अखेर धनंजय मुंडेंनी गणित जुळविले...भाजपची जादूची कांडी चालणार का?

दत्ता देशमुख
Saturday, 4 January 2020

बीड जिल्हा परिषदेत आज (ता. चार) अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड हाेत आहे. झेडपीत सध्या भाजपची सत्ता आहे, मात्र, शिवसेनेसह भाजपच्या सदस्यांवर राज्यातील सत्तेची मोहिनी पडली असून, राष्ट्रवादी  काँग्रेसने 30 हून अधिक सदस्य आपल्या बाजूने आणल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

बीड - जिल्ह्यात चार मतदारसंघांत भाजपचा पराभव झाला असून खुद्द पंकजा मुंडेंनाही पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. यानंतर राज्यातील भाजपचीही सत्ता गेली तशी जिल्हा परिषदेतील भाजपच्या काही सदस्यांनी पंकजा मुंडेंची साथ सोडून धनंजय मुंडेंची वाट धरली आहे. या सदस्यांवर राष्ट्रवादीच्या सत्तेने मोहिनी घातली आहे. शिवसेना, कॉंग्रेसही राष्ट्रवादीसोबत गेली असून राष्ट्रवादीचे संख्याबळ 30 च्या पुढे सरकले आहे. भाजपला मदत करणारे शिवसंग्रामचे सदस्यही राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. 

जिल्हा परिषदेच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी शनिवारी (ता. चार) होणार आहेत. मागील वेळी निवडणुकीत कमी जागा मिळूनही राज्यातील सत्ता, मंत्रिपदाच्या जोरावर पंकजा मुंडे यांचे डावपेच यशस्वी ठरले आणि जिल्हा परिषदेत भाजपला सत्ता मिळाली.

हेही वाचा- भाकरीचे पीठ संपले अन सुरेखाच्या आयुष्याचा दोरही तुटला! हृदयद्रावक...

तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते सुरेश धस, पंकजा मुंडेंशी राजकीय दुरावा असलेले शिवसंग्रामचे विनायक मेटे, शिवसेनेचे बदामराव पंडित आणि कॉंग्रेसने भाजपला साथ दिली आणि राष्ट्रवादीच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरावला गेला; परंतु जशी भाजपची खेळी सत्तेमुळे यशस्वी झाली; तसेच आता राष्ट्रवादीनेही सत्तेचा महिमा अगाध असतो हे दाखविण्याची तयारी सुरू केली आहे.

ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी !

भाजपला मदत करणारी शिवसेना आणि कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत जाणार हे निश्‍चित झाले आहे. जिल्हा परिषद ही महत्त्वाची संस्था असताना आणि निवडी तोंडावर असताना पंकजा मुंडे बाहेर होत्या. त्यामुळे त्यांनी एका सभापतीसह एका पदाधिकाऱ्याच्या पतीवर मदार सोपविली; परंतु मंत्री पंकजा मुंडेंसमोर पुढे पुढे करणे आणि मदार पेलणे यात फरक असल्याचेही उघड झाले.

तर राज्यात सत्ता आणि कॅबिनेट मंत्रिपद मिळालेल्या धनंजय मुंडेंनी भाजपच्या या गडावर चढाईसाठी पूर्ण ताकद लावली आहे. 60 सदस्यांच्या बीड जिल्हा परिषदेत पाच सदस्यांना मतांचा अधिकार नाही, तर संदीप क्षीरसागर व बाळासाहेब आजबे विधानसभेला विजयी झाल्याने या दोन जागा रिक्त आहेत. त्यामुळे 53 सदस्यांतून अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड होणार असल्याने 27 सदस्यांची साथ असलेल्या पक्षाकडे पदे येणार आहेत. राष्ट्रवादीने हा आकडा 30 च्या पुढे नेल्याची माहिती आहे. 

हेही वाचा -  शाळेत उपलब्ध सॅनिटरी नॅपकिन अन्‌ चेंजिंग रूम

शिवसेना, कॉंग्रेसही राष्ट्रवादीसोबत 
शिवसेनेचे चार सदस्य आहेत. आगामी काळात भाजपसोबत युती नसल्याने त्यांनीही राष्ट्रवादीसोबत जावे, असा वरिष्ठ पातळीवर निर्णय असल्याची माहिती शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी सभापती युद्धाजित पंडित यांना दिली. तर मागच्या वेळी भाजपसोबत असलेल्या कॉंग्रेसचे राजेसाहेब देशमुख यांनाही वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीसोबतच जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे पाच सदस्य वाढले आहेत. 

तटस्थ राहण्याचा शिवसंग्रामचा व्हीप 
जिल्हा परिषदेत आमदार विनायक मेटे यांच्या शिवसंग्रामचे चार सदस्य विजयी झाले होते. जयश्री मस्के यांना भाजपने उपाध्यक्षपद दिले होते; परंतु काही काळाने जयश्री मस्के नंतर अशोक लोढा, विजयकांत मुंडे व भारत काळे या चारही सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने स्थापन केलेल्या गटात या सदस्यांचा समावेश आहे; मात्र शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे यांनी या सदस्यांनी तटस्थ राहावे, असा व्हीप बजावला आहे; मात्र भाजपसोबत असलेले काही संग्रामीही राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. 

हेही वाचा - ...आणि त्याच्या डोक्यावरून गेले जेसीबीचे चाक

...तरच वाचणार भाजपचा गड 
आता रात्रीतून काही जादूची कांडी फिरली तरच भाजपचा जिल्हा परिषदेचा गड वाचू शकतो; परंतु तशी शक्‍यता फारच कमी दिसत आहे; मात्र राजकारणात शेवटपर्यंत काहीही होऊ शकते या उक्तीप्रमाणे माजलगावातून काही घडलेच तर तेही सांगणे अशक्‍य आहे. 

राष्ट्रवादी औरंगाबादेत; भाजप नगरमध्ये 
दरम्यान, शनिवारी होणाऱ्या निवडीसाठी दोन्ही बाजूंनी सदस्यांची जमवाजमव केली आहे. भाजपने दहा दिवसांपूर्वीच सदस्यांना सहलीवर पाठविले होते. आता हे सदस्य नगरला पोचले आहेत. या ठिकाणी अध्यक्षपदाबाबत खल सुरू आहे. तर शेवटच्या टप्प्यात तयारी करणाऱ्या राष्ट्रवादीचे सदस्य सध्या औरंगाबादेत आहेत. मंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार बाळासाहेब आजबे, अमरसिंह पंडित, बजरंग सोनवणे आदी नेते इथे आहेत. उशिरापर्यंत अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या नावाबाबत खल सुरू होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Selection Of Chairperson At Beed Zilla Parishad Today