Video - नियंत्रित लॉकडाऊनचा विचार व्हावा - अशोक चव्हाण

अभय कुळकजाईकर
Sunday, 12 April 2020

कोरोनाचा ज्या जिल्ह्यात अजिबात फैलाव झाला नाही. त्या ठिकाणी लॉकडाऊनमध्ये शिथिलता द्यावी किंवा नियंत्रित ठेवावा. थोडी फार मुभा द्यावी. त्याचबरोबर कृषी, उद्योग व इतर महत्वाच्या व्यवसायास दिलासा देण्याची गरज असल्याचे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

नांदेड - ​मागील ता. १८ मार्चपासून कोरोना संदर्भात उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातच ठाण मांडून बसलेले पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी जिल्हास्तरावर अनेक बैठका घेवून प्रशासनाला आदेश व सूचना केल्यानंतर त्यांनी आता आपले लक्ष जिल्ह्यातील तालुक्यांकडे वळविले आहे. आतापर्यंत पाच तालुक्यांना प्रत्यक्ष भेटी देवून कोरोनास्थितीचा आढावा घेताना गरीबांना अन्नधान्याची मदत करण्याचे काम केले आहे.

समन्वय आणि संपर्कातून नियोजन
पालकमंत्री चव्हाण यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन, पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्यासोबत समन्वय आणि सातत्याने संपर्क ठेऊन आहेत. त्यांचे प्रयत्न व त्यांना प्रशासनाची मिळत असलेली मदत या जोरावर कोरोना ही वैश्वीक महामारी जिल्ह्याच्या वेशीवरच अद्याप तरी रोखू शकलो आहोत. नागरिकांचे सहकार्य आणि प्रशासनाचे नियोजन असेच राहिले तर भविष्यातही हा विषाणू आपल्यापर्यंत येणार नाही, असा विश्वास पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - डॉ. आंबेडकर जयंती घरीच साजरी करा- डॉ. विपीन आणि श्री. मगर

तालुकापातळीवर नियोजन
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आता तालुका पातळीवर जावून नियोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक तालुक्यातील आरोग्य सुविधा, अन्नधान्य वाटप नियोजन यासह अनेक विषयांवर बैठका घेण्याचा निर्णय घेतला आहे. याअनुषंगाने त्यांनी आतापर्यंत भोकर, अर्धापूर, मुदखेड, देगलूर व नायगाव या तालुक्याच्या मुख्यालयी जावून संबंधितांच्या बैठका घेवून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यासोबतच येणाऱ्या काही दिवसांत उर्वरित सर्वच तालुक्यांना भेटी देवून त्या-त्या तालुक्यातील परिस्थितीची माहिती घेण्यात येणार आहे. 

राज्य अर्थव्यवस्था समितीवर अशोक चव्हाण
कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. अनेकांचा रोजगार थांबला आहे. खासगी व्यवस्थापनाला कर्मचाऱ्यांचे पुढील महिन्याचे पगार करणे दुरापस्थ झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठीची मंत्रीमंडळ समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांना घेण्यात आले आहे.

हेही वाचलेच पाहिजे - लॉकडाऊनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे, कसे? ते वाचाच

राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठीची ही महत्त्वाची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण यांच्यासमवेत जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, अनिल परब आदी मंत्र्यांचा समावेश आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर होणारे दुष्परिणाम व त्यातून काढावयाचा मार्ग यासाठी ही समिती उपाययोजना सुचविणार आहे. राज्यात सुरू असलेले लॉकडाऊन याचाही ही समिती अभ्यास करून सरकारला काही उपाययोजना सुचविणार आहे. 

आर्थिक दिलासा देण्याची गरज
उद्योगधंदे, कृषी व्यवसायास आर्थिक दिलासा देण्याची गरज आहे. ज्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण नाहीत अशा ठिकाणी नियंत्रित लॉकडाऊन रहावा किंवा त्यात शिथिलता द्यावी, असे माझे मत आहे. कारण पुढील काळात आर्थिक परिस्थितीच्या आव्हानाचा आपल्याला मुकाबला करावा लागणार आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजनाही कराव्या लागणार आहेत. 
- अशोक चव्हाण, पालकमंत्री, नांदेड.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video - Think of a controlled lockdown - Ashok Chavan, Nanded news