
अधिकृत टेंडर नसतानाही चोरून वाळूची वाहतूक करणारे टिप्पर तहसीलदार वैशाली पाटील यांनी रविवारी (ता.२०) सकाळी आठ वाजता फिल्मीस्टाईल पाठलाग करुन पकडले.
माजलगाव (जि.बीड) : अधिकृत टेंडर नसतानाही चोरून वाळूची वाहतूक करणारे टिप्पर तहसीलदार वैशाली पाटील यांनी रविवारी (ता.२०) सकाळी आठ वाजता फिल्मीस्टाईल पाठलाग करुन पकडले. तहसीलदारांचे वाहन पाहताच टिप्पर चालकाने हुलकावणी देऊन वेगात पळ काढला होता. मात्र तहसीलदार पाटील यांनी चार किलोमीटर पाठलाग करत हे टिप्पर ताब्यात घेतले. गोदावरी, सिंदफना नदीचे वरदान लाभलेल्या माजलगाव तालुका वाळू माफियांसाठी कुरण ठरला आहे. यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे गोदावरी नदीपात्रात मोठ्याप्रमाणात वाळूचा साठा निर्माण झाल्याने बाहेर जिल्ह्यातूनही वाळू माफिया तालुक्यात दाखल झाले आहेत.
सद्यःस्थितीत जिल्हा प्रशासनाचे कोणतेही अधिकृत टेंडर, ठेका निघालेला नसतानाही मध्यरात्री, पहाटे वाळूच्या मोठमोठे टिप्पर रस्त्यावरून धावतात. नदीपात्रात पाणीसाठा असला तरी केनी सारख्या यंत्राने वाळू काढून त्याची बेभाव चोरून विक्री होत आहे. एक टिप्पर ४० ते ५० हजार रुपयांना विक्री करून माफिया उखळ पांढरे करून घेत आहेत. रविवारी (ता. २०) सकाळी एक टिप्पर वाळू घेऊन येत असल्याची माहिती तहसीलदार वैशाली पाटील यांनी मिळाल्याने त्यांनी केसापुरी कॅम्प जवळ राष्ट्रीय महामार्गावर ठाण मांडले. वाळूचा टिप्पर येताच त्याला रोखण्याचा प्रयत्न केला.
मात्र चालकाने टिप्परमधील वाळू रस्त्यावर टाकून हुलकावणी देत वेगाने पळ काढला. पळून जाणाऱ्या टिप्परच्या मागे वाहन लावून तहसीलदार पाटील यांनी फिल्मस्टाईल पाठलाग सुरू केला. शेवटची चार किलोमीटर पाठलाग केल्यानंतर भाटवडगाव शिवारात टिप्पर ताब्यात घेऊन ते ग्रामीण पोलीस ठाण्यात लावण्यात आले. तसेच रस्त्यावर टाकलेली वाळूही तहसीलदारांनी ताब्यात घेतली आहे.
पोलिसांची बोटचेपी भूमिका
रात्रीच्यावेळी गोदावरी नदीपात्रातून किती, कोणते टिप्पर, कुठून कोठे जाते याची इतंभूत माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना माहिती आहे. मात्र पोलिस त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे ग्रामीण पोलिसांच्या बोटचेपी भूमिकेवर संशय निर्माण होत आहे.
वाळूचे टिप्पर पाठलाग करून ताब्यात घेतले तसेच रस्त्यावर टाकलेली वाळूही ताब्यात घेतली आहे. लवकरच गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
वैशाली पाटील, तहसीलदार.
Edited - Ganesh Pitekar