दोनदा अपयशाने खचून न जाता अभिजितने केली यूपीएससी ‘क्रॅक’ 

गजानन सपकाळ 
Tuesday, 4 August 2020

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जाफ्राबाद तालुक्यातील वरूड बुद्रुक येथील अभिजित वायकोस याने ५९० वी रॅंक घेत यश पटकावले

वरूड बुद्रुक (जालना) : अभियांत्रिकीच्या शिक्षणानंतर त्याला नामांकित टाटा कंपनीत नोकरीची संधी चालून आली; पण प्रशासकीय सेवेत जाऊन समाजासाठी काहीतरी करण्याची प्रबळ इच्छा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. यातूनच त्याने जिद्दीने अभ्यास केला आणि यूपीएससीत यशाचा झेंडा रोवला. 

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जाफ्राबाद तालुक्यातील वरूड बुद्रुक येथील अभिजित वायकोस याने ५९० वी रॅंक घेत यश पटकावले. अभिजितने वरूडच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण घेतले. पाचवी ते दहावी बुलडाण्याच्या भारत विद्यालयात; तसेच बारावी राजर्षी शाहू महाराज महाविद्यालय लातुरात पूर्ण केली.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

बारावीनंतर अभियांत्रिकीचे शिक्षण त्याने पीआयसीटी महाविद्यालयात केले; परंतु स्पर्धा परीक्षेचा विचार स्वस्थ बसू देत नव्हता. यासाठी त्याने जोरदार तयारी केली आणि हे यश मिळविले. दरम्यान, आज मिळालेल्या या यशाने प्रशासन किंवा पोलिस सेवेत जाण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे वडील जिनचंद्र वायकोस व आई नयना वायकोस यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

अभिजितचा यशाचा अजेंडा 
अभियांत्रिकीच्या शिक्षणानंतर अभिजितला टाटा कंपनीमध्ये चांगला पगाराच्या नोकरीची संधी मिळाली होती. तथापि, सनदी अधिकारी बनण्याची तीव्र इच्छा मनात बाळगल्यामुळे त्याने थेट दिल्लीचा रस्ता पकडला. तेथे जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो)च्या सहकार्याने तयारी सुरू केली. या परीक्षेत त्याला दोनदा अपयश आले; परंतु खचून न जाता त्याने या परीक्षेत घवघवीत यश मिळविले. दरम्यान, फेब्रुवारी २०१९ मध्ये भारतीय वनसेवेमध्येही सध्या अभिजितला यश मिळाले होते. सध्या तो वनसेवेतील प्रशिक्षण मसुरी येथे पूर्ण करीत आहे.

Edit - Pratap Awachar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: upsc result 2019 abhijit waykos success story