड : शरद पवार आदरणीयच आहेत. काल, आज आणि उद्याही त्यांच्याबद्दल आपले हेच मत असेल. त्यांच्याबद्दलच्या कुठल्याही प्रश्नाला आपण उत्तर देणार नाही. अगदी त्यांनी आपल्याबद्दल दहा उत्तरे दिली तरी, असे मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले. संभाजीराजे छत्रपती यांनी मंगळवारी जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

त्यानंतर मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांशीही त्यांनी संवाद साधला. तत्पुर्वी पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांचा उहापोह केला. यात तामिळनाडूसह काही राज्यांत ५२ टक्क्यांहून अधिक आरक्षण आहे. मात्र, पुर्वी व आता शरद पवार यांनी या विषयात म्हणावे तेवढे लक्ष घातले नाही म्हणून मराठा आरक्षणाचा हा पेच निर्माण झाला आहे का, या प्रश्नावर त्यांनी वरिल उत्तर दिले. शरद पवारांचा अनुभव मोठा आहे. मात्र, १९६७ नंतर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर प्रथम आपण मैदानात उतरल्याचेही त्यांनी नमूद केले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जाती आणि १२ बलुतेदारांना सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाचा बहुजनांत समावेश करुन आरक्षण दिले. आपण केवळ मराठा समाजाच्याच आरक्षणासाठी नाही तर धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मताचे आहोत. मुस्लिम समाजाने आवाहन केले तर त्यांच्या आरक्षण लढ्यातही आपण सहभागी होऊ असे, संभाजीराजे छत्रपती म्हणाले. १९६७ पर्यंत संसदेत मराठा समाज आरक्षणात होता. नंतर बदल होऊन काही जातींना वगळले व नंतर घेतले. समाजातील १० - १५ टक्के लोक सक्षम असले तरी समाज आर्थिक मागास असल्याचे मागासवर्गीय आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठा समाजाला आरक्षण नसेल तर इतर समाजाचे आरक्षण काढावे ही मागणी चुकीची असून सर्वांनाच आरक्षणाची गरज आहे म्हणूनच छत्रपती शाहू महाराजांनी सर्वांना आरक्षण दिले होते. त्याचा उद्देश सफल होण्याची गरज असल्याचे नमूद करुन समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी लढत आहोत, असेही संभाजीराजे छत्रपती म्हणाले. अतिवृष्टीच्या दुष्काळ दौऱ्यात काही नेत्यांना नुकसानग्रस्त शेतकरी हुर्रो करत असले तरी आपल्याला आपुलकीने जवळ येऊन व्यथा मांडत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेमामुळेच हे अनुभवत असल्याचेही संभाजीराजे छत्रपती म्हणाले. आपण पदासाठी नाही तर लोकांची भावना जाणून घेण्यासाठी व सेवेसाठी फिरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhaji Raje Chhatrapati expressed respect for Sharad Pawar