सैन्य भरतीसाठी 'त्या' पंधरा जणी झाल्या सज्ज ! 

अविनाश काळे
Tuesday, 8 September 2020

सैन्यदलात आता मुलींना स्थान दिले जात आहे, एव्हाना अनेक मुलींनी अथक परिश्रमाच्या जोरावर सैन्यदलात सक्रीय झाल्या आहेत. तीच प्रेरणा घेत उमरगा तालुक्यातील पंधरा मुलींनी सैन्य भरतीसाठी प्रवेशिका दाखल केल्या आहेत. त्यांनी आता देशाच्या सीमेवर जाण्यासाठी आणि भारतमातेची सेवा करण्यासाठी चंग बांधला आहे.

उमरगा (उस्मानाबाद) : विविध क्षेत्रात महिला स्वंयस्फूर्तीने पुढे जाताहेत. देशसेवेसाठी सीमेवर तत्परतेने लढण्याची तयारी झासीची राणी आणि सावित्रीच्या लेकींनी सुरू केली आहे. भारतीय सैन्यदलात मुलींना स्थान देण्यासाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तालुक्यातील पंधरा मुलींनी प्रवेशिका दाखल केल्या असून शारिरिक फिटनेस चाचणी व बौद्धिक चाचणी परिक्षेची त्यांनी तयारी सुरू केली आहे. या मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी तालुक्यातील गुंजोटी येथील माजी सैनिक संघटनेच्या वतीने सामाजिक संस्थेच्या वतीने मंगळवारी (ता.आठ) हिंगलाज माता सभागृहात सत्कार करून मनोबल वाढविण्यात आले.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

साहित्यिक गुंडू दुधभाते अध्यक्षस्थानी होते. माजी सैनिक बहुद्देशीय संस्थेचे सचिव खंडू दुधभाते, प्रा. सुनील बेळमकर, प्रा. अभयकुमार हिरास, व्यंकट झिंगाडे, नागेश टोंगळे, उमेश खमीतकर, नंदकिशोर खमीतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी तालुक्यातील भरतीसाठी तयारी करणाऱ्या वीस मुली उपस्थित होत्या. पालकांनी सैनिकी सेवेत दाखल होवून देशसेवा करण्यासाठी प्रोत्साहन दिल्याने व आमचाही तो मानस असल्याने या संधीचे सोने करू असा आशावाद श्रध्दा जाधव, पूजा जमादार यासह सर्व मुलींनी बोलून दाखविला. माजी सैनिक संघटनेच्या वतीने तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन मिळवून देण्याचे प्रयत्न राहतील अशी ग्वाही संघटनेच्या वतीने श्री. दुधभाते यांनी दिली.  श्रद्धा जाधव हिने प्रास्ताविक केले. क्रिडा शिक्षक उमेश खमीतकर यांनी सूत्रसंचलन केले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

" मुलींना देशसेवेसाठी संधी मिळाली आहे. आम्ही मुलींनी धाडसाने हा निर्णय घेतला आहे. अनेक मुलींना त्यासाठी प्रोत्साहित केले गेले. फिजीकल चाचणीसाठी भव्य क्रिडागंण व सुविधा या भागात अपेक्षित आहेत. स्वंय प्रेरणेने सर्व मुलीनी भरतीसाठी तयारी सुरू केली असून नक्कीच यात आम्ही यशस्वी होऊ. - श्रद्धा जाधव

" राष्ट्र सेवेसाठी मुली आता सिमेवर असतील. ग्रामीण भागातील अनेक मुलींनी भरतीसाठी हिंमत दाखविली आहे त्याचे कौतूकच आहे. आता त्यांना प्रोत्साहन आणि योग्य मार्गदर्शन करण्यासाठी समाजघटकांनी प्रयत्नशील असायला हवे. - खंडू दुधभाते

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Umarga taluka Fifteen girls ready for army recruitment