शिवणगाव बंधाऱ्यातून गोदापात्रात सोडले पाणी 

लक्ष्मीकांत कुलकर्णी
Wednesday, 27 May 2020

शिवणगाव (ता. घनसावंगी) येथील बंधाऱ्याखालील गावातील गोदावरीचे पात्र वाळवंट बनले होते. पात्र कोरडेठाक पडल्याने परिसरातील ग्रामस्थांचे, पशुपालकांसह शेतकऱ्यांचे पाण्याविना हाल होत होते. ग्रामस्थांनीही पाणी सोडण्याबाबत पालकमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली होती.

कुंभार पिंपळगाव (जि.जालना) - शिवणगाव (ता. घनसावंगी) येथील बंधाऱ्याखालील गावातील गोदावरीचे पात्र वाळवंट बनले होते. पात्र कोरडेठाक पडल्याने परिसरातील ग्रामस्थांचे, पशुपालकांसह शेतकऱ्यांचे पाण्याविना हाल होत होते. ग्रामस्थांनीही पाणी सोडण्याबाबत पालकमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली होती. ‘सकाळ’ने छायाचित्रासह बातमी प्रसिद्ध केली होती. अखेर दखल घेत मंगळवारी (ता. २६) दुपारी शिवणगाव बंधाऱ्यातून गोदावरीच्या पात्रात १ हजार २०० क्‍युसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे भादली, सिरसवाडी, गुंज (ता. घनसावंगी) यासह रिदोरी, कवडगाव, गव्हाणथडी, हिवरा(ता. माजलगाव) या पात्रापलीकडच्या ग्रामस्थांनाही दिलासा मिळाला आहे. 

अंबड-घनसावंगी तालुक्‍यांतील गोदाकाठच्या गावांसाठी पात्रात पाणी सोडावे, अशी मागणी पालकमंत्री राजेश टोपे यांच्याकडे परिसरातील ग्रामस्थांनी केली होती. पालकमंत्री टोपे यांनी मागणीची दखल घेऊन गोदावरी पाटबंधारे महामंडळ, कार्यकारी संचालक व कडाच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्याने गोदावरीच्या पात्रातील बंधाऱ्यात डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले; मात्र शिवणगाव बंधाऱ्यातून गोदावरीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले नव्हते.

हेही वाचा : बारावीची पुस्तके आता पीडीएफ स्वरूपात 

दरम्यान, शुक्रवारी (ता. २२) मुरमा सीआर क्रमांक ७३ वरून शिवणगाव बंधाऱ्यात ४०० क्‍युसेक पाणी सोडण्यात आले. यामुळे बंधाऱ्यातील पाणीसाठा ६.६४७ दशलक्ष घनमीटर इतका झाला. यामुळे मंगळवारी शिवणगाव बंधाऱ्यातून दोन गेट अर्धा फूट वर करून दुपारी बारा वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत बारा तास १२०० क्‍युसेक पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात आले.

हेही वाचा : पारंपरिक पदार्थांसह खवय्या मुलांची पोटपूजा जोरा

यावेळी शाखा अभियंता भागवत मापारी, उपविभागीय अधिकारी एस. बी. शेख, पी. व्ही. देशपांडे, पोलिस उपनिरीक्षक सचिन कापुरे, पोलिस कर्मचारी रामदास केंद्रे, मधुकर बिक्कड, श्‍यामसुंदर देवडे, नामदेव राठोड, रेवणाथ जाधव, श्री. वैद्य, श्री. खैरे, श्री. पवार यांच्यासह शाखा अभियंता मंगेश शेलार, प्रदीप खडसे, कर्मचारी पद्माकर उढाण, शिवाजी तौर, गौतम तौर यांची उपस्थिती होती. 

भादली, सिरसवाडी, गुंज, काळुंका वस्ती पात्रात पाण्याचा थेंबही शिल्लक नव्हता. पात्राचे वाळवंट झाले होते. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा व ऊस, फळबागांचा प्रश्‍न गंभीर झाला होता. शिवणगाव बंधाऱ्यातून पाणी सोडल्यामुळे पिकांनाही जीवदान मिळाले. शिवाय पावसाला सुरवात होईपर्यंत दिलासा मिळाला. 
ज्ञानदेव कचरे , शेतकरी

पाण्यापासून नेहमीच भादली, सिरसवाडी, गुंज ही गावे वंचित राहत होती. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न, ऊस, फळबागांचा प्रश्‍न गंभीर होत होता. यामुळे या गावातील लोकांना पाण्याची अत्यंत गरज होती. यासंदर्भात मुद्दामहून अधिकाऱ्यांशी बोलून, कारखान्याच्या कार्यालयात बैठक घेऊन शिवणगाव बंधाऱ्यातून गोदापात्रात पाणी सोडायला लावले. याबरोबरच शिवणगाव बंधाऱ्यातही डाव्या कालव्यातून पाणी सुरू आहे. यामुळे बंधाऱ्यातील पाणीसाठाही आहे त्यापेक्षा जास्त वाढणार आहे. ग्रामस्थांनी पाण्याचा काटेकोरपणे वापर करावा व येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत पाणी कसे राहील, याची काळजी घ्यावी. 
- राजेश टोपे, पालकमंत्री 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water released in Godavari river