Video पाहा : कोरोनाशी यशस्वी लढा: बीडमध्ये बँड वाजवून दोन रुग्णांना घरी सोडले

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 May 2020

बीड जिल्ह्यातील दोन कोरोनामुक्त रुग्णांना पोलिस बँडच्या निनादात बुधवारी (ता. २७) जिल्हा रुग्णालयातील कोव्हीड रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी कोरोनामुक्त झालेल्या मुलीचा केक कापून वाढदिवसही साजरा करण्यात आला.

बीड - दोन महिन्यांत कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा आदर्श पॅटर्न राबवून कोरोनामुक्त असलेल्या जिल्ह्यात बघता बघता मुंबई रिटर्न लोकांमुळे कोरोना रुग्णांचे अर्धशतक पार (५५ रुग्ण) झाले आहे. मात्र, याच वेळी आता उपचारानंतर रुग्ण कोरोनामुक्तही होत आहेत. असेच दोन कोरोनामुक्त रुग्णांना पोलिस बँडच्या निनादात बुधवारी (ता. २७) जिल्हा रुग्णालयातील कोव्हीड रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी कोरोनामुक्त झालेल्या मुलीचा केक कापून वाढदिवसही साजरा करण्यात आला.

कोरोनावर मात केलेल्या या दोघांनी ॲम्ब्युलन्समध्ये बसल्यानंतर विजयाची खुन दाखवून सर्वांना अभिवादन केले. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांत जिल्हा अव्वल राहिला. आलेल्या प्रत्येकांची चेक नाक्यांवरच तपासणी, क्वारंटाईन केलेल्यांवर मोबाईल ॲपद्वारे नजर, गर्दी टाळण्यासाठी भाजी बाजार बंद करुन फिरती विक्री, संचारबंदी शिथिलतेचा काळही सर्वात कमी.

क्लिक करा- घाबरू नका, तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार

राज्यात बहुतेक ठिकाणी सुरु असलेली दारु विक्री जिल्ह्यातही बंद, गाव पातळीवर ग्रामसुरक्षा समित्या अशा एक ना अनेक उपाय योजना राबविल्याने जिल्हा कोरोनामुक्तच होता. अशाचत एक जावयाला भेटायला गेलेला व्यक्ती गुपचूप जिल्ह्यात आला आणि त्याला लक्षणे आढळली. मात्र, पिंपळा (ता. आष्टी) येथील या रुग्णाची नगरलाच तपासणी झाली व उपचारही. त्यानंतर तो बराही झाला.

दरम्यान, शेवटपर्यंत कोरोनामुक्तच असलेल्या जिल्ह्यात शासनाने बाहेर अडकलेल्या विद्यार्थी, नोकरदार, कामगार यांना आपापल्या जिल्ह्यात येण्यास परवानगी दिली आणि मुंबई, पुणेसह इतर जिल्ह्यातील लोक जिल्ह्यात दाखल हेाऊ लागले. असेच आतापर्यंत मुंबईहून आलेल्या ५५ जणांना कोरोनाची बाधा असल्याचे तपासणीत समोर आले.

हे वाचंलत का? - आता पाच मिनिटांत कोरोनाचे निदान; राज्यातील पहिलाच प्रयोग

मागच्या १६ मेला जिल्ह्यात मुंबईहून आलेले पहिले दोन रुग्ण आढळले. हा आकडा वाढत जाऊन ५५ वर पोचला. यातील एका वृद्धेचा मृत्यूही झाला होता. पण, कोरोनाग्रस्त आढळलेले बहुतेक मुंबई रिटर्नच होते. त्यामुळे जिल्हावासियांमध्ये चिंतेचे वातावरण होते. पण, बुधवार बीडकरांसाठी सुखद बातमी देणारा ठरला. पहिल्यांदा आढळलेल्या दोन रुग्णांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली. त्यांना बुधवारी जिल्हा रुग्णालयातील कोव्हीड रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

विशेष म्हणजे या रुग्णांना सोडताना पोलिस बँडचा निनादही करण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, उपचार करणारे भिषक डॉ. संजय राऊत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कदम आदींसह उपचार करणाऱ्या नर्स, कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

दरम्यान, आमच्यासह जिल्हावासियांसाठीही हा आनंदाचा क्षण आहे. रुग्ण वाढत असले तरी उपचारानंतर कोरोना बरा होतो हे आपण सिद्ध केले. कोव्हीड वार्डमधील सर्व डॉक्टर्स, नर्स सर्व आव्हाने पेलत उत्तमोत्तम उपचार करत आहेत, अशी प्रतिक्रिया तरुणांनी व्यक्त केली.

दुसऱ्यांदा बँड वाजवून विदाई
यापूर्वी कोरोनामुक्त असलेल्या जिल्ह्यातील ३० च्या वर पोलिस, शिक्षक व आरोग्य सेवकांचा लातूर जिल्ह्यात आढळलेल्या तेलंगणा राज्यातील कोरोनाग्रस्तांशी संपर्क आला होता. त्यावेळी संपर्कातील या पोलिस, शिक्षक, आरोग्य सेवकांना जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करुन त्यांचे स्वॅब तपासले. स्वॅबचे अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर त्यांचीही अशीच पोलिस बँड वाजवून विदाई करण्यात आली. 

केक कापून सेलिब्रेशनही 
उपचारानंतर कोरोनावर मात करणाऱ्या या १३ वर्षीय मुलीचा वाढदिवसही रुग्णालय आवारात केक कापून साजरा करण्यात आला. कोरोनावर मात केलेल्या या दोघांनी ॲम्ब्युलन्समध्ये बसल्यानंतर विजयाची खूण दाखवून सर्वांना अभिवादन केले.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Successful fight with Corona: Two patients were released home after playing a band in Beed