दोन एकरातील पपई बागेवर चालविले ट्रॅक्टर!  

विशाल अस्वार 
Wednesday, 18 November 2020

आधी कोरोनामुळे सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे पपईची विक्री करताना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यातच अतिवृष्टीने होते नव्हते सर्वच नेले. तरी देखील हिमतीने फळबाग वाचविण्यासाठी शेतकऱ्याने धडपड सुरूच ठेवली होती. मात्र, आता होणारा खर्च हा उत्पन्न खर्च देखील देऊ शकत नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या वालसावंगीच्या शेतकऱ्याने दोन एकरातील पपई फळबागेवर ट्रॅक्टर चालविला. 

वालसावंगी (जालना) : मध्यंतरी पडलेल्या पावसाचा फटका खरीप हंगामातील पिकांसोबत फळबागांना देखील बसला असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सततच्या पावसामुळे पपई फळबाग करपली असून शेतकरी आता त्यावर ट्रॅक्टर फिरवीत आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

वालसावंगी येथील शेतकरी श्रीकांत आखाडे यांनी आपल्या दोन एकरात तायवान 786 प्रजातीच्या पपईच्या 1600 झाडांची लागवड केली. राखलेली योग्य निगा आणि पाण्याचे केलेले योग्य नियोजन यामुळे पपई बाग मोठ्या प्रमाणावर बहरली. चांगल्या प्रकारे पपई देखील लगडली. यामध्ये आंतरपीक म्हणून त्यांनी रब्बी हरभरा पीक देखील यामध्ये घेतले. यातून देखील त्यांना आर्थिक फायदा झाला होता. मात्र ऐन पपई विक्रीच्या वेळी कोरोनामुळे लॉकडाऊन लागले आणि विक्रीवर निर्बंध आले. तरीदेखील श्रीकांत आखाडे यांनी हार न मानता सोशल मीडियावर पपईचा प्रसार करत गावात विक्री केली. नंतर पपईची माहिती झाल्यावर थेट शेतातून व्यापारी पपई खरेदी करत यामुळे चांगले आर्थिक उत्पन्न मिळू लागले. दोन पैसे मिळण्याची आशा उत्पादक शेतकऱ्यांना लागली. मात्र नंतर परिसरात पावसाने एंट्री घेतली आणि पपई बागेचा घात झाला. सतत पाऊस कधी जोरदार तर संततधारेने पपई बागेचे मोठे नुकसान झाले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सततच्या पावसामुळे बहरलेल्या फळे लगडलेल्या पपई बागेवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. यामुळे अनेक झाडे करपली शिवाय आता पपईला बाजारात कवडीमोल भाव मिळतो आहे. यामुळे शेतकरी श्रीकांत आखाडे यांनी पपई बागेवर ट्रॅक्टर चालविला असून रब्बीसाठी शेत तयार करत असून लवकरच शेतात रब्बी हंगामातील पिकांची लागवड करणार आहे. एकूणच यंदा पाऊस आणि कोरोनामुळे फळबागेचे मोठे नुकसान झाले असून उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शेतकरी श्रीकांत आखाडे म्हणाले की शेतीत प्रयोग म्हणून शेतात पपई फळबाग लागवड केली, फळबाग देखील बहरलेल्या अवस्थेत होता. पपई देखील चांगल्या प्रकारे लगडली होती. मात्र कोरोनामुळे विक्री करताना असंख्य अडचणी आल्या. त्यावर मात करत नाही तोच पावसाने बागेचा मोठा घात झाला अनेक झाडे करपली. त्यात आता भाव देखील कवडीमोल मिळत असल्याने बागेवर ट्रॅक्टर चालविले आहे. एकूणच तीन लाखाचे नुकसान यामुळे झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tractor driven on two acres papaya orchard