बीड ब्रेकिंग : चप्पू उलटून माजलगाव धरणात एकाच घरातील तिघे बुडाले, शोधकार्य सुरु

दत्ता देशमुख
Thursday, 22 October 2020

खळवट लिमगावच्या बॅकवॉटरमध्ये घटना - दोघे पोहत बाहेर; तिघांचा शोध सुरु

बीड : माजलगाव तलावाच्या बॅकवॉटरमध्ये वादळामुळे चप्पू उलटून पाच जण पाण्यात पडले. यातील दोघे पोहत बाहेर आले तर तिघांचा उशिरापर्यंत शोध लागला नव्हता. खळवट लिमगाव (ता. वडवणी) येथे गुरुवारी (ता. २२) सायंकाळी ही घटना घडली. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

खळवट लिमगाव हे गाव माजलगाव धरणाच्या काठावर आहे. धरणाच्या पलीकडे काही शेतकऱ्यांची शेती आहे. माजलगाव धरण सध्या शंभर टक्के भरल्याने या तलावात पाणी ओसंडून वाहत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी शेतात जाण्यासाठी दोन्ही टोकांना दोरी बांधून चप्पू तयार केलेले आहेत. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता शेतातील काम आटोपून भारत फरताडे व त्यांचे कुटुंबीय चप्पूवर बसून घराकडे जात होते. चप्पू तलावाच्या मध्यभागी आल्यानंतर अचानक वादळी वारे आले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यात चप्पू हेलकावल्याने भारत फरताडे यांच्यासह त्यांची पत्नी सुश्मा उर्फ सुशीला, मुलगा आर्यन, सासू अनिता नाईकवाडे, भाची पूजा काळे (रा. माली पारगाव ता. माजलगाव) हे पाच जण तलावातील पाण्यात पडले. भारत फरताडे व सासू अनिता नाईकवाडे हे पोहोत पाण्याबाहेर आले. त्यांनी आरडाओरड केल्यावर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. भोई समाजाच्या तरुणांनी पाण्यात उडी घेऊन तिघांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, उशिरापर्यंत तिघांचा शोध लागला नव्हता.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Same family three members drowned Majalgaon dam Beed news