Video - नांदेडला महामानवाला अभिवादन पण घरी राहूनच...

नांदेडला असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा
नांदेडला असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा

नांदेड - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरी होत असते. पण यंदा इतिहासात पहिल्यांदाच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आंबेडकर जयंती मंगळवारी (ता. १४) प्रशासनाच्या नियमांचे पालन करत आपआपल्या घरी साजरी करण्यात आली.

दरवर्षी भीमसैनिकांच्या अथांग सागराच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले जाते. परंतू, यंदा कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत नांदेडकरांनी डॉ. आंबेडकर यांना आपआपल्या घरी राहूनच अभिवादन केले. 

मोजक्या लोकांचीच उपस्थिती
दरवर्षी रेल्वेस्थानकासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी हजारोंची गर्दी असते पण यंदा ठराविक पदाधिकारी, अधिकारी यांनीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मंगळवारी सकाळी महापौर दीक्षा धबाले, उपमहापौर सतिश देशमुख तरोडेकर, विलास धबाले यांच्यासह मोजक्या अधिकारी, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शिवाजीनगर येथील निवासस्थानी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकट पाटील गोजेगावकर, महानगराध्यक्ष प्रविण साले, माजी आमदार अविनाश घाटे यांनी अभिवादन केले.

घरी राहूनच अभिवादन
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. परंतू, यंदा कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याचबरोबर नागरिकांनी रस्त्यावर फिरू नये, यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नांदेड शहर आणि जिल्ह्यात यंदाची भीमजयंती आपआपल्या घरी राहूनच साजरी करण्यात आली. नागरिकांनी मंगळवारी (ता.१४) शहरात कुठेही गर्दी न करता आपआपल्या घरातूनच डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले.

विविध कार्यालयात अभिवादन
त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयासह, महापालिका, पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, तहसील कार्यालयाबरोबर इतर शासकीय कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा वापर करत रक्तदान शिबिर तसेच अन्नदान व धान्यवाटप करण्यात आले.

घरी ध्वजवंदन करुन जयंती
शहरातील डॉ. आंबेडकर नगर, पिवळी गिरणी, समता नगर, विकासनगर, प्रकाशनगर, महसूलनगर, सरपंचनगर, सांचीनगर, जेतवननगर, सिद्धार्थनगर, वामनदादा कर्डकनगर आदी भागातील नागरिकांनी आपआपल्या घरीच जयंती साजरी केली. प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून नागरिकांनी आपआपल्या घरावर, बाल्कनीत ध्वजवंदन केले. तसेच मोबाईलच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com