करासाठी बँकेच्या एटीएमला ठोकले सील, लातूर महापालिकेची कारवाई

हरी तुगावकर
Thursday, 31 December 2020

लातूर महानगरपालिकेच्या वतीने थकबाकीदारांकडून कर वसूल करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.

लातूर : महानगरपालिकेच्या वतीने थकबाकीदारांकडून कर वसूल करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत गुरुवारी शहरातील एका मालमत्ताधारकाच्या जागेत असणाऱ्या बँकेच्या एटीएमला सील करण्यात आले. महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सध्या खराब आहे. शहरातील नागरिक आणि व्यावसायिक आस्थापनांकडे मोठ्या प्रमाणात कर थकलेला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन आणि दर महिन्याचे वीजबिल भरण्यासाठीही महापालिकेकडे निधी शिल्लक नाही. वारंवार आवाहन करूनही कर भरण्यास नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे अखेर महापालिकेने विशेष वसुली मोहीम सुरू केली आहे.

 

 

 
 

संबंधितांना नोटीस देऊनही कर भरणा केला जात नसेल तर आस्थापना सील केल्या जात आहेत. या विशेष मोहिमेंतर्गत कर थकलेला असल्यामुळे गुरुवारी (ता. ३१) औसा रस्त्यावर कारवाई सुरू करण्यात आली. दुकाने सील करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच दोन दुकानदारांनी १ लाख ६० हजार रुपयांचे धनादेश अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. राजीव गांधी चौकात सुहास बळीराम पालापुरे यांच्या मालमत्तेची १० लाख ७९ हजार ३५६ रुपये थकबाकी आहे.

 

 

 

तीन भरल्यामुळे त्यांच्या जागेतील एका बँकेचे एटीएम सील करण्यात आले. महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त वसुधा फड, झोनल अधिकारी संजय कुलकर्णी यांच्यासह वसुली लिपिक प्रकाश खेकडे, युनूस पठाण यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. शहरातील नागरिकांनी आपल्याकडे थकीत असणारा कर लवकरात लवकर भरून पालिकेला सहकार्य करावे. कारवाई टाळण्यासाठी कराचा भरणा करावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For Tax Bank ATM Sealed, Latur Municipal Corporation Action