VIDEO : सातशे वर्षांची परंपरा असलेल्या बिरुदेवाच्या यात्रेला यंदा कोरोनाचा फटका

अविनाश काळे
Tuesday, 17 November 2020

उमरगा : आंध्र, कर्नाटकातील मोजक्याच भाविकांची उपस्थिती ;  पाडव्याच्या मुहुर्तावर बिरुदेवाला मानाचे बाशिंग चढविण्याचा नेत्रदिपक सोहळा संपन्न

उमरगा (उस्मानाबाद) : उमरगा-लातूर मार्गावरील श्री. क्षेत्र बिरुदेव मंदिराची प्रतिवर्षीप्रमाणे दिवाळी-पाडव्याला संपन्न होणारी यात्रा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे अत्यंद साधेपणाने साजरी करण्यात आली आहे. दरम्यान कोरोनाचे संकट असल्याने सातशे वर्षाची परंपरा असलेल्या यात्रा महोत्सवाला आंध्र, कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील भाविकांची संख्या अगदी बोटावर मोजण्याइतकी होती.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
पोलिस प्रशासनाच्या सूचनेनुसार बिरूदेव देवस्थानच्या पुजारी मंडळाने यात्रेला भव्य दिव्य स्वरूप न देता मंदिरात पारंपारिक धार्मिक कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला.

मंदिरातून अकरा पालख्या प्रतिवर्षी शहरात येतात मात्र यंदा रविवारी (ता.१५) दोनच पालख्या टमटममध्ये  धनगरवाड्यातील देवघरात आणण्यात आल्या. सोमवारी (ता.१६) सांयकाळी धनगरवाड्यातून निघालेल्या श्री. बिरुदेवाच्या दोन पालखी मिरवणुकीत मोजकेच भाविक सहभागी झाले होते.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पालखी मिरवणुक वेशीत आल्यानंतर मानकरी विजयकुमार पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले, त्यानंतर ग्रामदैवत श्री.महादेव मंदिराकडे काठी व पालख्या मार्गस्थ झाल्या. पालख्या महादेव मंदिर परिसरात आल्यावर तरुणांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला. श्री बिरुदेवाच्या पालख्यांची महादेव मंदिर भेट झाल्यानंतर प्रवेशद्वारावर  पुजारी बांधवानी  येणाऱ्या काळातील पीक - पाण्याची भविष्यवाणी सांगितली. आई - वडिलाची सेवा नित्यनियमाने केली पाहिजे, माणूसकी जपण्याचा धर्म सर्वानी पाळला पाहिजे. रब्बी हंगाम चांगला होईल, शेळ्या- मेंढयांना चांगले दिवस येतील. असा संदेश दिला. महादेव मंदिराजवळच श्रीची आरती करून टमटममधून पालख्या बिरूदेव मंदिराकडे प्रस्थान झाल्या.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बाशिंग चढविण्याचा नेत्रदिपक सोहळा
पालख्या मंदिरात आल्यानंतर पाच सुहासिनी महिलांनी लक्ष्मीची ओटी भरली. त्यानंतर भंडारा आणि लोकराची उधळण व ढोलाचा गजर करीत रात्री आठ वाजता विजापुरहून आलेले बाशिंग बिरुबाच्या मूर्तीवर चढविण्यात आले. या नेत्रदिपक सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले होते. मंगळवारी पहाटे पाच ते सातच्या  छबिना मिरवणुक काढण्यात आली. यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री बिरुदेव पुजारी मंडळ व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. 

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven hundred years tradition Corona effect blow to Birudeva pilgrimage