जयंती विशेष : परिवर्तनवादी युगपुरुष- महात्मा बसवेश्वर

फोटो
फोटो

नांदेड : प्राचीन भारत आणि भारताचा इतिहास जितका समृद्ध आहे, तितकाच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक प्रमाणामध्ये दक्षिण भारताचा इतिहास समृद्ध आहे. मध्ययुगीन बारावे शतक हे परिवर्तनाचे शतक मानले जाते. आजपासून 850 वर्षांपूर्वीची सामाजिक, धार्मिक परिस्थिती खूप बिकट होती. माणूस माणसाचा गुलाम बनला होता. कष्ट न करता, फुकट खाणारा वर्ग समाजात वाढला होता. कष्ट करणारे अठरा अलुतेदार बारा बलुतेदार कष्ट करत होते. शेठजी, भटजी यासारखे फुकटचे खाणारे लोक धर्माच्या नावाखाली स्तोम माजवत होते. 

शुद्रांचा स्पर्श बाट समजला जात होता. दगड धोंड्यांना देव मानून पुजा करणाऱ्या लोकांची संख्या वाढली होती. नितिनैतिकते पेक्षा भोळा भक्तीभाव वाढला होता. दंभ दांभिकता वाढली होती. यज्ञ होम- हवन , पशुहत्या, व्रतवैकल्य सोवळे-ओवळे, बुवाबाजी वाढली होती. कल्पो कल्पित ग्रंथांना प्रमाण मानून समाज नागवला जात होता. भारतीय कालानुक्रमात बारावे शतक हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. धर्म सुधारण्याची व मानवाधिकाराच्या संवर्धनाची व परिवर्तनाची चळवळ याच शतकात देशातील विविध भागात सुरु झाली होती. महाराष्ट्रात चक्रधर स्वामी, उत्तरेत संत कबीर, पंजाबमध्ये गुरुनानक व कर्नाटकमध्ये महात्मा बसवेश्वर अशा विभूतींनी साम्यवादाची चळवळ संपूर्ण देशभर उभी केली. 

वीरशैव- लिंगायत दांपत्याच्या पोटी महात्मा बसवेश्वर यांचा जन्म 

प्रस्थापीत समाज व्यवस्था बदलण्याचे आणि समग्र कल्याण समाजक्रांती घडवण्याचे काम महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकामध्ये केले. कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी नावाच्या छोट्याशा खेडेगावात वैशाख शुद्ध अक्षय तृतीया पसन 1131 ला आई मादलंबिका व वडील मादरस या थोर वीरशैव- लिंगायत दांपत्याच्या पोटी महात्मा बसवेश्वर यांचा जन्म झाला. महात्मा बसवेश्वरांना एक भाऊ, एक मोठी बहीण नागलांबिका म्हणजेच आक्का नागाई ही बहिण होती. नंदीचा कृपाशीवाद म्हणून नाव ठेवले बसवेश्वर. हेच लहानसे बसवेश्वर पुढे समता युगाचे महात्मा बसवेश्वर म्हणून जगाला परिचित झाले. बालपणापासूनच बाल बसवेश्वर अत्यंत चिकित्सक वृत्तीचे होते. जे बालपणापासूनच दिव्यत्वाची प्रचिती देत होते. जे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या व दिसणाऱ्या सर्व घटना ते बारकाईने पाहत. ते अत्यंत चौकस व कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. 

गावकुसाबाहेरील बांधवांचा होत असलेला अमानुष छळ 

घरादारात मुक्या प्राण्यांना कुत्र्या- मांजराना मुक्तपणे वावर पण विशिष्ट वर्गातील लोकांची दाराबाहेर होत असलेला अभद्र व्यवहार, सर्वांना मिळत असलेल्या भौतिक व धार्मिक सुविधा पण गावकुसाबाहेरील बांधवांचा होत असलेला अमानुष छळ अशा सभोवतालच्या परिस्थितीमुळे मनात निर्माण होत असलेल्या प्रश्नांनी बाल बसवेश्वर सर्वांनाच निरुत्तरीत करायचे. एकदा पावसाळ्याच्या दिवसात गावाशेजारील एक छोटा बालक डबक्यात बुडत असल्याचे पाहून बाल बसवेश्वरांनी त्याला बाहेर काढले परंतु डबक्यात बुडणारा मुलगा अस्पृश्य समाजातील असल्याने बाल बसवेश्वराचे कौतुक होण्याऐवजी त्यांना शिक्षा झाली. या घटनेचा बाल बसवेश्वरांच्या मनावर गंभीर परिणाम झाला. वयाच्या आठव्या वर्षी जेव्हा उपनयन संस्कार करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी या संस्काराला नकार दिला. त्यांनी धर्ममार्तंडांना आव्हान दिले. माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या अक्का नागाई या बहिणीचा हा संस्कार पहिलं करा आणि मग माझा करा. धर्म नेते आप्तस्वकीय सगळ्यांनी बाल बसवेश्वरांची समजूत घातली. स्त्री क्षुद्र असते तिला हा संस्कार करता येत नाही. स्त्री जर क्षुद्र असेल तर तिच्या पोटी जन्मनाराही क्षुद्रच असला पाहिजे ना? 

आपल्या जननीचा व जन्मभूमीचा त्याग केला. 

'आई क्षुद्र मुलगा पवित्र' ही गोष्ट मनाला पटत नाही, जोपर्यंत आपण याचे उत्तर नीट देत नाही तोपर्यंत मी हा संस्कार करणार नाही. मानवा- मानवात, आई- मुलात, बहीण- भावात भेद करणारा तुमचा धर्म मी मानणार नाही म्हटल्यावर तत्कालीन परंपरावादी सनातनी धर्ममार्तंड यांना उत्तर देता आले नाही. परंतु त्या धर्ममार्तंडांनी व तत्कालीन समाज व्यवस्थेने बाल बसवेश्वरांच्या पुढे दोन पर्याय ठेवले. पहिला पर्याय असा होता की तुला हा संस्कार करूनच घ्यावा लागेल नसेल तर दुसरा पर्याय तुला जननी आणि जन्मभूमीच्या त्याग करावा लागेल. बाल बसवेश्वर अवघ्या आठ वर्षाचे असतानाही त्यांनी क्षणाचाही विचार न करता माझ्या आत्म्याला जोपर्यंत एखादी गोष्ट पटत नाही तोपर्यंत मी ती मान्य करणार नाही. म्हणून दृढ निश्चय केला व दुसरा पर्याय निवडतो असे म्हणून त्यांनी आपल्या जननीचा व जन्मभूमीचा त्याग केला. 

अत्यंत हुशार व चाणाक्ष बुद्धीच्या महात्मा बसवेश्वर

पुढे ते मंगळवेढा जिल्हा सोलापूर (महाराष्ट्र ) येथे येऊन राजा बीज्जलाच्या दरबारात कारकुनाची नोकरी करू लागले. अत्यंत हुशार व चाणाक्ष बुद्धीच्या महात्मा बसवेश्वर यांनी एका ताम्रपटात वरील अवघड अशा लेखांच्या आधारे बिज्जल राजास फार मोठ्या खजिन्याचा शोध लावून दिला. महात्मा बसवेश्वर यांची प्रचंड बुद्धिमत्ता प्रभावी राज्य प्रशासन व्यवस्था पाहून आनंदी झालेल्या बीजल राजाने त्यांना मुख्य कोषागार करून आपल्या बहिणीचा म्हणजेच निलांबिकेचा (सिद्धरस राजाची कन्या) विवाह महात्मा बसवेश्वर बरोबर लावून दिला. इतिहास काळात राजे, सामंत, सरदार यांच्यात बहुपत्नीत्वाची पद्धत रूढ होती. 

आंतरजातीय विवाह करण्याचा संदेश

महात्मा बसवेश्वर यांची दुसरी पत्नी सिद्धरस राजाची क्षत्रिय कन्या म्हणजेच हा विवाह आंतरजातीय विवाह होता. दुसऱ्यांना आंतरजातीय विवाह करण्याचा संदेश देण्यापूर्वी स्वतःच आंतरजातीय लग्न करणारे महात्मा बसवेश्वर हे बाराव्या शतकातील एकमेव क्रांतिकारी महामानव होते. महात्मा बसवेश्वरांनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता व जातिभेदाचे अवलोकन केले. राजसत्तेचा वापर समाज सुधारणेसाठी केला पाहिजे, ही प्रेरणा त्यांना मंगळवेढ्यात मिळाली. समग्र समाज क्रांतीची कल्पना त्यांच्या मनात निर्माण झाली होती.    
             
लोकहिताचा व समाजहिताचा विचार

कालांतराने महात्मा बसवेश्वर यांच्या सल्ल्यानुसार राजाने आपली राजधानी कल्याण (जिल्हा बिदर) कर्नाटक राज्य म्हणजेच आजचे बसवकल्याण या शहरात आणली. अंधश्रद्धा, जातिभेद, बालविवाह, सतीप्रथा, कर्मकांड, यज्ञयाग अस्पृश्यता, मूर्तिपूजा, वर्ण- वर्गभेद इत्यादी जुन्या सनातनी वैद्यकाच्या अमानुष प्रथेविरुद्ध महात्मा बसवेश्वर बंड करून उठले. लोकहिताचा व समाजहिताचा विचार करून लोकभाषेतून म्हणजेच वचन साहित्यातून महात्मा बसवेश्वर जगाला मानवतावाद सांगू लागले. कल्याण नगरीत महात्मा बसवेश्वर यांच्या प्रेरणेने अनुभव मंडप नावाची धर्म संसद स्थापन करण्यात आली. महान तत्वज्ञानी अल्लमप्रभू हे या अनुभव मंडपाचे अध्यक्ष होते. 

महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडपातून लोकशाहीची निर्मिती केली

12 व्या शतकातही एकविसाव्या शतकाचे आधुनिक विचार असलेल्या महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडपातून लोकशाहीची निर्मिती केली. अनुभव मंडप ही जागतिक इतिहासातील अनन्यसाधारण संस्था होय . विविध जाती- धर्मातील स्त्री- पुरुषांना गळ्यात इष्टलिंग परिधान करून एकत्र जमून निरनिराळ्या विषयांवर चर्चेच्या माध्यमातून जनजागृती केली व खऱ्या अर्थाने स्त्री- पुरुषांना समान अधिकार बहाल करून स्त्रियांच्या आरक्षणाचे जनक ठरले. महात्मा बसवेश्वरांएवढा कृतिशील महापुरुष मध्ययुगात केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात पहावयास मिळणार नाही.
 
कपडे विणून विणकर झाला

महात्मा बसवेश्वर दलित -मागासवर्गीय यांच्या घरी भोजनासाठी आवर्जून जात असत. ढोर कक्कयाला ते आजोबा म्हणत तर मातंग चन्नयाला ते आपले वडील मानत. जाती- वर्ण व्यवसायावरून निर्माण झालेत म्हणून ते एका वचनात म्हणतात लोह कापून लोहार झाला. कपडे विणून विणकर झाला. व्यापार करणारा वाणी झाला. थोडक्यात बाराव्या शतकातील समाजाची निकोप बांधणी करून सामाजिक अभिसरण घडवून आणण्याचा महान प्रयोग महात्मा बसवेश्वरांनी केला. 

संगन्ना सारखे वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत

महात्मा बसवेश्वरांच्या शिवशरण- शिवशरणींच्या परिवारात सर्व स्तरातील लोकांचा समावेश होता. ह्यात संगन्ना सारखे वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत, किन्नरी बोमय्या यासारखे नृत्य -गायनाच्या क्षेत्रातील प्रतिभावंत व गुणी कलावंत होते. सर्वसामान्य तळागाळातील श्रमिक, शेतकरी, साळी, माळी, कोष्टी, कुंभार, मातंग, चर्मकार, न्हावी, धोबी, सफाई कामगार आधी सर्व जण होते. शिवशरण यांच्या परिवारात ढोर कक्कय्या , न्हावी अंजन्न, मांग चन्नया, धनगर रामन्ना परीट माचीदेव, चांभार हरळय्या, सोनार बोमैय्या, तेली कन्नया, शिंपी शंकर दासिमया, दलित उरलिंग पेद्दी आणि नावाड्या अंबीवार चौडय्या इत्यादीचा समावेश होता. 

आपला चरितार्थ चालविण्यासाठी कोणताही व्यवसाय केला पाहिजे

महात्मा बसवेश्वर यांचे आणखी एक वचन होते 'काय कवे कैलास ' (श्रम हाच स्वर्ग') कायक म्हणजे देहासी निगडित ते ते सर्व होय. काया म्हणजे देह किंवा शरीर. अंग मेहनत किंवा व्यक्तीने केलेले कुठलेही कार्य असा त्याचा अर्थ होतो. महात्मा बसवेश्वर यांच्या मते प्रत्येक व्यक्तीने आपला चरितार्थ चालविण्यासाठी कोणताही व्यवसाय केला पाहिजे. प्रामाणिकपणे काम करत राहणे या गोष्टीला महत्त्व दिले पाहिजे. श्रम केल्याशिवाय भाकरी खाण्याचा कोणालाही अधिकार नाही हे सूत्र महात्मा बसवेश्वरांनी कार्ल मार्क्सच्या पूर्वी सातशे वर्ष अगोदर समाजासमोर मांडले. श्रम हाच साक्षात कैलास आणि स्वर्ग होय अशी अत्यंत व्यापक भूमिका त्यांनी मांडली. 

सनातन वाद्यांनी हिंसेचे थैमान चालवले

दरम्यान अनुभव मंडपातील शिवशरण यांनी अस्पृश्यता व जातिभेदा विरुद्ध एक निर्णायक पाऊल उचलले ते आंतरजातीय विवाहाचे. महात्मा बसवेश्वर यांच्या प्रेरणेने शिव दीक्षा स्वीकारून ब्राह्मण मधुवरसाने आपल्या मुलीचा विवाह ढोर जातीतील हरळय्याच्या मुलाशी लावून दिला. चातुर्वर्णीयांना दिलेला हा सर्वात मोठा धक्का होता. परिणामी सनातन वाद्यांनी हिंसेचे थैमान चालवले, अराजकता माजवली .हरळय्या व मधुवरसाला ठार मारण्यात आले. सनातनी व पुरोहित यांनी बिज्जल राजाचाही वध करविला .भक्ती, ज्ञान, करुणा व सात्विकतेच्या स्तंभावर उभारलेल्या अनुभव मंडपातील शिवशरनांवरती भ्याड हल्ले केले. शरणांना जिवंत जाळण्यात आले. सर्वत्र लुटालूट व रक्तपात होऊ लागला.

समतेच्या लढाईतच त्यांना होतात्म्य मिळाले असावे

समतेची उद्घोषणा करणाऱ्या वचन साहित्याला पाठीवर बांधून सर्व शिवशरण शस्त्र हातात घेऊन वचन साहित्याच्या रक्षणासाठी लढू लागले. त्यामुळे महात्मा बसवेश्वर खिन्न मनाने कुडल संगम क्षेत्री गेले की त्यांचे अपहरण झाले, महात्मा बसवेश्वर यांच्या समाधीचे रहस्य संत तुकोबारायांच्या सदेह वैकुंठगमना  इतकेच रहस्यमय असले पाहिजे. समतेच्या लढाईतच त्यांना होतात्म्य मिळाले असावे. हे काळाच्या गर्भात दडलेल्या वास्तविकतेच्या उद्यासाठी, नव्या समाज निर्मितीसाठी संत साहित्याच्या अभ्यासाची संशोधनाची खरी गरज आहे. कुठलेही संत- महात्मे हे जात, भाषा, प्रांत यापुरते मर्यादित नसतात तर ते सकल मानवजातीच्या पुनरुत्थानाचे आदर्श असतात. अशा या थोर परिवर्तनवादी क्रांतिकारी युगपुरुषांच्या 889 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला आणि विचाराला कोटी कोटी प्रणाम!             
संजय कोठाळे (लेखक हे मराठवाडा अध्यक्ष, शिवा कर्मचारी महासंघ तथा मराठवाडा अध्यक्ष शिक्षक परिषद, नांदेड) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com