उमरगा : घरी पाठवलेल्या तिघांचे अहवाल आले पॉझिटिव्ह; अन् रात्री साडेबारा वाजता सुरु झाली फोनाफोनी

corona.jpg
corona.jpg

उमरगा : आरोग्य विभागातील डॉक्टर्स आणि कर्मचारी कोविड रुग्णावर उपचार करण्यासाठी जोखीमेतुन काम करताहेत ही वस्तुस्थिती आहे. मात्र समन्वयाचा अभावामुळे आरोग्य विभागात गोंधळ उडतो आहे. मंगळवारी (ता.२१) रात्री मुरूम येथील मुलीच्या शासकिय वस्तीगृहातील कोरोना केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीसह स्वॅब घेतलेल्या व्यक्तींना घरी सोडण्याचा धक्कादायक प्रकार घडला.

काही तासांनी शहरातील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. आणि रात्री साडेबारा वाजता फोनाफोना करून रूग्णांना बोलावून घेण्यात आले. दरम्यान आरोग्य विभागाने अनावधनाने हा प्रकार घडल्याचे सांगून या पुढे असा प्रकार कदापीही होणार नसल्याची स्पष्टोक्ती केली.

उमरगा शहर व परिसर सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. येथील कोविड रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात जागा अपुरी पडते आहे. दोन दिवसापूर्वी एकाच दिवशी २६ पॉझिटिव्ह रुग्ण आल्याने आरोग्य विभागाची हतबलता झाली. त्यामुळे मुरुमच्या कोविड केअर सेंटरला बहुतांश रुग्ण पाठविण्यात आले होते. त्यात दोन दिवसापूर्वी निगेटिव्ह आलेल्या व्यक्ती क्वारंटाइनसाठी ठेवण्यात आले होते. शिवाय सोमवारी (ता.२०)  स्वॅब घेतलेल्या व्यक्तींचाही समावेश होता. मात्र आरोग्य विभागाकडून गफलत झाली आणि त्यांनी मंगळवारी सांयकाळी सेंटरमधील सर्वच ६३ लोकांना घरी स्वंतत्र, सुरक्षित राहाण्याचा सल्ला देऊन सोडण्यात आले. 

जेंव्हा रात्री साडेअकरा वाजता ४३ लोकांचा अहवाल आला त्यात घरी सोडून दिलेल्या उमरग्यातील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभागाची धावपळ सुरू झाली. तिघा सोबत एकाच कुटुंबातील अन्य तिघे होते. दुर्देवाने या कुटुंबातील घरात आजाराने पिडीत असलेल्या एका जेष्ठ महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे अख्ये कुटुंब चिंतेत पडले. दरम्यान आरोग्य विभागाने अनावधनाने झालेली चूक सुधारण्यासाठी रूग्णांना परत बोलावले. वरिष्ठ अधिकारी व डॉक्टर्स यांच्यात समन्वय असता तर असा धक्कादायक प्रकार घडला नसता, अशी चर्चा सुरू झाली आहे.

" कोविड केअर सेंटरमध्ये असलेल्या निगेटिव्ह आलेल्या परंतू लक्षणे नसलेल्या लोकांना होम क्वारंटाइन करण्याची सूचना होती. परंतू चूकीने सर्व रूग्णांना सोडण्यात आले, त्या सर्वांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारून घरात सुरक्षित रहाण्याचा सल्ला दिला होता. तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर झालेल्या चुकीची सुधारणा करून घेण्यात आली. कामाचा वाढता ताण, अपुऱ्या मनुष्यबळावर कोविड रुग्णांची सेवा सुरू आहे, अशा घाईत झालेल्या या प्रकाराची तातडीने सुधारणा करण्यात आली. 
- डॉ. वसंत बाबरे, वैद्यकिय अधिक्षक, ग्रामीण रूग्णालय मुरूम.

" स्वॅबचा अहवाल येण्यापूर्वीच एकाच कुटुंबातील दहा जणांना घरी पाठविण्यात आले होते. त्यातील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर कुटुंब हादरले. ते तिघे घरी आल्यावर स्वतंत्र होते रात्रीच त्यांना कोविड रूग्णालयात पाठविण्यात आले. मात्र आरोग्य विभागाचा हा गलथानपणा कुटुंबाच्या मुळावर येण्यासारखा आहे.

महेश माशाळकर, नगरसेवक
 

(संपादन : प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com