Corona Breaking : राज्यमंत्री संजय बनसोडे यांना कोरोनाची लागण, मुंबईत उपचार सुरु

हरी तुगावकर
Sunday, 26 July 2020

राज्याचे पाणीपुरवठा राज्यमंत्री व  उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांचा कोरोना संबंधीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यांच्यावर सध्या मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

लातूर :  राज्याचे पाणीपुरवठा राज्यमंत्री व  उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांचा कोरोना संबंधीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यांच्यावर सध्या मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या नागरीकांनी स्वतःची काळजी घ्यावी. कोरोनाची लक्षणे असतील तर तातडीने रुग्णालयात जावे, असे आवाहन श्री. बनसोडे यांनी `सकाळ`शी बोलताना केले. यापूर्वी जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर व औशाचे आमदार अभिमन्यू पवार या लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण झाली आहे. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

लातूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव झाल्यापासून एखाद्या कोरोना योद्धासारखे काम श्री. बनसोडे हे करीत आहेत. लातूर जिल्ह्यात उदगीरमधूनच कोरोना रुग्णांना सुरवात झाली. एकही लोकप्रतिनिधी शासकीय रुग्णालयात जाण्यास भीत होते त्यावेळेस पासून म्हणजे कोरोनाच्या सुरवातीच्या काळापासून श्री. बनसोडे हे फिल्डवर काम करीत आहेत. शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांचे मनोबल वाढवण्यापासून ते नागरीकांना दिलासा देण्याचे काम ते करीत होते.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

उदगीरमध्ये कोरोनावर मात करणाऱय़ा नागरीकांची आवर्जून भेट घेवून त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्याचे कामही श्री. बनसोडे सातत्याने करताना दिसत होते. एकीकडे हे करीत असताना उदगीर मतदारसंघात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढणार नाही याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाच्या वारंवार बैठका घेवून अधिकारी, कर्मचाऱयांनाही त्यांनी कामाला लावले. उदगीर मतदारसंघात विकास कामेही मागे पडणार नाहीत, याची काळजीही ते सातत्याने घेत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लोकात फिरु नका असा सल्ला अनेकांनी देवून देखील श्री. बनसोडे यांनी आपले काम सुरुच ठेवले होते. मार्चपासून ते गेल्या आठवड्यापर्यंत ते हे काम करीत असताना दिसत होते. सात दिवसापूर्वी ते मुंबईत गेले. दोन दिवसापूर्वी त्यांना ताप, खोकला, अंगदुखी जाणवू लागली. त्यामुळे त्यांनी आपला स्वॅब तपासणीसाठी दिला होता. रविवारी (ता. २६) कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका 
दोन दिवसापूर्वी त्रास होवू लागल्याने स्वॅब तपासणीसाठी दिला होता. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सध्या ताप आणि अंगदुखीचा अधिक त्रास होत आहे. उपचार सुरु आहेत. लवकरच बरा होवून नंतर उदगीरच्या नागरीकांच्या सेवेत रुजु होणार आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या नागरीकांनी मात्र काळजी घ्यावी. त्रास होत असेल तर तातडीने शासकीय रुग्णालयात जावून उपचार घ्यावेत. मी ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही.
संजय  बनसोडे, पाणीपुरवठा राज्यमंत्री.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State minister sanjay Bansode corona positive