काय सांगता ! ‘सुपर स्पेशालिटी’ने वाचवले लातूरकरांचे शंभर कोटी. 

latur hospital.jpg
latur hospital.jpg

लातूर : केंद्र सरकारच्या पंतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा योजनेतून येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या परिसरात दीडशे कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कोरोनाच्या काळात लातूरकरांसाठी पर्वणीच ठरले आहे.

हॉस्पिटलचे तातडीने हस्तांतर करून तिथे कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी संस्थेने राज्यात आघाडी घेतली आहे. अमरावती व अकोलाच्या आधी हॉस्पिटलचे कोविड रुग्णालयात रूपांतर करून प्रत्यक्ष उपचार सुरू केले. संस्थेच्या प्रयत्नाला पालकमंत्री व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख व जिल्हा प्रशासनाची जोड मिळाली. यामुळे अडीच महिन्यांत साडेचार हजार रुग्णांवर उपचार करीत संस्थेने या रुग्णांचे शंभर कोटी रुपये वाचवले आहेत. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी ही माहिती दिली.

विविध सात प्रकारच्या दुर्धर आजारांवर (सुपर स्पेशालिटी) उपचारासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे हे हॉस्पिटल मंजूर झाले. हॉस्पिटलच्या इमारत बांधकामापासून वीजपुरवठ्यापर्यंत मोठे अडथळे आले. मात्र, संस्थेने ते दूर केले. सुपरस्पेशालिटीसाठी डॉक्टर व कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू असतानाच कोरोनाची साथ आली. यामुळे प्रक्रियेला स्थगिती देऊन हॉस्पिटलचे रूपांतर कोविड रुग्णालयात करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्र्यांमुळे महावितरणने नवीन उपकेंद्रांची उभारणी न करता संस्थेतील जुन्या उपकेंद्राची क्षमता वाढवून वीजपुरवठा सुरू केला.

कंत्राटदार कंपनीकडे पाठपुरावा करून जनरेटर, ऑक्सिजन गॅसची यंत्रणा व अन्य कामे वेगाने करून घेतली. यामुळे जुलैमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी हॉस्पिटल सज्ज झाले. हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी ४२ ऑक्सिजन बेडचे चार वॉर्ड तर १५ व ३२ बेडचे आयसीयू वॉर्ड आहेत. आतापर्यंत चार हजार ३१६ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून सध्या १५४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अनिल मुंढे यांनी दिली. हॉस्पिटल नसते तर अनेक रुग्णांना बाहेरच्या जिल्ह्यातील व शहरातील खासगी रुग्णालयांत उपचार घ्यावे लागत असत. हॉस्पिटल तातडीने सुरू झाल्यामुळे रुग्णांच्या खर्चात मोठी बचत झाल्याचे डॉ. मुंढे यांनी सांगितले. 

कोरोना उपचारात सुपर स्पेशालिटी 
हॉस्पिटलमध्ये आमदारांपासून सर्व घटकांतील रुग्णांवर उपचार करण्यात आले व अजूनही सुरू आहेत. औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यापासूनच हॉस्पिटलचे कामकाज सुरू झाले. जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्या पत्नी सोनम यांच्यावरही हॉस्पिटलमध्ये उपचार झाले. या हॉस्पिटलमध्ये मोठ्या अंतरावर बेड असून, हवा खेळती आहे. भोजनाची उत्तम सोय असून, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची अखंड सेवा सुरू आहे. दर्जेदार उपचार व सुविधांसाठी अधिष्ठाता डॉ. मोहन डोईबळे यांच्यासह वरिष्ठांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे. यामुळे अडीच महिन्यांतच रुग्णांचा विश्वास संपादन करत कोरोना उपचारामध्ये शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेने सुपर स्पेशालिटी मिळवल्याचे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले. 

(संपादन-प्रताप अवचार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com