
Beed Accident| बाजूने जात असलेल्या दुचाकीवर ट्रक ऊसासह पडला, दोन तरुण ठार
केज (जि.बीड ) : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकची शहरातील भवानी चौकात ट्रॅक्टरला धडक बसली. यावेळी बाजूने जात असलेल्या दुचाकीवर ट्रक ऊसासह पडला. यामध्ये दुचाकीवरील दोन तरुण ठार झाले. ही घटना रविवारी (ता.आठ) दुपारी चारच्या सुमारास घडली. या अपघातात (Accident) ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. चालक हरिभाऊ पांचाळ (रा.उमरी, ता. केज) हे ट्रकमधून (एमएच ०८ एच ३०८) धारूर रस्त्याने येडेश्वरी साखर कारखान्यासाठी ऊस घेऊन जात होते. भवानी चौकात ट्रॅक्टरशी ट्रकची धडक झाली. यात ट्रक पलटी झाला. यावेळी पेट्रोल पंपाजवळून बुलेटने (एमएच-१७/ बीए-३१३) असलेल्या शहबाज नसीर कुरेशी (वय २५ रा, कुरेशी गल्ली) आणि जुबेर आसेफ शेख (२६, रा. इस्माईल बाग केज) यांच्या अंगावर ऊसासह ट्रक पडला. त्याखाली दबून दोघांचाही जागीच मृत्यू झाला. क्रेनच्या मदतीने ऊस बाजूला करून मृतदेह बाहेर काढण्यात आले. या अपघातामुळे बीड (Beed) -अंबाजोगाई आणि कळंब-धारूर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने सायंकाळी सातपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. (Two Youth Died In Accident In Keij Of Beed)
हेही वाचा: आनंद महिंद्रांनी पाळला शब्द,'मदर्स डे'ला 'इडली अम्मा'ला दिले नवीन घर
मृतदेह पोलिस ठाण्यात
दोन्ही तरुणांचे मृतदेह नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात आणत रस्त्याचे काम करणाऱ्या एच. पी. एम. या कंत्राटदार कंपनीसह ट्रक चालकावर गुन्हा नोंद करण्याच्या मागणी केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. तरुणांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कारवाईचे आश्वासन पोलिसांनी दिले.
हेही वाचा: 'तू मिसळ महोत्सव घे, मी नक्की येईन'; राज ठाकरेंचं वसंत मोरेंना आश्वासन
रस्ते ठेवले खोदून
या रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीने रस्ते अर्धवट खोदून ठेवले. त्यामुळे धारूरकडून केज अंबाजोगाईकडे जाणाऱ्या वाहनांना वळण घेण्यास अडथळा येत आहे. हीच बाब अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
Web Title: Two Youth Died In Accident In Keij Of Beed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..