शेतकऱ्यांच्या थकीत पीककर्ज खात्यात तब्बल ८५० कोटी २३ लाख जमा

दत्ता देशमुख
Friday, 27 March 2020

  • एक लाख ४६ हजार ६२५ शेतकऱ्यांना ८५० कोटी रुपये 
  • यापूर्वीच्या कर्जमाफीत भेटले होते ८५३ कोटी रुपये 
  • एसबीआय, महाराष्ट्र ग्रामीण व डीसीसीला सर्वाधिक रक्कम 
  • आणखी दीड लाखावर शेतकऱ्यांना मिळणार माफी 
  • कोरोनामुळे प्रमाणीकरण बंद असल्याने प्रक्रिया थंड 

बीड - तत्कालीन महायुती सरकारने दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेपेक्षा आताच्या महाविकास आघाडी सरकारने घोषित केलेली महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार, असा ‘सकाळ’चा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. मागच्या सरकारच्या काळात ८५३ कोटी रुपये कर्जमाफी भेटली होती.

आताच्या कर्जमाफीत शुक्रवारपर्यंत (ता. १७) शेतकऱ्यांच्या थकीत पीककर्ज खात्यात तब्बल ८५० कोटी २३ लाख रुपये जमा झाले आहेत. आणखी दीड लाखावर शेतकऱ्यांना माफी मिळणार आहे. त्यामुळे मागच्या कर्जमाफी योजनेपेक्षा आताचा माफीच्या रकमेचा आकडा दुपटीहून अधिक होण्याची शक्यता आहे. महायुती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली होती. जून २०१६ पर्यंत पीककर्ज खाते थकीत असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपयांची माफी जाहीर केली होती.

हेही वाचा - कोंबड्यांमध्ये खरंच कोरोना विषाणू आहे का? नॉनव्हेजवाल्यानो, वाचा...

मागच्या वेळी एक लाख ४० हजार शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ झाला होता. त्यापोटी त्यांना ७१५ कोटी रुपये कर्जमाफी मिळाली होती. तर, ओटीएस असलेल्या आठ हजार ८८२ खातेदारांना ८७ कोटी रुपयांचा लाभ झाला होता. नियमित पीककर्जाची परतफेड करणाऱ्या ३६ हजार २०० शेतकऱ्यांना ५१ कोटी ४४ लाख रुपयांचा लाभ झाला होता. असा एकूण एक लाख ८२ हजार ३७५ शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ८५३ कोटी ७२ लाख रुपयांची रक्कम जमा झाली होती. 

हेही वाचा - अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिरातील दर्शन बंद, फक्त पुजाऱ्यांना प्रवेश

आताचे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळायला सुरवात झाली आहे. एक एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत दोन लाख रुपयांपर्यंतच्या थकीत पीककर्ज खातेदाराला सरसकट माफी मिळत आहे. यानुसार दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीच्या लाभासाठी थकीत कर्जाच्या मुदतीत बसणारे तीन लाख तीन हजार ७८२ कर्जदार शेतकरी आहेत. तर, पुनर्गठण केलेल्या १६ हजार ८४३ शेतकरीही या माफीस पात्र ठरणार आहेत. 

हेही वाचा - कोरोना इफेक्ट - साखरपुड्यात विवाह उरकून एक लाख दिले मुख्यमंत्री निधीत

मागच्या कर्जमाफीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ८५३ कोटी रुपये जमा झाले होते. आताच्या माफीत तीन लाख तीन हजार ९२५ शेतकरी पात्र ठरणार आहेत. आतापर्यंत जाहीर झालेल्या कर्जमाफीच्या यादीत जिल्ह्यातील १३२२ गावांतील एक लाख ९० हजार ५५९ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यापैकी एक लाख ५६ हजार ७२१ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. आतापर्यंत एक लाख ४६ हजार ६२५ शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल ८५० कोटी २३ लाख रुपये जमा झाले आहेत. आणखी दीड लाखावर शेतकऱ्यांना माफीचा लाभ भेटणार आहे. त्यामुळे मागच्या कर्जमाफीच्या रकमेच्या दुप्पट यंदा लाभ भेटण्याचा अंदाज आहे. 

कोरोनाचा परिणाम; प्रक्रिया थंड 
कर्जमाफीची यादी जाहीर झाल्यानंतर आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होते. मात्र, कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आधार प्रमाणीकरण केंद्र बंद आहेत. त्यामुळे पात्र ठरलेल्यांपैकी आणखी ४५ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या रकमेसाठी वाट पाहावी लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A total of Rs 1 crore 3 lakh deposits in the crop loan account