शिवजन्मोत्सव - बहुजनांचा कैवारी : छत्रपती शिवराय

shivaji maharaj.jpg
shivaji maharaj.jpg

भारत एकेकाळी मुस्लिम बादशहांच्या अधिपत्याखाली होता. हिंदू योद्धे त्यावेळेस मुस्लिम राजांना खुश ठेवण्यासाठी आपल्याच बांधवांचे बळी देत होते. भारतीयांचे रक्त वाहत होते आणि मुस्लिम राजे राज्य करीत होते. गोरगरीब, शेतकरी व शेतमजूर यांच्यावर अन्याय, अत्याचार होत होते. अशा या काळामध्ये युगप्रवर्तक राजाचा जन्म १९ फेब्रुवारी १६३०, वार शुक्रवार या दिवशी राजमाता जिजाऊ मॉं साहेब आणि शहाजीराजे यांच्या पोटी शिवनेरी गडावर (ता. जुन्नर जि. पुणे) येथे झाला.
शिवनेरी गडावर आनंदी आनंद, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहत होता. नगारे वाजू लागले, सनई चौघडे यांचा मंगलध्वनी रोमारोमात निनादू लागला. रात्रीच्या अंधारात काजवे इकडून तिकडे फिरत होते. त्याचा मंद प्रकाश शिवनेरी गडावर रोषणाई केल्याचा भास निर्माण करीत होता.

मॉ साहेब शिवरायांच्या गुरु
बाळ शिवबाचे शिक्षण आपल्या मॉं साहेबांच्या मांडीवरच सुरु झाले. मॉं जिजाऊ साहेब शहाजी राजांच्या पराक्रमाचे किस्से बाळ शिवबाला दररोज सांगायच्या त्यामुळे बाळ शिवबाचे बालमन अभिमानाने भरुन येत व पराक्रमाची स्फुर्ती त्यांच्या रोमारोमामध्ये संचारत असे.
जिजामाता यांनी आपल्या बाल शिवबास शस्त्रविद्या, भाषा, विज्ञान, कसरती, घोडेस्वार, दांडपट्टा, भालाफेक, तलवार चालवणे अशा विविध क्षेत्रात निपूण केले होते. या शिक्षणामुळे व मॉं साहेबांच्या प्रेरणेमुळे बालवयातच बाळ शिवबांनी मावळ्यांची जमवाजमव करुन हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि स्वराज्याच्या नावाने राज्य कारभार सुरु केला. 


जिजामाता कुशल प्रशासक
जिजामाता कुशल प्रशासक होत्या. त्यांच्या देखरेखीखाली कारभार करीत असताना आदिलशहाने शहाजी राजे यांना अटक सुद्धा केली होती. तेंव्हा महाराजांनी स्वराज्याचे काम थांबवून त्यांची सुटका करुन घेतली आणि पुढे जोमाने स्वराज्य विस्तार करु लागले. 

प्रतापगडाचा रणसंग्राम
स्वराज्याचा विस्तार विजापूरच्या आदिलशाहीला रुचला नाही म्हणून आदिलशाहीने आपला बलाढ्य सरदार प्रचंड ताकदीचा व धिप्पाड असा, नियतीने कपटी व दगाबाज करणारा अफजल खान यास स्वराज्यावर शिवाजीराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठविले. सोबत प्रचंड सैन्य व खजिना दिला. अफजलखान मजलदरमजल करीत स्वराज्यात येऊन दाखल झाला. शिवाजी महाराज प्रतापगडावर असताना अफजलखान प्रतापगडाच्या पायथ्याशी माचीवर दोस्तीचे नाटक करुन भेटण्यासाठी बसला होता. शिवाजी महाराज अफजल खानाला ओळखून होते. अफजलखान म्हणजे स्वराज्यावरील संकट आहे हे महाराजांनी ओळखले होते. म्हणून महाराजांनी सावधगिरीने अफजलखानाची भेट घेण्याचे ठरविले. भेटीसाठी जाताना अंगात चिलखत घातले, बोटात वाघनखे घातली आणि बिचवा अस्तिनीमध्ये लपवला. महाराजांनी सर्व सैनिकांना सूचना दिल्या आणि मॉं साहेबांचे दर्शन घेऊन १० नोव्हेंबर १६५९ गुरुवार रोजी दुपारच्या वेळी भेट घेतली. खानाने महाराजांना ‘या राजे भेटा आम्हाला’ असे म्हणत अलिंगण दिले आणि विश्‍वासघात करुन महाराजांची मान आपल्या काखेत दाबली आणि पाठीवर कटारीचा वार केला. तेंव्हा महाराजांचे टर्रकन शर्ट फाटले. अंगात चिलखत असल्यामुळे महाराज वाचले. महाराजांनी ताबडतोब चपळाईने वाघनखे खानाच्या पोटात खुपसली आणि खानाचा कोथळा बाहेर काढला तेंव्हा खान कोसळला आणि म्हणाला, ‘मुझे बचाव मुझे बचाव.’ यावेळी खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने शिवरायावर वार केला तो वार चुकवून महाराजांनी त्यालाही ठार केले. त्यानंतर खानाचा अंगरक्षक सय्यदबंडा महाराजांवर धावून आला तेंव्हा जिवाजी महाले यांनी त्याला एका झटक्यात ठार केले. पुढे एक म्हण रुढ झाली, ‘होता जीवा म्हणून वाचला शिवा.’
अफजलखानाच्या वधाची वार्ता सार्‍या देशात वार्‍यासारखी पसरली. जो तो शिवाजी महाराजांची स्तुती करु लागला. अनेक तरुण स्वराज्याच्या सैन्यात दाखल होऊ लागले.

शाहिस्तेखानाचा बंदोबस्त
आदिलशाही व निझामशाहीमधील अनेक सरदार आपल्या स्वराज्यात दाखल झाले व स्वराज्याची सेवा इमाने इतबारे करु लागले. यामुळे स्वराज्याचा विस्तार जोमाने वाढत होता.
औरंगजेब बादशहा स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी धडपडत होता. वेगवेगळे डावपेच आखत होता. यासाठी आपला मामा बलाढ्य सरदार शाहिस्तेखान यांना प्रचंड सैन्य व खजिना देऊन स्वराज्यात पाठविले. स्वराज्यावर दुसरे संकट आले. शिवाजी महाराज लहानपणी ज्या लाल महालात राहत होते. त्या लाल महालात शाहिस्तेखान राहून आजुबाजूच्या प्रदेशावर छळ करु लागला. जनतेला त्रास देऊ लागला. लोक आपले गाव शेतीभाती सोडून स्थलांतर करु लागले. लोकांच्या मनात भिती निर्माण झाली होती. तेंव्हा महाराजांनी एका रात्री शाहिस्तेखानावर धाडसी हल्ला केला. त्या हल्ल्यात शाहिस्तेखान कसाबसा वाचला पण खिडकीतून पळून जाताना महाराजांच्या तलवारीचा वार त्याच्या बोटावर बसला त्यात त्याची चार बोटे तुटली. शाहिस्तेखान घाबरला. जिवावरचं संकट बोटावर गेलं. आज बोटे तुटली उद्या मान तुटेल या भितीने खान तडक दिल्लीला पळून गेला. स्वराज्यावरील दुसरे संकट टळले. जिजाऊ मॉं साहेब आणि सर्व प्रजेला आनंद झाला. पुण्याजवळील व सह्याद्रीच्या खोर्‍यातील लोकांना अतिशय आनंद झाला. त्यांना शिवाजी महाराजांनी आणि जिजाऊ मॉं साहेबांनी धीर दिला. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले तेंव्हा आपली गावे सोडून गेलेले लोक आपल्या गावात परत आले आणि नव्या जोमाने नव्या हिंमतीने शेती करु लागले. पुन्हा त्यांच्या जीवनामध्ये वैभव निर्माण करण्याचे कार्य जिजाऊ मॉं साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले.

पुरंदरचा तह
लोककल्याणकारी, बहुजनांचा कैवारी राजा असल्याची खात्री प्रजेला पटली होती. स्वराज्यावर चाल करुन येण्याची कोणाची हिंमत होत नसे. जिकडे तिकडे शिवाजी महाराजांचा दरारा निर्माण झाला होता. आदिलशाही व निझामशाही यांना नामोहरम केल्यानंतर स्वराज्यावर डोळा उचलून बघण्याची सुद्धा त्यांची हिंमत होत नसे. पण औरंगजेब बादशहा शिवाजी महाराजांचा बिमोड करण्यासाठी नवनवीन डावपेच आखत होता. त्याला स्वराज्यावर मोगलीसत्ता स्थापन करण्याची आकांक्षा होती. औरंगजेब बादशहाने आपला मुत्सद्दी सरदार मिर्झाराजे जयसिंग यांना स्वराज्यात पाठविले. सोबतीला विश्‍वासू सरदार दिलेरखान सुद्धा दिला. यांच्यासोबत प्रचंड खजिना आणि अफाट सैन्य दिले. मिर्झाराजे जयसिंग स्वराज्यात येऊन दाखल झाला आणि दिलेरखानाने पुरंदरच्या किल्ल्याला वेढा दिला. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखान शिवाजी महाराजांशी युद्धाची भाषा करु लागले. कारण त्यांच्याकडे अफाट सैन्य होते. हे स्वराज्यावरील तिसरे संकट होते. शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे यांचे सैन्य अफाट असल्यामुळे समोरासमोर लढलो तर आपला टिकाव लागणार नाही. लाख मोलाचा एक-एक मावळा मारला जाईल आपण जर तह केला आणि तहात काही किल्ले बादशहाला दिले तर आपण फायद्यात राहू आणि दिलेले किल्ले परत घेता येतील या विचाराने महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग यांच्याशी तहाची बोलणी केली. जयसिंगालाही महाराजांविषयी आपुलकी वाटली आणि दोघांमध्ये तह झाला. तो ‘पुरंदरचा तह’ म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे.

महाराजांची दिल्ली स्वारी
शिवाजी महाराज यांनी मिर्झाराजे जयसिंग यांना तहानुसार २३ किल्ले आणि चार लक्ष होनाचा प्रदेश द्यावा आणि औरंगजेब बादशहाच्या वाढदिवसानिमित्त भेटीसाठी शिवाजी महाराजांनी आगर्‍याला यावे असे ठरले. शिवाजी महाराज तहात ठरल्याप्रमाणे जिजाऊ मॉं साहेबांशी सल्लामसलत करुन दर्शन घेऊन बाल संभाजीला आणि निवडक विश्‍वासू सरदारांना सोबत घेऊन ५ मार्च १६६६ रोजी निघाले. तानाजी मालुसरे, मदारी मेहतर, हिरोजी फर्जंद, बाळाजी आवजी, यसाजी कंक असे अनेक मावळे सोबतीला होते. आगर्‍याला जातना शिवाजी महाराजांनी औरंगाबाद येथे मिर्झाराजे जयसिंगाशी सुरक्षाबाबत चर्चा केली तेंव्हा जयसिंग याने आपला मुलगा रामसिंग यांच्यावर महाराजांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवली. तेंव्हा महाराज आगर्‍याच्या वाटेने निघाले आणि १२ मे १६६६ रोजी महाराज आगर्‍याला पोहचले. २५ मे १६६६ रोजी बादशहाचा ५० वा वाढदिवस होता. या वाढदिवशी महाराज बाल संभाजीसह दरबारात गेले. तेंव्हा बादशहाने महाराजांचा अपमान केला. एवढेच नव्हे तर त्यांना नजरकैदेत ठेवले. महाराजांनी आपल्या युक्तीने बादशहाच्या हातावर तुरी देऊन निसटले ते थेट रायगडावर पोहोचले. औरंगजेब बादशहाच्या दरबारात एकच हाहःकार उडाला. बादशहाचे काही सैनिक म्हणाले, ‘शिवाजी आसमान से उड गया’ काही सैनिक म्हणाले, ‘शिवाजी जमीनके अंदर घुसकर निकल गया’ बादशहाने तर चक्क कपाळालाच हात लावून बसला. रायगडी महाराज पोहोचताच मावळ्यांनी तोफांचे आवाज केले. महाराजांनी मातोश्रीचे दर्शन घेतले तेंव्हा मॉं साहेबांनी महाराजांना मिठ्ठी मारली. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. गडावरच नाहीतर संपूर्ण राज्यात आनंदीआनंद झाला. जणू काही दिवाळीच आहे असा भास लोकांना होत होता.

शिवराज्याभिषेक सोहळा 
दि. ६ जून १६७४ रोजी सकाळी सुर्योदयसमयी राजधानी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटाने पार पडला. मॉं साहेबांचे स्वप्न पूर्ण झाले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. राज्याभिषेक सोहळ्यासाठी दुरदूरवरुन शेतकरी, कष्टकरी, परकीय पाहुणे अनेक राज्याचे प्रतिनिधी, इंग्रजांचे प्रतिनिधी अशा पन्नास हजार लोकांनी हा नेत्रदिपक सोहळा पाहून धन्य झाले. शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर अवघ्या १२ दिवसांनी १७ जून १६७४ रोजी वृद्धापकाळाने मॉं साहेबांचे निधन झाले.

रायगडावर सुर्यास्त
अविरत लढाया करुन, प्रवास करुन महाराजांचे शरीर थकले होते. त्यात त्यांना ज्वराचा आजार झाला. त्या आजाराने महाराज क्षीण झाले होते. दि. ३ एप्रिल १६८० रोजी दुपारी १ वाजता शिवाजी महाराजांनी रायगडावर कायमचे डोळे मिटले. तळपता सूर्य कायमचा डोंगराआड गेला आणि संपूर्ण राज्य लोककल्याणकारी राजाला पोरका झाला.
जय जिजाऊ, जय शिवराय!!
शब्दांकन - व्यंकट धोंडीराम शेळके (प्राथमिक शिक्षक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com