लातूर जिल्ह्यातील ६२४ शाळा सुरु; नववी, दहावीमध्ये ५२ टक्के उपस्थिती

हरी तुगावकर
Thursday, 10 December 2020

राज्य शासनाने शाळा व महाविद्यालये सुरु करण्याची परवानगी दिल्यानंतर गेल्या महिन्यापासून जिल्ह्यात नववी, दहावी या माध्यमिक शाळातील वर्गाना तसेच अकरावी व बारावीच्या वर्गाना सुरुवात झाली आहे.

लातूर : राज्य शासनाने शाळा व महाविद्यालये सुरु करण्याची परवानगी दिल्यानंतर गेल्या महिन्यापासून जिल्ह्यात नववी, दहावी या माध्यमिक शाळातील वर्गाना तसेच अकरावी व बारावीच्या वर्गाना सुरुवात झाली आहे. हळूहळू मुलांची उपस्थिती वाढत आहे. जिल्ह्यातील ६३२ पैकी ६४२ शाळा सुरु झाल्या आहेत. यात ५२ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. तर अकरावी बारावीच्या वर्गात केवळ १५ टक्केच उपस्थिती आहे.

कोरोनाच्या संदर्भात अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर व कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर राज्य शासनाने शाळा व महाविद्यालये सुरु करण्याची परवानगी दिली होती. यात नववी व दहावी तसेच अकरावी व बारावीचे वर्ग सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शाळांना सुरवात झाली. पहिल्या आठवड्यात अत्यंक कमी मुलांची उपस्थिती राहिली. कोरोनाच्या काळात शाळांना ऑनलाईन शिक्षण सुरु केले होते. पण प्रत्यक्षात वर्ग सुरु झाल्यानंतर मात्र अनेक शाळांना हे आॅनलाईनचे वर्ग बंद केले होते.

त्यामुळे शाळात हळूहळू मुलांची संख्या वाढत चालली आहे. जिल्ह्यातील ६३२ पैकी ६२४ माध्यमिक शाळा सुरु झाल्या आहेत. यात ८२ हजार ८३७ पैकी ४२ हजार ३१७ मुले शिक्षण घेत आहेत. त्यांची ही उपस्थिती ५१ टक्क्याच्या घरात गेली आहे. जिल्ह्यात २७६ पैकी २६९ उच्चमाध्यमिक शाळा सुरु झाल्या आहेत. शाळांच्या तुलनेत उच्च माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांची उपस्थिती संख्या कमी दिसून येत आहे. ७० हजार १२३ पैकी १० हजार ११९ विद्यार्थीच वर्गात येवून शिक्षण घेत आहेत. अनेक महाविद्यालयांनी सध्याही ऑनलाईन वर्ग सुरु ठेवल्याचा हा परिणाम दिसत आहे. विद्यार्थ्यांची ही उपस्थिती १५ टक्के आहे. गेल्या काही दिवसात विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांनी दिली.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six Hundred 24 Schools Open In Latur District