‘जलजीवन’मधून दररोज ५५ लिटर पाणी उपलब्ध करून देणार - पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे 

Minister For State Sanjay Bansode News
Minister For State Sanjay Bansode News

उदगीर (जि.लातूर) : केंद्र व राज्य शासनाच्या समान भागीदारीतून राज्यात जलजीवन मिशन राबविले जात आहे. या मिशन अंतर्गत राज्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वर्ष २०२४ पर्यंत नळजोडणी दिली जाणार आहे. यातून प्रत्येक व्यक्तीला प्रतिदिन ५५ लिटर पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण भूकंप पुनर्वसन रोजगार हमी योजना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. 

येथील कृष्णाई मंगल कार्यालयात मंगळवारी (ता.२६) जलजीवन मिशनअंतर्गत जनजागृती व उमेद अभियानाच्या आर्थिक साक्षरता बँक कर्ज वितरण बाबत आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जलजीवन मिशन अभियानाच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ज्योती राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, पंचायत समितीचे सभापती शिवाजी मुळे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, बसवराज पाटील नागराळकर, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय काळे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. 


राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, जलजीवन मिशनअंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला २०२४ पर्यंत वैयक्तिक नळजोडणीद्वारे दरडोई ५५ लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. याअंतर्गत गावागावांमधील प्रत्येक कुटुंबाला अधिकाधिक प्रतिलिटर पाणी कसे मिळेल यावर भर देत आहोत. पिण्याच्या पाण्यासंदर्भात आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या जलजीवन अभियानाविषयी जनजागृती होण्यासाठी आजच्या महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या दिवशी या मेळाव्यासाठी विविध क्षेत्रात सक्षमपणे नेतृत्व करणाऱ्या ६०० हून अधिक महिला या मेळाव्यासाठी उपस्थित आहेत व या अभियानाची ग्रामस्तरावर मोठ्या प्रमाणावर यांच्यामार्फत प्रबोधन करण्यात येईल, असा विश्वास वाटतो असे राज्यमंत्री बनसोडे यांनी म्हटले. 


अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या आवश्यक गरजा म्हणून गणल्या जातात. पण यापुढे शुद्ध पाणी आणि स्वच्छता या दोन घटकांची जोड देणे आवश्यक आहे. कारण हिच पंचसूत्री आपल्याला येणाऱ्या काळात तारणहार ठरणार आहे. कारण पाणी आहे तर जीवन आहे असे आपण म्हणतो. त्यामळे पिण्याचे पाणी स्वच्छ आणि चांगले उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. या मिशन अंतर्गत ते ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध असल्याचे राज्यमंत्री बनसोडे यांनी सांगितले. 


महिलांच्या बळकटीकरण व उन्नतीकरणासाठी राज्य शासन अनेक योजना राबवित आहे. याचाच एक भाग म्हणून आपण आता उमेद या सामाजिक संस्थेबरोबर अनेक उपक्रम राबवित आहोत. शेतीत काम करणाऱ्या महिला या खऱ्या अर्थाने ‘करिअर विमेन’ आहेत. घर, मुलेबाळे सांभाळून त्या दिवसभर शेतात राबतात. देशाच्या कृषी प्रगतीत त्यांच्या कष्टाचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. कुटुंब आणि करिअर या दोन्ही बाबी एकाच वेळी सांभाळण्याची शक्ती स्त्रियांमध्ये आहे. ग्रामीण असो किंवा शहरी असो, दोन्ही भागातील महिला आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर यशस्वी होतात.

त्यामुळे महिलांच्या कार्यशक्तीचा आपल्याला नेहमीच अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार श्री बनसोडे यांनी महिला शक्तीबाबत काढले. बचत गटाच्या माध्यमातूनही महिलांचे सामाजिकरण होत असून शासनामार्फत बचतगट चळवळीस गती दिली जाईल. महिला बचत गट घेत असलेल्या कर्जाची १०० टक्के परतफेड करतात. त्यांचा प्रामाणिकपणा व स्वाभिमान इतर कर्ज परत न करणाऱ्या उद्योगपतींच्या तुलनेत कितीतरी मोठा आहे. म्हणूनच देश व राज्याच्या प्रगतीत महिलांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याने आशा स्वयंसाहाय्यता बचत गटांच्या माध्यमातून राज्य शासन महिलांच्या भक्कमपणे पाठीशी उभे असल्याची ग्वाही राज्यमंत्री बनसोडे यांनी दिली. 

Edited - Ganesh Pitekar
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com