जालन्यात दहाजण व्हेंटिलेटरवर 

महेश गायकवाड
Wednesday, 24 June 2020

जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांवर कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी दहाजण व्हेंटिलेटरवर आहेत, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

जालना - जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांवर कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी दहाजण व्हेंटिलेटरवर आहेत, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्यवस्‍थ स्थितीत उपचारासाठी दाखल झालेल्या भोकरदन शहरातील साठवर्षीय रुग्णांचा सोमवारी (ता. २२) मृत्यू झाला. या रुग्णाच्या स्‍वॅब नमुन्याचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे बळी गेलेल्यांचा आकडा बारावर पोचला आहे. जिल्ह्यात मंगळवारी (ता. २३) सहा नवीन रुग्णांची भर पडली, तर नऊजणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. 

हेही वाचा : कोरोनाबाधिताच्या अंत्यविधीला तब्बल शंभर जण

शहरात सातत्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने जालना शहराची चिंता वाढत आहे. सोमवारी शहरात विविध भागांत सात रुग्ण आढळून आल्यानंतर मंगळवारी पुन्हा सहा संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यात पाच रुग्ण हे जालना परिसरातील असून, यामध्ये इंदेवाडी येथील दोन, जालना शहरातील संभाजीनगर येथील दोन आणि रामनगर परिसरात असलेल्या तेली समाजमंदिर भागातील एकाचा समावेश आहे. तर भोकरदन शहरातील नूतन कॉलनीमधील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एकूण बाधितांपैकी नऊ रुग्णांवर यशस्‍वी उपचार करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. त्यांच्या सलग दुसऱ्या स्‍वॅब नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुटी देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये जालना शहरातील अलंकार टॉकीज परिसरातील एक, राज्य राखीव दलातील तीन जवान, समर्थनगर येथील एक, उतारगल्लीतील दोन व सोनक पिंपळगाव येथील दोघांचा समावेश आहे.

हेही वाचा : पीककर्जावर शेतकऱ्यांची मदार

दरम्यान, मंगळवारी मृत्यू झालेला रुग्ण श्‍वसनाचा त्रास होत असल्याने ता. १९ जून रोजी भोकरदन शहरातील एका खासगी रुग्णालयात भरती झाला होता. त्याची प्रकृती गंभीर झाल्यानंतर पुन्हा जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले; मात्र तरीही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने सोमवारी शेवटी जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यात २२५ व्यक्तींचे संस्‍थात्मक अलगीकरण

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात २२५ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यामध्ये जालना शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात १४, मोतीबाग येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात १९, मुलींच्या शासकीय निवासी वसतिगृहात २६, तर बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात ५९ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. परतूर येथील मॉडेल स्कूलमध्ये ६, अंबडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात २, तर शासकीय मुलींच्या वसतिगृहात ११ व्यक्ती अलगीकरणात आहेत. बदनापूरमधील शासकीय मुलांच्या वसतिगृहात १५, भोकरदन येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात ३, भोकरदन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात १३ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे; तसेच जाफराबाद येथील हिंदुस्थान मंगल कार्यालयात १२, आयटीआय कॉलेजमध्ये ४१, टेंभुर्णीतील ई.बी.के. विद्यालयात ४ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten patients on ventilator in Jalna