निवडणुकीतून दोन हजार उमेदवारांची माघार, लातूर जिल्ह्यातील २५ ग्रामपंचायती बिनविरोध

विकास गाढवे
Wednesday, 6 January 2021

लातूर  जिल्ह्यातील ४०८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे चित्र मंगळवारी (ता. पाच) स्पष्ट झाले.

लातूर : जिल्ह्यातील ४०८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे चित्र मंगळवारी (ता. पाच) स्पष्ट झाले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (ता. पाच) तब्बल दोन हजार २३९ उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली घेतली आहे. यामुळे तब्बल पंचवीस ग्रामपंचायतींसह २०२ सदस्यांच्या जागाही बिनविरोध निवडून आल्या आहेत. यामुळे आता तीन हजार ३५० जागांसाठी सहा हजार ६८८ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. यामुळे सर्वच ठिकाणी थेट लढत होणार असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील ४०८ ग्रामपंचायतीच्या एक हजार ३४१ प्रभागातील तीन हजार ५४८ सदस्यांच्या जागेसाठी निवडणूक सुरू आहे.

 

पती हर्षवर्धनविरोधात संजना जाधव निवडणुकीच्या रणांगणात, मुलाचे आईविरुद्ध पॅनल

 

यासाठी तब्बल नऊ हजार ९७३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत दोन हजार २३९ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे पंचवीस ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. यात काही जागांसाठी विविध कारणांमुळे उमेदवारी अर्ज न आल्याने या जागा रिक्त राहिल्या आहेत. यात २०२ सदस्यांच्या जागा बिनविरोध आल्याने उरलेल्या जागांसाठी सहा हजार ६८८ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. रिक्त जागांच्या तुलनेत उमेदवारांची संख्या दुप्पट असल्याने सर्वच ठिकाणी दुरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर लागलीच निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर निवडणूक प्रचाराला सुरवात झाली आहे.

 

मेहबूब शेख प्रकरणी पीडित तरुणीने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा - निलम गोऱ्हे

बिनविरोध आलेल्या ग्रामपंचायती
बिनविरोध आलेल्या ग्रामपंचायतीत लातूर तालुक्यातील उटी व ढोकी, औसा तालुक्यातील कमालपूर, रेणापूर तालुक्यातील फावडेवाडी, निलंगा तालुक्यातील डांगेवाडी, गुऱ्हाळ, सिंगनाळ व आनंदवाडी, देवणी तालुक्यातील कमालवाडी (ता. देवणी), अहमदपूर तालुक्यातील कौडगाव, गादेवाडी, नागझरी, लिंगदाळ, वंजारवाडी, तळेगाव, केंद्रेवाडी, चाकूर तालुक्यातील ब्रह्मवाडी व केंद्रेवाडी, उदगीर तालुक्यातील जखनाळ, टाकळी वागदरी, धडकनाळ, रुद्रवाडी, डांगेवाडी, क्षेत्रफळ तर जळकोट तालुक्यातील तिरुका ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

सहा प्रभाग बिनविरोध
लातूर तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीशिवाय सिरसी, सारोळा, टाकळगाव व कानडी बोरगाव येथील प्रत्येकी एक तर चिखुर्डा येथील दोन प्रभागाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. टाकळगाव व टाकळी येथील प्रत्येकी एक जागा रिक्त राहिली आहे. ७० सदस्य बिनविरोध निवडून आले असून, आता ५२४ जागांसाठी एक हजार ३१२ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत.

 

Edited - Ganesh Pitekar
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Thousand Candidates Withdrawal Nomination Latur News