उमरगा पाऊस जीवघेणा : पंधरा तासांपासून पाण्यात अडकलेले बाप-लेक सुखरुप बाहेर

avinash kale.jpg
avinash kale.jpg

उमरगा (उस्मानाबाद) : पावसाच्या तडाक्याने शेतीचे प्रचंड नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत असताना नियमितपणे शेतात मुक्कामी गेलेल्या कदेर (ता.उमरगा) येथील बाप - लेकांना आजू-बाजूच्या नदी, नाल्याच्या पाण्याने घेरा घातला अन् त्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. अखेर ग्रामस्थ व प्रशासनाला तिसऱ्या प्रयत्नात बुधवारी (ता.१४) मध्यरात्री दोघांना बाहेर काढण्यात यश आले.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
तालुक्यातील कदेर येथील माजी सैनिक, शेतकरी विकास सुभाष येवते व त्यांचा मुलगा अभिजीत विकास येवते मंगळवारी शेतात मुक्कामी होते. रात्रभर मुसळधार झालेल्या पावसाने आजू- बाजूच्या नदी, ओढ्याचे पाणी त्यांच्या शेतात शिरले आणि बुधवारी सकाळी शेतात पुरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे बाप - लेकांना भयावह पाण्यातून बाहेर येणे शक्य नव्हते.

माजी सैनिक विकास यांनी धैर्याने पोहत जाण्याचा प्रयत्न केला मात्र पाणी पातळी वाढल्याने अशक्य झाले. शेवटी त्यांना निलगिरीच्या झाडाचा आधार घ्यावा लागला. मुलगा अभिजित शेडमध्ये अडकले, तेथेही पाणी शिरले. पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील, गोविंद येवते, अनिल चौधरी, महेश राठोड, विशाल जाधव यांनी बुधवारी पाण्यात उतरून त्यांना काढण्याचा प्रयत्न केला मात्र यशस्वी होऊ शकला नाही, उलट या लोकांना परतावे लागले.  उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, पोलिस निरीक्षक गजानन घाडगे, नायब तहसीलदार डॉ. रोहन काळे, विलास तरंगे, तालुका कृषि अधिकारी सुनील जाधव घटनास्थळी होते. रात्री आठच्या सुमारास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थान पथकाने (एन.डी.आर.एफ.) यांत्रिक बोटीतून जाण्याचा प्रयत्न केला. परंतू तांत्रिक अडचणीमुळे बोट अर्ध्यातच उलटली, त्यात असलेले पंचायत समितीचे माजी सभापती श्री. पाटील व एका जवानाने बोट धरण्याचा प्रयत्न करत या एकाचा आधार घेतला त्यातूनही बोट निसटली. अन्य दोन जवान पोहत कसेबसे बाहेर आले. त्यानंतर श्री. पाटील व एका जवानाला दोरखंडाने बाहेर काढावे लागले. 

अखेर दोरखंडाचा पर्याय ठरला महत्वपूर्ण
यांत्रिक बोटीचा पर्याय असफल ठरल्यानंतर श्री. पाटील, पोलिस व  महसुल प्रशासनातील चौघे आणि नौदलात नोकरीत असलेले विशाल जाधव, गोविंद येवते, अनिल चौधरी, महेश राठोड, मुकेश दासिमे, अजय भस्मे, योगेश जाधव, गदलेगावचे आण्णाराव जाधव, प्रभाकर जाधव, धनराज बेंडगे, चिंचोलीचे विशाल जाधव यांनी बुधवारी रात्री  अकरापासुन दोरखंडाचा पर्याय सुरू केला. विकास येवते यांना रात्री साडेबारा वाजता तर अभिजितला रात्री अडीच वाजता बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले.

" सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर शेती व्यवसायात रमलो. अतिवृष्टीने शेतात पूरस्थिती निर्माण झाल्याने धैर्याने चौदा तास झाडावर होतो. प्रशासन व ग्रामस्थांनी केलेल्या प्रयत्नातून आम्हा बाप - लेकांला पुर्नजीवन मिळाले. - विकास येवते, कदेर

(Edited by Pratap Awachar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com