esakal | उदगीरच्या ट्रामा केअरचा मार्ग मोकळा ! पावणे तीन कोटीच्या निधीला मंजुरी ! 
sakal

बोलून बातमी शोधा

udgeer hospital ११.jpg

राज्यमंत्री संजय बनसोडे यांची माहिती. टप्पा दोनच्या कामाला होणार सुरुवात, डिपीसीतून निधी मिळणार. 

उदगीरच्या ट्रामा केअरचा मार्ग मोकळा ! पावणे तीन कोटीच्या निधीला मंजुरी ! 

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (लातूर) : गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या येथील सामान्य रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटर (टप्पा क्रमांक -२) अद्ययावत इमारत बांधकामासाठी दोन कोटी ७६ लाख रुपयाच्या कामास राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने गुरूवारी (ता.१) मंजुरी दिली आहे. अशी माहिती संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

उदगीरचे तत्कालीन आमदार (कै) चंद्रशेखर भोसले यांच्या प्रयत्नाने तत्कालीन मुख्यमंत्री (कै) विलासराव देशमुख यांनी उदगीरच्या या ट्रामा केअर सेंटरला मंजुरी दिली होती. त्यानंतर २०१३ मध्ये तत्कालीन आमदार सुधाकर भालेराव यांनी दोन कोटी ६ लाख रुपये मंजूर करून पहिल्या टप्प्याचे काम केले होते. मात्र उर्वरित बांधकामाला मुहूर्त लागत नव्हता. उदगीर व परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा मागणी करूनही हे काम मार्गी लागत नव्हते. त्यानंतर राज्यमंत्री श्री. संजय बनसोडे यांच्या प्रयत्नाने ट्रामा केअर सेंटर टप्पा क्रमांक दोनचा आराखडा शासनाच्या आरोग्य विभागाकडे सादर करण्यात आला होता.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 
सध्या उदगीर व परिसरात आणि लातूर जिल्ह्यात कोरोना संसर्गजन्य परिस्थिती दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने या ट्रामा केअर सेंटरच्या इमारतीचा उपयोग कोरोना रुग्णांसाठी करण्यात येऊ शकतो. त्यासाठी ही मंजुरी मिळणे महत्वाचे असल्याची भूमिका राज्यमंत्री श्री बनसोडे यांनी बैठकीत मांडली. आरोग्य विभागाने या ट्रामा केअर सेंटरला गुरुवारी शासन निर्णय काढत मंजुरी दिली आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

डीपीसी मधून निधीची तरतूद
या ट्रामा केअर सेंटरच्या टप्पा क्रमांक- २ साठी आवश्यक असणाऱ्या दोन कोटी ७६ लाख रुपयांचा निधीची उपलब्धता जिल्हास्तरावरील डीपीसी मधून करण्यात यावी, अशी शासन निर्णयात तरतूद करण्यात आली आहे. शिवाय सविस्तर अंदाजपत्रक, पर्यावरण विभागाच्या मंजुऱ्या व इतर आवश्यक बाबी तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना या आदेशात देण्यात आल्या आहेत.

(संपादन-प्रताप अवचार)