झोपडपट्टीसह पालावर अन्नधान्याचा पुरवठा 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 April 2020

हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांची गैरसोय होऊ नये म्हणून बदनापूर  मतदारसंघातील ५ हजार ६५६ कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे.अंबड येथील पालावर गुरुवारी अन्नधान्याचा पुरवठा करण्यास सुरुवात करण्यात आली. लॉकडाऊन असेपर्यंत या गरजू कुटुंबांना अन्नधान्य पुरवठा करण्यात येणार आहे. 

जालना/बदनापूर -  लॉकडाऊनच्या काळात आपल्या मतदारसंघात बाहेरून आलेले तसेच जिल्ह्यातील एकही कष्टकरी मजूर कुटुंब उपाशीपोटी राहू नये यासाठी बदनापूर मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी साडेसात हजार कुटुंबांना दोन आठवडे पुरेल एवढ्या अन्नधान्याचा पुरवठा करण्यास अंबड येथील पालावर गुरुवारी (ता.दोन ) सुरुवात केली आहे. लॉकडाऊन असेपर्यंत या गरजू कुटुंबांना अन्नधान्य पुरवठा करण्यात येणार असल्याचे श्री. कुचे यांनी सांगितले आहे. 

अंबड शहरात विविध भागात पाल ठोकून राहणारे जवळपास तीनशे कुटुंब आहे. सर्कशीचे खेळ दाखवून, तर कुणी छोट्या मोठ्या वस्तू बनवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. लॉकडाऊन मुळे या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने नगरसेवक धर्मराज बाबर यांनी या सर्व कुटुंबाच्या परिस्थितीबाबत आमदार नारायण कुचे यांना कळवले.

हेही वाचा :  चाळीस किलोमीटर पायपीट करून गाठले बदनापूर 

श्री कुचे यांनी बदनापूर मतदारसंघातील अशा सर्व कुटुंबाच्या पोटाची जबाबदारी उचलली असून गुरुवारपासून पालावर व झोपडपट्टीत राहणाऱ्या शेकडो कुटुंबाला दोन किलो तांदूळ व पाच किलो गहु वाटप केले आहे.

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

हे धान्य दळून आणण्यासाठी जवळच एका गिरणीची व्यवस्था केली आहे. काही कुटुंबातील सदस्यांची संख्या जास्त असल्याने त्यांना पुन्हा अन्नधान्य वाटप करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी रासायनिक द्रव्याची फवारणीही करण्यात आली. 

साडेपाच हजार कुटुंबांना दिलासा

हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांची गैरसोय होऊ नये म्हणून आमदार कुचे यांच्या वतीने बदनापूर-अंबड मतदारसंघातील ५ हजार ६५६ कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. मतदारसंघात येणाऱ्या भोकरदन तालुक्यातील १ हजार ५६ कुटुंब, बदनापूर तालुक्यातील २ हजार गरजू कुटुंब, तर अंबड शहरासह तालुक्यातील अडीच हजार कुटुंबांना आमदार कुचे व भारतीय जनता पक्षाच्या वतीने पाच किलो गहू, पाच किलो तांदूळ व पिठाची थैलीचे येत्या दोन दिवसांत वाटप करण्यात येत आहे

एक महिन्याचे मानधन देणार 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेसह इतर बाबींवर मोठा खर्च होणार आहे. त्यामुळे आम्ही शासनाला कोरोनाच्या लढाईसाठी आमचे मार्च महिन्याचे मानधन देण्याचे जाहीर केले आहे. शिवाय मतदारसंघात कोरोनावर उपाययोजना व मदत करण्यासाठी आमदार निधीतून ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार कुचे यांनी दिली. 

 

देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे. त्याचे रूपांतर सामाजिक संसर्गात होऊन साथरोग पसरू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खबरदारी घेत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होण्यास निश्चित मदत मिळेल. मात्र, अशा परिस्थितीत कुणीही उपाशी राहू नये, यासाठी हातावर पोट असणारे रोजंदारी मजूर, कामगार अशा गरजू कुटुंबांना मदत करण्यात येत आहे.   

- नारायण कुचे , आमदार  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supply of food grains in slums