अखेर अठरा तासांनी करावा लागला आईचा अंत्यसंस्कार लेकीच्या गावी ! अतिवृष्टीने स्मशानभूमीही नेली.   

अविनाश काळे 
Thursday, 15 October 2020

  • अतिवृष्टीने तात्पुरत्या जागेचा पर्यायही हिरावला ;
  • महिलेचा अंत्यविधी लेकीच्या गावात उरकावा लागला !
  • उमरगा तालूक्यातील व्हंताळ गावाला स्मशानभूमीसाठी मिळेना जागा

उमरगा : तालुक्यातील व्हंताळ गावात अंत्यविधीसाठी सूरक्षित अशी स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांना गायरान जागेवर उघड्यावर अंत्यसंस्कार उरकावे लागत आहेत. दरम्यान अतिवृष्टीमुळे परिसर सर्वत्र जलमय झाल्याने मंगळवारी (ता.१३) रात्री नऊ वाजता आजाराने मृत्यु झालेल्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्याची अडचण निर्माण झाली. शेवटी लेकीच्या गुंजोटी (ता.उमरगा ) गावी  बुधवारी (ता.१४) अठरा तासानंतर दुपारी साडेतीन वाजता त्या महिलेवर अंत्यसंस्कार करावा लागला.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
ग्रामीण भागात अनेक गावात अजूनही स्मशानभूमीची पुरेशी सोय नसल्याने मरणानंतर अनेक अडचणी येताहेत. असाच प्रसंग व्हंताळ येथील ग्रामस्थांनी अनुभवला. येथील प्रभावती व्यंकट मंमाळे वय ५८ वर्ष यांचे आजाराने मंगळवारी रात्री नऊ वाजता रहात्या घरी निधन झाले. बुधवारी सकाळी अंत्यविधी करण्याचे ठरले. मात्र अतिवृष्टीमुळे गायरान जमिनीवर उघड्यावर पावसात अंत्यसंस्कार करणे शक्य नव्हते, शिवाय त्या मार्गावरील नाल्यातुन मोठ्या प्रमाणावर पाणी वहात असल्याने पलिकडे प्रेत घेऊन जाणे शक्य नव्हते.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यामुळे नातेवाईकांनी गुंजोटी येथे लेकीकडे अंत्यसंस्कार करण्याचे निश्चित केले. त्यानुसार नातेवाईकांनी वाहनातून प्रेत घेऊन एकूरगा मार्ग निघाले. रस्त्यातील ओढ्यावरून पाणी जात असल्याने परतावे लागले. बलसूर, रामपूर, लिंबाळा या तिन वेगवेगळ्या मार्गाने जाताना पुन्हा रस्त्यातील पाण्याची आडकाठी आली. शेवटी समुद्राळ, होळी, पेठ सांगवी, नारंगवाडी या मार्गाने उलटा फेरा करता दुपारी गुंजोटी गाव गाठावे लागले. दुपारी साडेतीन वाजता त्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

" गावात सार्वजनिक स्मशानभूमी नसल्याची शौकांतिका ग्रामस्थांना नेहमी अडचणीची ठरत आहे. ग्रामपंचायतीने ठराव दिला. गायरान जमिनीवरील दोन एकर जागेवर सूरक्षित अशी स्मशानभूमी होण्यासाठी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दिला, पाठपुरावा केला. पदाधिकारीही पाठपुरावा करताहेत मात्र प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने समन्वयातून स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावून प्रेताची होणारा विटंबना थांबवावी. - संजय जाधव, ग्रामस्थ व्हंताळ 
 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Umarga rain Update Mothers funeral in daughters village