कोरोनातून मुक्त झाल्यावर आता काय, डॉक्टर म्हणतात..

coron free 27.jpg
coron free 27.jpg

लातूर :  कोरोनातून मुक्त झाल्यानंतरही अनेकांना श्वसनास त्रास, फुप्फुसाच्या कार्यक्षमतेत घट, स्नायूची ताकत कमी होणे, वयोवृद्धांमध्ये शारीरिक हालचाल मंदावणे अशा त्रासाला सामोरे जावे लागत आहे, अशा रुग्णांना फिजिओथेरपी उपचारातून त्यांच्या फुप्फुसाचे कार्य सुरळीत होण्यास मदत होऊन स्नायूही हळूहळू बळकट होतात. काही दिवसांच्या नियमित फिजिओथेरपी उपचाराने अशा रुग्णांच्या पुनर्वसनास मदत होते, अशी माहिती एमआयपी फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. पल्लवी जाधव यांनी दिली. 


येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त ‘पोस्ट कोविड-१९चे पुनर्वसन आणि फिजिओथेरपीची भूमिका’ या विषयावर झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 

त्या म्हणाल्या, ‘‘कोरोनामुळे सहा महिन्यांत सर्वांनाच बंदिस्त जीवन जगावे लागले. आता आपण अनलॉकच्या टप्प्यातून जात आहोत. कोरोना रुग्णांची संख्याही वेगाने वाढत आहे. त्यामुळे तोंडाला मास्क लावणे, सामाजिक अंतर राखणे, साबणाने हात स्वच्छ धुणे, गरज असेल तरच घराबाहेर पडणे या नियमांचे सर्वांनीच काटेकारपणे पालन करणे गरजेचे आहे. आजपर्यंत आपल्या देशातील लाखो लोकांनी उपलब्ध औषधोपचार व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कोरोनावर मात केलेली आहे. कोरोनावर मात करून पूर्ववत आयुष्य जगण्यासाठी शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यही सुदृढ असणे आवश्यक आहे,’’ असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमासाठी डॉ. विश्वनाथ पावडशेट्टी, डॉ. नेहा मेश्राम, डॉ. श्रुती ताडमारे, डॉ. गौरव भटनागर, डॉ. टी. सुरेशकुमार, डॉ. नेहा सिंग, डॉ. शीतल घुले, डॉ. श्‍याम जुनागडे, डॉ. संदेश लोंढे यांनी पुढाकार घेतला. 

गाफील राहू नका; काळजी घ्या! 
अधिक काळ ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर राहून कोरोनामुक्त झालेल्या अनेक रुग्णांत फुप्फुसाची इजा होण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा रुग्णांमध्ये दम लागणे, श्वसनास अडथळा येणे असे त्रास आढळून येत आहेत. यामुळे काही रुग्णांना पुन्हा ऑक्सिजनवर ठेवण्याची गरज भासत आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर रुग्णांनी गाफील न राहता स्वतःची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दीर्घकाळ व्हेंटिलेटर अथवा ऑक्सिजनवर राहून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या पुनर्वसनात फिजिओथेरपी उपचाराची भूमिका फार महत्त्वाची ठरत आहे. अशा रुग्णांवर उपचारासाठी चेस्ट फिजिओथेरपी, पेशंट पोजिशनिंग एक्सरसाईज, स्पायरोमेट्री एक्सरसाईज, श्वसनाचे व्यायाम आणि काही आधुनिक श्वसनाचे व्यायाम प्रकार महत्त्वाचे ठरत आहेत.अशी माहिती डॉ. जाधव यांनी दिली. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com