
राज्य शासनाची नवी योजना, सुरू होणार रयत बाजार
उस्मानाबाद : शेतकऱ्यांच्या मालाला थेट ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी शासनाने नवीन योजना आखली आहे. त्या माध्यमातून यातील साखळी नष्ट होऊन दोन्ही घटकाला त्याचा फायदा व्हावा असा शासनाचा मानस आहे. विकेल ते पिकेल या संकल्पनेवर आधारित कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या या धोरणाचाच एक भाग म्हणून संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानाची सुरवात करण्यात येत आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
शेतकरी ते थेट विक्री याबाबत एक चांगली व्यवस्था निर्माण करण्यासाठी शासनाने आता पाऊल उचलले आहे. बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव, ग्राहकांनी ताजी फळे, भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध होईल अशा दुहेरी उद्देशाची ही संकल्पना राज्यात सुरू करण्यात येत आहे. तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांकडे पुरवठा साखळी कार्यरत राहण्यासाठी व ग्राहकांच्या मागणीप्रमाणे पुरवठा होण्यासाठी या अभियानात थेट विक्रीसाठी इच्छा व्यक्त करणाऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे लागवड क्षेत्र, वाण निवड, निविष्ठा वापराबाबत व बाजारात असलेल्या मागणीबाबत जागृती करण्याचे महत्त्वाचे काम कृषी विभागाकडे देण्यात आले आहे. फळे भाजीपाला व इतर शेतीमाल उत्पादित झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांमध्ये शेतीमालाची स्वच्छता व प्रतवारी करणे, ग्रेडिंग करणे, पॅकिंग करणे, विक्री व्यवस्थापन याबाबत तांत्रिक प्रशिक्षणाची सोयही करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी विक्रीच्या जागा निश्चित करून स्टॉल लावण्याचे तारखा व वेळापत्रक अंतिम करण्यात येणार असून, जास्तीत-जास्त प्रतिसाद या अभियानाला मिळेल यासाठी शासनाने कृषी विभागाकडे ही जबाबदारी सोपविली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अशी असेल योजना
तालुक्यातील शेतकरी, उत्पादक संघ, उत्पादक कंपन्यांच्या अंतर्गत एक जाळ तयार केला जाईल. जेणेकरून जास्तीचा शेतीमाल दुसऱ्या गटामार्फत विक्री करता येईल किंवा कमी पडणारा शेतीमाल दुसऱ्या गटाकडून घेता येईल. ही व्यवस्था भक्कम झाली तर पुरवठा साखळी अविरतपणे सुरू राहील, असे नियोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळ व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ याच्याकडे सहकारी गृहनिर्माण संस्थाबाबतचा संपर्काचा तपशिल उपलब्ध असून दोन्ही यंत्रणेचा समन्वय ठेवण्यात येणार आहे. तालुका कृषी अधिकारी यांनी शाश्वत स्वरूपात मागणी शहरी भागातून मिळवता येईल व मागणीप्रमाणे तालुक्यातील शेतकऱ्यांना फळे व भाजीपाला पुरवठ्याबाबत अवगत करून नियोजन करण्याबाबतच्या सूचना आहेत.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
(संपादन-प्रताप अवचार)