विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : `एमपीएससी`ची पूर्व परीक्षा ऑफलाईनच

विकास गाढवे 
Thursday, 10 September 2020

अन्य परीक्षांसाठी सीपीबीटीच्या पर्यायावर विचार; निविदेला शेवटची मुदतवाढ. 

लातूर : कोरोनामुळे आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) ऑनलाईन परीक्षेच्या (सीबीआरटी) धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संगणक प्रणालीवर आधारित ऑनलाईन परीक्षा (सीपीबीटी) घेण्याचे नियोजन केले आहे. यासाठी आयोगाने निविदा काढल्या तरी सेवा पुरवठादारांकडून निविदेला तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही. पर्याप्त संख्येने निविदा न आल्यामुळे शेवटची मुदतवाढ देत आलेल्या निविदा मंजूर करण्याचा तयारी आयोगाने ठेवली आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

या स्थितीत मोठ्या संख्येने उमेदवार असलेल्या पूर्व परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाईनच घेण्यात येणार असून पूर्व परीक्षा सोडून इतर परीक्षांसाठी सीपीबीटीच्या पर्यायाचा विचार आयोगाकडून सुरू आहे. कोणत्याही स्थितीत पूर्व परीक्षा सीपीबीटीद्वारे घेण्याचा विचार आयोग करत नसल्याचे आयोगाचे (एमपीएससी) सहसचिव सुनिल औताडे यांनी स्पष्ट केले. 

युपीएससीकडून अनेक वर्षापासून कमी उमेदवार असलेल्या परीक्षेसाठी संगणकावर आधारित भरती परीक्षा (सीबीआरटी) घेण्यात येते. कोरोनामुळे एमपीएससीने काही परीक्षांसाठी या पद्धतीने परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. यातूनच गेल्या महिन्यात सीपीबीटीची निविदा काढण्यात आली. सेवा पुरवठादारांनी या निविदेला म्हणावा तेवढा प्रतिसाद दिला नाही. परीक्षेचे काम जबाबदारीचे असल्याने कोणी पुढे येत नसल्याची तसेच युपीएससीच्या तुलनेत एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्या तुलनेने जास्त असल्याने निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याची सुरू होती. कारणे काहीही असले तरी काही पुरवठादारांनी निविदा दाखल केल्या आहेत. केवळ त्या पर्याप्त संख्येने नसल्याने आयोगाने निविदेला मुदतवाढ दिल्याचे श्री. औताडे यांनी सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

नियमानुसार दोनवेळा मुदतवाढ देऊनही पुरवठदारांकडून प्रतिसाद न मिळाल्यास आलेल्या निविदांचा विचार आयोगाकडून होणार आहे. या स्थितीत विविध स्पर्धा परीक्षांतील पूर्व परीक्षांही या पद्धतीने ऑनलाईन होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, उमेदवारांची संख्या कमी असलेल्या परीक्षांसाठीच कॉम्प्युटर प्रोग्राम बेस्ड टेस्ट (सीपीबीट) या ऑनलाईन परीक्षेचा मार्ग अनुसरण्याचा विचार आयोग करत असून कोणत्याही परिस्थितीत पूर्व परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार नाहीत.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्या पूर्वीप्रमाणे ऑफलाईनच घेण्यात येणार असल्याचे सहसचिव औताडे यांनी सांगितले. ऑनलाईन परीक्षेसाठी जिल्हा पातळीवरील उपलब्ध व्यवस्था पहाता आम्ही पंचेवीस हजार उमेदवारांचीही ऑनलाईन परीक्षा घेऊ शकत नाहीत. यामुळे ऑनलाईन परीक्षेची तयारी सुरू असली तरी त्या पद्धतीने कोणत्या परीक्षा घ्यायच्या याचे नियोजन अद्याप झाले नसल्याचेही श्री. औताडे यांनी स्पष्ट केले.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student IMP news MPSC pre-exam only offline